पालकमंत्रिपद पणाला लागले तरी चालेल; मात्र बल्क ड्रग पार्क होणार नाही!
पालकमंत्री भरत गोगावले यांची काळकाई बापूजी देवस्थानच्या प्रांगणातील एल्गार सभेत शपथ घेऊन ग्वाही
माणगाव, ता. १६ (वार्ताहर) ः तालुक्यातील प्रस्तावित बल्क ड्रग पार्कच्या मुद्द्यावरून स्थानिक नागरिक व संघर्ष समितीचा विरोध तीव्र झाला आहे. या पार्श्वभूमीवर पालकमंत्रिपद पणाला लागले तरी चालेल, मात्र बल्क ड्रग पार्क होणार नाही. प्रकल्प रद्द होईपर्यंत मी तुमच्या संघर्षात ढालीसारखा उभा राहीन, अशी ग्वाही पालकमंत्री भरत गोगावले यांनी दिली.
महाड विधानसभा मतदारसंघातील काळकाई बापूजी देवस्थानच्या प्रांगणात बल्क ड्रग पार्कविरोधी संघर्ष समितीच्या वतीने आयोजित एल्गार सभेत ते बोलत होते. या वेळी उपस्थितांसमोर त्यांनी बापूजी काळकाई मातेची शपथ घेत आपली भूमिका स्पष्ट केली. गोगावले म्हणाले, की ज्या जनतेने मला सलग चार वेळा निवडून दिले, त्या जनतेमुळेच मला मंत्रिपद आणि रायगडचे पालकमंत्रिपद मिळाले आहे. त्यामुळे याच जनतेच्या प्रश्नासाठी पदाची कोणतीही किंमत मोजावी लागली तरी मी मागे हटणार नाही. हा प्रश्न केवळ एका गावाचा किंवा एका तालुक्याचा नाही; आपल्या पुढील पिढ्यांच्या भवितव्याचा आहे. बल्क ड्रग पार्कचा प्रस्ताव रद्द करण्यासाठी शासन स्तरावर पाठपुरावा करण्याचे आश्वासन देत पालकमंत्रिपदापेक्षा जनतेचा प्रश्न महत्त्वाचा असल्याचे सांगत या प्रश्नावर तडजोड न करण्याची भूमिका त्यांनी सभेत मांडली.
संघर्ष समितीचा एल्गार
बल्क ड्रग पार्कविरोधी संघर्ष समितीच्या वतीने आयोजित या एल्गार सभेत परिसरातील नागरिकांनी मोठ्या संख्येने उपस्थित राहत आपली भूमिका मांडली. प्रस्तावित प्रकल्पामुळे परिसरातील पर्यावरण, शेती, पाणी आणि स्थानिक जीवनमानावर परिणाम होण्याची शक्यता असल्याची चिंता सभेत व्यक्त करण्यात आली. या पार्श्वभूमीवर संघर्ष समितीने आपला लढा अधिक तीव्र करण्याचा निर्धार व्यक्त केला. स्थानिकांच्या हिताचा विचार करून शासनाने या प्रश्नावर निर्णय घ्यावा, अशी मागणीही सभेत करण्यात आली.
मान्यवरांची उपस्थिती
एल्गार सभेला बल्क ड्रग पार्क संघर्ष समितीचे अध्यक्ष बाबूशेठ खानविलकर, सभापती विलास शिंदे, जिल्हा परिषद सदस्य अविनाश नलावडे, दीपकशेठ जाधव, विपुल उभारे, ज्ञानदेव पवार, प्रमोद घोसाळकर, जनार्दन मानकर, राजाभाऊ रणपिसे, एकनाथ मानकर, सुभाष दळवी, मिलिंद खानविलकर, संतोष मोरे, लहू पाटील, सुधीर पवार, सयाजी मोरे, संजोग मानकर आदी मान्यवर उपस्थित होते.
सकाळ+ चे सदस्य व्हा
ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!
शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.
Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.