मुंबई

कल्याण फाट्यावर सिग्नलचा ‘डबल उद्घाटन’ शो; सेना-भाजपच्या श्रेयवादाला हिरवा सिग्नल!

CD

शिवसेना-भाजपमध्ये श्रेयवाद रंगला
कल्याण फाट्यावर सिग्नलचा ‘डबल उद्घाटन’ शो

सकाळ वृत्तसेवा
डोंबिवली, ता. २ ः मनसेला केडीएमसीच्या सत्तेतून बाहेर काढण्याच्या भाजपच्या मागणीने महायुतीतील अंतर्गत धुसफूस चव्हाट्यावर आली असतानाच, कल्याण फाटा येथील नव्या सिग्नल यंत्रणेच्या उद्घाटनावरून शिवसेना आणि भाजपमध्ये चक्क ‘उद्घाटनाची डबल बाजी’ रंगली. सकाळी शिवसेनेचे आमदार राजेश मोरे यांच्या हस्ते उद्घाटन झाले. तर संध्याकाळी भाजपने त्याच सिग्नलचे पुन्हा उद्घाटन करून शक्तिप्रदर्शन केले. विकासकामाचे श्रेय कोणाचे, यावरून सुरू झालेल्या या ‘सिग्नल वॉर’ने कल्याण ग्रामीणच्या राजकारणात नवा रंग भरला आहे. पुण्यातील वादानंतर सेना-भाजपमधील दुरावा आता स्थानिक पातळीवरही दिसू लागल्याची चर्चा रंगली आहे.
कल्याण फाटा परिसरात काही वर्षांपासून वाहतूक कोंडीची गंभीर समस्या आहे. या पार्श्वभूमीवर येथे नवीन सिग्नल यंत्रणा बसविण्यात आली आहे. बुधवारी सकाळी शिवसेना शिंदे गटाचे कल्याण ग्रामीणचे आमदार राजेश मोरे आणि नगरसेवक बाबाजी पाटील यांच्या हस्ते या सिग्नलचे उद्घाटन झाले; मात्र या कार्यक्रमाला भाजपच्या स्थानिक नगरसेवक व पदाधिकाऱ्यांना निमंत्रण न मिळाल्याने नाराजीची ठिणगी पडली. संध्याकाळी भाजपने याच सिग्नलचे पुन्हा उद्घाटन केले. भाजपचे माजी आमदार तथा नेते सुभाष भोईर, नगरसेविका वेदिका पाटील आणि दिवा शहर मंडळ अध्यक्ष सचिन भोईर यांच्या हस्ते फीत कापण्यात आली. त्यामुळे ‘सिग्नल एक, उद्घाटन दोन आणि श्रेयासाठी दोन पक्ष आमनेसामने’ असे चित्र निर्माण झाले.

महायुतीचे आमदार आहात
या वेळी भाजपच्या नगरसेविका वेदिका पाटील यांनी आमदार राजेश मोरे यांना थेट टोला लगावला. ‘‘श्रेयवादात अडकून न बसता या प्रभागातून तीन नगरसेवक निवडून आले आहेत. या सिग्नलसाठी मी सातत्याने पाठपुरावा केला होता. त्यामुळे मला कार्यक्रमाला बोलावणे हे त्यांचे काम होते. तुम्ही केवळ शिवसेनेचे आमदार नसून महायुतीचे आमदार आहात, याचे भान ठेवून स्थानिक नगरसेवकांना सोबत घेणे गरजेचे आहे,’’ असे पाटील यांनी सुनावले. दिवा शहर मंडळ अध्यक्ष सचिन भोईर यांनीही शिवसेनेवर निशाणा साधत, ‘‘ज्यांचा या कामाशी काही संबंधच नव्हता, त्यांचा उत्साह मात्र मोठ्या प्रमाणात दिसला. ‘बेगाने शादी में अब्दुल्ला दिवाना’,’’ असा प्रकार आज येथे पाहायला मिळाला.

Wai Firestorm : वाईत बाप्पाच्या मूर्तींची हानी; भीषण आगीत ‘वैभव आर्टस्’ उद्योगाचे लाखो रुपयांचे नुकसान

Moringa Idli Podi: लोहयुक्त शेवग्याच्या पानांची अशी चटपटीत पोडी कधी खाल्लीये का? इडली-डोश्यासोबत नक्की ट्राय करा!

आजचे राशिभविष्य - 03 सप्टेंबर 2026

आजचे पंचांग आणि दिनविशेष - 03 सप्टेंबर 2026

Satara News : दहा हजार विद्यार्थ्यांकडून दोन्ही राजेंना पत्रे; शहर बस सुरू करण्याची मागणी; साताऱ्यातील जेन-झीसह जेन-अल्फाही सरसावले

SCROLL FOR NEXT