पनवेल औद्योगिक वसाहतीच्या रस्त्यांची चाळण
२२ कोटींच्या निधीनंतरही सर्व्हिस रोडवर खड्ड्यांचे साम्राज्य; कामाच्या दर्जावर प्रश्नचिन्ह
पनवेल, ता. २१ (बातमीदार) ः पनवेल औद्योगिक सहकारी वसाहतीमधील सेवा रस्त्याचे काम चार महिन्यांपूर्वीच करण्यात आले होते, मात्र अल्पावधीतच या रस्त्याची मोठ्या प्रमाणात दुरवस्था झाली असून, जागोजागी मोठे खड्डे पडले आहेत. यामुळे वाहनचालक, उद्योजक व नागरिकांना नाहक त्रासाला सामोरे जावे लागत आहे. वसाहतीच्या अधिकाऱ्यांशी संपर्क साधला असता, हे काम एमआयडीसीने केले असून, काम अपूर्ण असल्याने रस्ता अजून वसाहतीकडे हस्तांतरित झालेला नाही, असे स्पष्ट करण्यात आले.
जे. जे. वूड ते खांदा कॉलनीदरम्यानच्या मुख्य रस्त्यावर खड्डे पडल्याने या मार्गावरील वाहतुकीचा प्रश्न गंभीर झाला आहे. महाराष्ट्र शासनाच्या उद्योग विभागाच्या ७५:२५ योजनेअंतर्गत तसेच एमआयडीसीच्या माध्यमातून पनवेल औद्योगिक वसाहतीतील रस्ते, गटारे आणि अन्य पायाभूत सुविधांच्या कामांसाठी तब्बल २२ कोटी ३९ लाख ५१ हजार ५०० रुपयांचा निधी मंजूर केला आहे. या निधीपैकी ७५ टक्के म्हणजेच १६ कोटी ७३ लाख ६३ हजार ६२५ रुपयांचे शासकीय अनुदान, तर उर्वरित २५ टक्के रक्कम वसाहतीतील सदस्यांच्या वर्गणीतून खर्च करण्यात येत आहे. कोट्यवधींचा निधी उपलब्ध करून देऊन रस्त्यांची कामे केली असतानाही अवघ्या चार महिन्यांत रस्त्यांवर खड्डे पडल्याने गुणवत्तेबाबत प्रश्न उपस्थित होत आहेत.
...तर तीव्र आंदोलन छेडण्यात येईल
औद्योगिक वसाहतीमध्ये दररोज मोठ्या प्रमाणात अवजड वाहतूक सुरू असते. त्यामुळे रस्त्यांवरील खड्ड्यांमुळे वाहनांचे नुकसान होण्याबरोबरच अपघाताचा धोका निर्माण झाला आहे. पावसाळ्यात खड्ड्यांमध्ये पाणी साचल्याने त्यांचा अंदाज येत नसल्याने वाहनचालकांची अधिकच गैरसोय होत आहे. दरम्यान, रस्त्यांची तातडीने पाहणी करून आवश्यक दुरुस्ती करावी, अशी मागणी शरद पवार पक्षाचे सचिव आदित्य जानोरकर यांनी केली आहे. प्रशासन आणि संबंधित कंत्राटदाराने तातडीने कार्यवाही न केल्यास आंदोलनाचा इशाराही त्यांनी दिला आहे.
पनवेल इंडस्ट्रियलमधील रस्ता पालिका करणारा
१ पनवेल येथील आद्य क्रांतिवीर वासुदेव बळवंत फडके नाट्यगृहात ९ सप्टेंबर रोजी विशेष सर्वसाधारण महासभेचे आयोजन करण्यात आले होते. महापौर नितीन पाटील यांच्या अध्यक्षतेखाली झालेल्या या महासभेत जे. जे. वूड ते खांदा कॉलनी या रस्त्याच्या काँक्रीटीकरणाच्या विषयावर चर्चा करण्यात आली. चर्चेनंतर या कामाला सभागृहाची मंजुरी मिळाली.
२ पनवेल आणि खांदा कॉलनी या दोन वसाहतींना जोडणारा हा रस्ता दैनंदिन वाहतुकीच्या दृष्टीने अत्यंत महत्त्वाचा आहे. या मार्गावर रेल्वे पूल भुयारी मार्गाच्या स्वरूपात असल्याने पावसाळ्यात मोठ्या प्रमाणात पाणी साचते. त्यामुळे वाहनचालकांसह पादचाऱ्यांना ये-जा करताना मोठ्या अडचणींचा सामना करावा लागतो. रस्ता काँक्रीटीकरणाच्या कामामुळे या समस्येवर कायमस्वरूपी तोडगा निघण्याची अपेक्षा आहे.
सकाळ+ चे सदस्य व्हा
ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!
शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.
Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.