सकाळ वृत्तसेवा
ठाणे, ता. १७ : पोलिसांच्या नजरेतून गुटख्याची वाहतूक सुरक्षितपणे करता यावी, यासाठी पुढे पायलट वाहन आणि मागे गुटख्याने भरलेल्या गाड्या, अशा पद्धतीने तस्करी सुरू असल्याचा प्रकार कळवा पोलिसांच्या कारवाईत उघडकीस आला आहे. नाशिकहून ठाणे, मुंबई आणि नवी मुंबईच्या दिशेने जाणाऱ्या दोन कारमधून गुटखा आणणाऱ्या उत्तर प्रदेशामधील दोघांना पोलिसांनी अटक केली. त्यांच्याकडून १२ लाख ७१ हजारांचा गुटखा-पानमसाला आणि दोन कार असा एकूण २६ लाख ८१ हजारांचा मुद्देमाल जप्त करण्यात आल्याची माहिती आज (ता. १७) ठाण्यातील पत्रकार परिषदेत ठाणे शहर परिमंडळ १ चे पोलिस उपायुक्त बाळासाहेब पाटील यांनी दिली.
खारेगाव टोलनाका परिसरातून मोठ्या प्रमाणात प्रतिबंधित गुटख्याची वाहतूक होणार असल्याची माहिती कळवा विभागाचे सहाय्यक पोलिस आयुक्त संकेत देवळेकर यांना मिळाली होती. वरिष्ठ निरीक्षक प्रतापराव भोसले यांच्या मार्गदर्शनाखाली सहाय्यक निरीक्षक आर. के. गायकवाड यांच्या पथकाने बुधवारी (ता. १६) सकाळी खारेगाव टोलनाक्याजवळ सापळा रचला. काही वेळाने दोन संशयास्पद कार तेथे आल्या. पोलिसांनी त्यांची तपासणी केली असता मोठ्या प्रमाणात गुटखा व पानमसाला आढळून आला. दोन्ही वाहनांमधील अंकित यादव आणि मुकेश यादव यांना ताब्यात घेण्यात आले. याप्रकरणी कळवा पोलिस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे.
पोलिसांना पाहताच पायलट कार पसार
गुटख्याच्या वाहनांपुढे एक कार पायलट म्हणून जात असल्याचे पोलिसांच्या निदर्शनास आले. पोलिसांनी या कारला थांबविण्याचा प्रयत्न केला असता चालकाने वेग वाढवून पळ काढला. या चालकाची ओळख पटली असून, त्याचा शोध सुरू आहे. जप्त केलेल्या दोन्ही कारवर क्रमांकपत्रिका नसल्याचेही तपासात समोर आले.
इगतपुरी ते मुंबई मार्गाचा तपास
जप्त केलेला गुटखा इगतपुरी येथून भिवंडीमार्गे ठाण्यात आणि तेथून मुंबई व नवी मुंबई परिसरात नेण्यात येत असल्याचे प्राथमिक तपासात समोर आले आहे. या तस्करीमध्ये मुंबई, नवी मुंबईतील काही व्यक्तींची नावे समोर आली असून, या प्रकरणाची व्याप्ती तपासली जात आहे.
सकाळ+ चे सदस्य व्हा
ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!
शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.
Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.