कर्तव्यावर असलेल्या महिला पोलिसाशी गैरवर्तन; आरोपीला सहा महिने कारावास
चेंबूर, ता. २२ (बातमीदार) : गोवंडी पोलिस ठाण्याच्या हद्दीत वाहतूक सुरळीत करण्याचे कर्तव्य बजावत असलेल्या महिला पोलिस अंमलदाराशी अश्लील हातवारे व शिवीगाळ करून गैरवर्तन करणाऱ्या आरोपीला मुंबईतील अतिरिक्त सत्र न्यायालयाने दोषी ठरवत सहा महिन्यांच्या कारावासाची शिक्षा सुनावली. सरोज दुर्योधन सी. असे आरोपीचे नाव आहे.
२१ सप्टेंबर रोजी गोवंडी पोलिस ठाण्याच्या हद्दीत महिला पोलिस अंमलदार वाहतूक सुरळीत करण्याचे कर्तव्य बजावत होत्या. त्या वेळी आरोपीने त्यांना उद्देशून अश्लील हातवारे केले तसेच शिवीगाळ केली. तसेच त्यांच्या मनास लज्जा उत्पन्न होईल, असे कृत्य केल्याचा आरोप आहे. याप्रकरणी महिला पोलिस अंमलदार यांनी गोवंडी पोलिस ठाण्यात तक्रार दिल्यानंतर आरोपीविरुद्ध गुन्हा दाखल करण्यात आला.
या प्रकरणाचा तपास सहाय्यक पोलिस निरीक्षक प्रियंका पाटील यांनी केला. मुंबई अतिरिक्त सत्र न्यायालयात झालेल्या सुनावणीदरम्यान सरकारी पक्षाच्या वतीने सरकारी अभियोक्ता ज्योती सावंत यांनी बाजू मांडली. पैरवी अधिकारी पोलिस उपनिरीक्षक अजय यादव यांनी न्यायालयीन कामकाजाचा पाठपुरावा करून सरकारी पक्षाशी समन्वय साधला.
न्यायालयाने आरोपीला सहा महिन्यांच्या कारावासासह दंडाची शिक्षा सुनावली. दंडाची रक्कम न भरल्यास प्रत्येक दंडासाठी एक महिन्याची अतिरिक्त कैदेची शिक्षा सुनावण्यात आली.
ही कारवाई पोलिस आयुक्त देवेन भारती, सहपोलिस आयुक्त (कायदा व सुव्यवस्था) मनोजकुमार शर्मा, अपर पोलिस आयुक्त, पूर्व प्रादेशिक विभाग धनंजय कुलकर्णी, पोलिस उपायुक्त, पूर्व परिमंडळ-१ समीर शेख, सहाय्यक पोलिस आयुक्त, चेंबूर विभाग रामराव ढिकले आणि वरिष्ठ पोलिस निरीक्षक पंढरीनाथ सावंत यांच्या मार्गदर्शनाखाली करण्यात आली. या कारवाईत पोलिस निरीक्षक दयानंद जाधव, सहाय्यक पोलिस निरीक्षक प्रियंका पाटील, पोलिस उपनिरीक्षक अजय यादव, पोलिस हवालदार ज्ञानेश्वर राठोड यांच्यासह अन्य पोलिस कर्मचाऱ्यांनी महत्त्वाची भूमिका बजावली.
सकाळ+ चे सदस्य व्हा
ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!
शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.
Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.