जिंकल्याचा अभिमान बाळगा, पण गर्व नको!
नवी मुंबई जिल्हास्तरीय शालेय क्रीडा स्पर्धेची सुरुवात
सकाळ वृत्तसेवा
नवी मुंबई, ता. २२ : जिंकल्याचा निश्चित अभिमान बाळगा, पण त्याचा गर्व करू नका आणि पराभवाने खचून न जाता पुन्हा नव्या जोमाने तयारी करा. उद्याचा दिवस निश्चित तुमचाच असेल, अशा प्रेरणादायी शब्दांत नवी मुंबईच्या महापौर सुजाता पाटील यांनी शालेय खेळाडूंचे मनोबल वाढवले. विद्यार्थ्यांमध्ये क्रीडा कौशल्याची अफाट गुणवत्ता असून, हे शहर येत्या काळात प्रतिभावंतांचे शहर म्हणून उदयास येईल, असा विश्वास त्यांनी व्यक्त केला. नवी मुंबई पालिका, क्रीडा व युवक सेवा संचालनालय आणि जिल्हा क्रीडा परिषद (ठाणे) यांच्या संयुक्त विद्यमाने आयोजित नवी मुंबई जिल्हास्तरीय शालेय क्रीडा स्पर्धेची उत्साहात सुरुवात झाली. या वेळी त्या बोलत होत्या.
यंदाच्या या क्रीडा महोत्सवाची सुरुवात सुजाता पाटील यांच्या हस्ते पार पडलेल्या जिल्हास्तरीय बुद्धिबळ स्पर्धेने झाली. १४, १७ आणि १९ वर्षांखालील वयोगटात रंगणाऱ्या या बुद्धिबळ पटावरील लढाईत ८०० हून अधिक मुली आणि ८५० हून अधिक मुले अशा तब्बल १,६५० हून अधिक बाल-बुद्धिबळपटूंनी सहभाग नोंदवत स्पर्धेत रंगत आणली. या स्पर्धेतील विजेत्या खेळाडूंना थेट विभागीय स्तरावर आपल्या बुद्धिमत्तेची चुणूक दाखवण्याची मोठी संधी मिळणार आहे. महापालिकेच्या या क्रीडा उपक्रमाचे कौतुक करताना स्थायी समितीचे सभापती अशोक पाटील यांनी सांगितले, की शहराच्या क्रीडा संस्कृतीत यंदा २५० हून अधिक शाळांतील ४० हजारांहून अधिक विद्यार्थी खेळाडू या विविध क्रीडा प्रकारांत उतरत आहेत. एवढ्या मोठ्या प्रमाणावर नवोदित खेळाडूंना हक्काचे व्यासपीठ उपलब्ध करून देणे ही अत्यंत अभिमानास्पद बाब आहे. क्रीडा, सांस्कृतिक व युवक कल्याण समितीचे सभापती गिरीश म्हात्रे यांनी स्पष्ट केले, की यंदा अनुदानित ४९ आणि विनाअनुदानित ४८ अशा विविध क्रीडा प्रकारांचा यात समावेश करण्यात आला आहे.
या सोहळ्याला क्रीडा समितीचे उपसभापती रॉबिन मढवी, नगरसेवक निशांत भगत, श्रेया जिरगे, क्रीडा विभागाच्या उपायुक्त अभिलाषा म्हात्रे, क्रीडा अधिकारी रेवप्पा गुरव, शालेय क्रीडा स्पर्धा समिती सदस्य धनंजय वनमाळी, राज्य बुद्धिबळ असोसिएशनचे सहसचिव डॉ. दीपक तांडेल, झेनिथ इंटरनॅशनल स्कूलचे चेअरमन अवनीश सिंग, मुख्य कार्यकारी अधिकारी धनश्री आंगणे, विश्वस्त आशीष सिंग आणि प्राचार्य रुबी वर्गीस उपस्थित होते.
सकाळ+ चे सदस्य व्हा
ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!
शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.
Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.