डिलिव्हरीच्या घाईत वाहतूक नियमांना हरताळ
कोपरखैरणे, ता. ८ (बातमीदार) : वाशी आणि कोपरखैरणे परिसरात ऑनलाइन डिलिव्हरी करणाऱ्या इलेक्ट्रिक दुचाकीस्वारांकडून वाहतूक नियमांची सर्रास पायमल्ली होत असल्याचे चित्र दिसत आहे. सिग्नल तोडणे, विरुद्ध दिशेने वाहन चालवणे आणि भरधाव जाणे अशा प्रकारांमुळे अपघाताचा धोका वाढला आहे. काही इलेक्ट्रिक दुचाकींना नोंदणी क्रमांक आणि चालक परवान्याची आवश्यकता नसल्याने संबंधितांवर कारवाई करताना अडचणी येत असल्याचे वाहतूक पोलिसांनी स्पष्ट केले आहे.
वाशी आणि कोपरखैरणे परिसरात स्विगी, झोमॅटो, उबर ईट्स यांसारख्या खाद्यपदार्थ वितरण कंपन्यांसह अमेझॉन, फ्लिपकार्ट आणि अजिओसारख्या ऑनलाइन खरेदी कंपन्यांचे डिलिव्हरी कर्मचारी मोठ्या प्रमाणावर इलेक्ट्रिक दुचाकींचा वापर करतात. ग्राहकांपर्यंत ऑर्डर कमी वेळेत पोहोचविण्याच्या स्पर्धेमुळे काही चालकांकडून वाहतुकीच्या नियमांकडे दुर्लक्ष होत असल्याच्या तक्रारी नागरिकांकडून केल्या जात आहेत.
चौकातील सिग्नल तोडणे, विरुद्ध दिशेने वाहन नेणे आणि वाहतुकीच्या प्रवाहात अचानक प्रवेश करणे यामुळे अन्य वाहनचालकांसह पादचाऱ्यांच्याही सुरक्षिततेचा प्रश्न निर्माण होत आहे. वेळेत डिलिव्हरी पूर्ण करण्याच्या दबावामुळे असे प्रकार घडत असल्याची चर्चा आहे.
कंपन्यांची बैठक
काही प्रकारच्या इलेक्ट्रिक दुचाकींना नोंदणी आणि वाहन परवान्याची आवश्यकता नसल्याने त्यांच्यावरील कारवाईबाबत कायदेशीर अडचणी येतात. या पार्श्वभूमीवर डिलिव्हरी कंपन्यांच्या प्रतिनिधींची बैठक घेऊन त्यांना वाहतूक नियम आणि सुरक्षिततेबाबत मार्गदर्शन करण्यात येणार आहे. याबाबत वाशी वाहतूक पोलिस शाखेचे वरिष्ठ पोलिस निरीक्षक सुनील कदम यांनी सांगितले, की काही वाहनांवर थेट कारवाई करण्यात अडचणी येतात. त्यामुळे वरिष्ठांच्या सूचनेनुसार संबंधित कंपन्यांचे मालक आणि अधिकाऱ्यांची बैठक घेण्यात येईल.
सकाळ+ चे सदस्य व्हा
ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!
शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.
Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.