भटक्या कुत्र्यांचा उपद्रव
२० महिन्यांत ३,६६० हल्ले; १,००९ जणांना रुग्णालयात उपचार
सकाळ वृत्तसेवा
अलिबाग, ता. ८ : रायगड जिल्ह्यात भटक्या आणि मोकाट कुत्र्यांचा उपद्रव वाढला असून, नागरिकांच्या सुरक्षेचा प्रश्न गंभीर बनला आहे. जानेवारी २०२५ ते ऑगस्ट २०२६ या २० महिन्यांत जिल्ह्यात तब्बल तीन हजार ६६० नागरिकांवर कुत्र्यांनी हल्ले केल्याची माहिती जिल्हा आरोग्य विभागाने दिली आहे. यातील दोन हजार ६५१ नागरिकांवर बाह्यरुग्ण विभागात उपचार करण्यात आले, तर गंभीर दुखापत झालेल्या एक हजार नऊ जणांना अधिक उपचारासाठी रुग्णालयात दाखल करण्यात आले.
जानेवारी ते डिसेंबर २०२५ या वर्षभरात जिल्ह्यात दोन हजार ११५ नागरिकांवर कुत्र्यांनी हल्ला केला. त्यानंतर जानेवारी ते ऑगस्ट २०२६ या आठ महिन्यांत आणखी एक हजार ५४५ नागरिकांना कुत्र्यांच्या हल्ल्याचा सामना करावा लागला. त्यामुळे अवघ्या २० महिन्यांत हल्ल्यांची संख्या तीन हजार ६६० वर पोहोचली आहे. यामुळे भटक्या कुत्र्यांचा प्रश्न केवळ उपद्रवापुरता मर्यादित न राहता नागरिकांच्या सुरक्षिततेशी संबंधित झाला आहे.
ग्रामीण भागासह जिल्ह्यातील विविध शहरांमध्ये भटक्या कुत्र्यांची संख्या आणि वावर वाढताना दिसत आहे. गल्लीबोळ, रहिवासी वसाहती, बाजारपेठा, एसटी स्थानक परिसर आणि अन्य सार्वजनिक ठिकाणी कुत्र्यांचे कळप आढळत आहेत. त्यामुळे नागरिकांमध्ये भीतीचे वातावरण आहे. विशेषतः सकाळी आणि रात्रीच्या वेळी लहान मुले, महिला आणि ज्येष्ठ नागरिकांना रस्त्यावरून ये-जा करताना सावधगिरी बाळगावी लागत आहे.
दुचाकीस्वारांच्या मागे कुत्रे लागण्याच्या घटनांमुळे अपघाताचा धोकाही वाढला आहे. अचानक कुत्रे रस्त्यावर आल्याने वाहनावरील नियंत्रण सुटण्याची शक्यता असते. त्यामुळे नागरिकांच्या सुरक्षिततेसाठी स्थानिक स्वराज्य संस्थांनी ठोस उपाययोजना करण्याची मागणी होत आहे.
शहर तसेच ग्रामीण भागातील काही ठिकाणी उघड्यावर टाकला जाणारा कचरा आणि मांसाहारी अन्नपदार्थांचे अवशेष यामुळे कुत्र्यांचा वावर वाढत असल्याचे दिसून येते. एसटी स्थानक, बाजारपेठा आणि रहिवासी परिसरात कचऱ्याची योग्य विल्हेवाट न लागल्यास कुत्र्यांचे कळप त्या ठिकाणी जमा होतात.
हल्ल्यांची वाढती संख्या
२० महिन्यांत तीन हजार ६६० हल्ल्यांची नोंद झाली असून, त्यापैकी एक हजार नऊ नागरिकांना गंभीर दुखापतीमुळे रुग्णालयात दाखल करावे लागले. नागरिकांच्या सुरक्षेचा प्रश्न लक्षात घेता प्रशासनाने या समस्येकडे तातडीने लक्ष देण्याची गरज आहे.
नियंत्रणासाठी उपाय आवश्यक
भटक्या कुत्र्यांची संख्या नियंत्रित करण्यासाठी निर्बीजीकरण आणि लसीकरणाची प्रभावी अंमलबजावणी करणे आवश्यक आहे. त्यासोबतच उघड्यावर कचरा टाकण्यास प्रतिबंध करून नियमित स्वच्छता राखल्यास कुत्र्यांचा वावर कमी होण्यास मदत होऊ शकते. स्थानिक स्वराज्य संस्थांनी या उपाययोजनांची काटेकोर अंमलबजावणी करण्याची मागणी होत आहे.
सकाळ+ चे सदस्य व्हा
ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!
शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.
Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.