वाहनतळाअभावी रस्त्यांवर वाहनांची गर्दी
कारखान्यांच्या आवारात वाहने लावण्याची मनसेची मागणी
रोहा, ता. ९ (बातमीदार) : रोहा औद्योगिक क्षेत्रात स्वतंत्र वाहनतळाची व्यवस्था नसल्याने कारखान्यांसमोरील रस्त्यांवर वाहने अनधिकृतपणे उभी केली जात आहेत. या समस्येकडे लक्ष वेधण्यासाठी महाराष्ट्र नवनिर्माण सेनेच्या पदाधिकाऱ्यांनी औद्योगिक विभागाच्या अधिकाऱ्यांना घेराव घालून जाब विचारला. वारंवार निवेदने देऊनही प्रश्न प्रलंबित असल्याने तातडीने कायमस्वरूपी उपाययोजना करण्याची मागणी करण्यात आली.
मनसेचे जिल्हा सचिव अमोल पेणकर, रोहा तालुकाध्यक्ष अक्षय रटाटे, धाटाव विभागाध्यक्ष महेश वाडकर, प्रताप खंडारे, नितीन मोंडे, अक्षय सावंत, रुपेश कराळे, साहिल म्हसकर आणि रोहित चव्हाण यांनी या आंदोलनात सहभाग घेतला. या वेळी कारखान्यांसमोरील मुख्य रस्त्यावर अनधिकृतपणे उभी असलेली वाहने अधिकाऱ्यांना दाखविण्यात आली. संबंधित वाहने कंपनीच्या आवारात उभी करण्यास भाग पाडण्यात आले.
वाहनतळासाठी वारंवार निवेदने देऊनही ठोस कार्यवाही का झाली नाही, वाहनतळासाठी जागा कधी निश्चित होणार आणि कायमस्वरूपी व्यवस्था होईपर्यंत वाहनांसाठी पर्यायी व्यवस्था काय, असे प्रश्न उपस्थित करण्यात आले. औद्योगिक विभाग आणि संबंधित कारखान्यांनी समन्वय साधून वाहनांच्या पार्किंगचे नियोजन करावे तसेच तोपर्यंत कंपन्यांनी आपल्या आवारात वाहनांसाठी जागा उपलब्ध करून द्यावी, अशी मागणी करण्यात आली.
वाहतूक कोंडी टाळण्याचे आव्हान
औद्योगिक क्षेत्रातील रस्त्यांवर वाहने उभी राहिल्याने वाहतुकीस अडथळा निर्माण होण्याची शक्यता आहे. त्यामुळे स्वतंत्र वाहनतळाची व्यवस्था होईपर्यंत कंपन्यांच्या आवारात वाहनांच्या पार्किंगचे नियोजन करणे आवश्यक आहे. प्रशासनाने या प्रश्नावर तातडीने निर्णय घेऊन त्याची प्रत्यक्ष अंमलबजावणी करावी, अशी मनसेची भूमिका आहे.
सकाळ+ चे सदस्य व्हा
ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!
शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.
Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.