आठ दशकांची गणेशभक्ती
लाल मैदान मंडळाचा ८०वा उत्सव; केदारनाथचा भव्य देखावा
सकाळ वृत्तसेवा
मुंबई, ता. २२ : गेली आठ दशके गणेशभक्तीची परंपरा जपत गणेशोत्सव साजरा करणाऱ्या लाल मैदान सार्वजनिक गणेशोत्सव मंडळाचा यंदा ८०वा गणेशोत्सव उत्साहात साजरा होत आहे. ‘इच्छापूर्ती’ म्हणून ओळखल्या जाणाऱ्या या गणपतीचे यंदाचे विशेष आकर्षण म्हणजे श्रीक्षेत्र केदारनाथची साकारण्यात आलेली भव्य प्रतिकृती. या प्रतिकृतीमुळे मंडपात प्रसन्न आणि आध्यात्मिक वातावरण निर्माण झाले असून, भाविकांकडून त्याला चांगला प्रतिसाद मिळत आहे. मंडळाचे अध्यक्ष माधव पारटे, सेक्रेटरी धनंजय सावंत आणि खजिनदार रवींद्र पाथडे यांच्या मार्गदर्शनाखाली मंडळाचा गणेशोत्सव सुरू आहे.
आजच्या काळात गणेशमूर्ती विविध स्वरूपांत आणि संकल्पनांमध्ये साकारल्या जात असताना लाल मैदान सार्वजनिक गणेशोत्सव मंडळाने गेल्या ८० वर्षांपासून मंडळात गणपतीच्या मूर्तीचे मूळ स्वरूप कायम ठेवले आहे. दरवर्षी त्याच स्वरूपाची सुमारे १० फूट उंचीची उभी गणेशमूर्ती विराजमान केली जाते. केवळ धोतराचा रंग किंवा अन्य किरकोळ बाबींमध्ये बदल केला जातो; मात्र मूर्तीचे मूळ स्वरूप बदलले जात नाही. विशेष म्हणजे, ही मूर्ती केवळ देखाव्यासाठी नसून पूजा, आरती आणि भक्तांच्या सेवेसाठी असलेली एकमेव मूर्ती आहे.
मूर्तीची उंची किंवा भव्यतेची स्पर्धा करण्यापेक्षा गणपतीची व्यवस्थित सेवा करता यावी, त्याला हार घालता यावा आणि भक्तिभावाने पूजा करता यावी, याला मंडळाकडून प्राधान्य दिले जाते.
यंदा भाविकांसाठी १२ दिवस २४ तास विनामूल्य मिनरल वॉटरची सुविधा उपलब्ध करून देण्यात आली आहे. मंडप परिसरात तीन ते चार वॉटर डिस्पेंसर ठेवण्यात आले असून, ते नियमितपणे भरले जातात. देखावा समीर मुरूडकर यांनी साकारला असून, त्यासाठी सुमारे १५ ते २० दिवसांचा कालावधी लागला. यंदाच्या गणेशमूर्तीची निर्मिती प्रसिद्ध मूर्तिकार आकाश त्रिमल यांनी केली आहे.
२०-२५ वर्षांची भंडाऱ्याची परंपरा
लाल मैदान सार्वजनिक गणेशोत्सव मंडळात गेल्या सुमारे २० ते २५ वर्षांपासून भंडाऱ्याची परंपरा सुरू आहे. प्रसाद तयार करण्याच्या जागेपासून त्यासाठी वापरल्या जाणाऱ्या पदार्थांपर्यंत तसेच प्रसाद वितरणापर्यंत स्वच्छतेची विशेष काळजी घेतली जाते. प्रसादाचे वितरण करताना स्वच्छता आणि अन्नसुरक्षेसंदर्भातील नियमांचे पालन करण्याचा मंडळाचा प्रयत्न असतो.
भाविकांसाठी विश्रांतीचीही व्यवस्था
गणेशोत्सवासाठी दूरवरून येणाऱ्या भाविकांना इतर गणपतींचे दर्शन घेतल्यानंतर काही काळ विश्रांती घेता यावी, यासाठी मंडळाकडून गेल्या सुमारे २० ते २२ वर्षांपासून मैदानावर प्लॅटफॉर्मची व्यवस्था केली जाते.
पास न विकण्याची भूमिका
मंडळाचे माजी मानद सचिव महेश सावडेकर यांच्या काळात सुमारे २०-२५ वर्षांपूर्वी गणेशदर्शनासाठी पास विक्रीची संकल्पना मंडळासमोर आली होती, मात्र पास विकल्यास गणेशदर्शनाचे व्यावसायिकीकरण होईल, अशी भावना कार्यकर्त्यांनी व्यक्त केली. त्यानंतर मंडळाने पास विक्री न करण्याचा निर्णय घेतला आणि आजही ही परंपरा कायम आहे. भाविकांनी रांगेतून दर्शन घ्यावे, तसेच ज्येष्ठ नागरिकांसाठी स्वतंत्र प्रवेशाची सोय करण्यात येते, मात्र गणेशदर्शनासाठी कोणत्याही प्रकारचे पास विकले जात नाहीत.
सकाळ+ चे सदस्य व्हा
ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!
शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.
Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.