स्वच्छतेचे पालकत्व अन् जनसहभागाची धडपड
नाईकांच्या सुगंधी शहराचे स्वप्न साकारण्यासाठी नवी मुंबईकर सज्ज
सकाळ वृत्तसेवा
नवी मुंबई, ता. ९ : वनमंत्री गणेश नाईक यांचे सुगंधी शहर हे संकल्पित स्वप्न आता लोकचळवळीचे रूप धारण करीत आहे. या अभियानाला वास्तवात आणण्यासाठी नागरिकांनी स्वतःहून सार्वजनिक जागांच्या स्वच्छतेचे पालकत्व स्वीकारण्याचा निर्धार केला आहे. या पार्श्वभूमीवर वाशी येथील प्रभाग क्रमांक १८ मध्ये सेवा संकल्प अभियानांतर्गत पार पडलेली जनसहभाग समन्वयक बैठक म्हणजे नागरी हक्क आणि कर्तव्याच्या सुंदर संगमाचा एक प्रत्यय ठरली.
वाशीमध्ये आयोजित या विशेष बैठकीत उपमहापौर दशरथ भगत यांची प्रमुख उपस्थिती होती. निवासी सोसायट्यांचे पदाधिकारी, व्यापारी, फेरीवाले, महापालिकेचे अधिकारी आणि स्वच्छता कामगार या सर्वांच्या उपस्थितीने बैठकीला एका सामाजिक बांधिलकीचे स्वरूप प्राप्त झाले. आरोग्य समिती सभापती डॉ. जयाजी नाथ, नगरसेवक निशांत भगत, नगरसेविका प्रीती संदीप भगत, समाजसेवक संदीप भगत आणि लोकशाहीर संदेश विठ्ठल उमप यांच्या उपस्थितीने या अभियानातील लोकसंस्कृती आणि सामाजिक सहभागाचा धागा अधिक घट्ट झाला. सुगंधी शहर अभियान आणि अंगण दत्तक योजनेच्या अंमलबजावणीबाबत भूमिका मांडताना नगरसेवक निशांत भगत यांनी हे केवळ प्रशासकीय अभियान नसून, शहरातील प्रत्येक लाभार्थ्याचे नैतिक दायित्व असल्याचे स्पष्ट केले. या योजनेची धुरा सांभाळणारे उपमहापौर दशरथ भगत यांनी नाईकांच्या शहराप्रति असलेल्या निस्सीम प्रेमाची आठवण करून दिली. यंदा मोरबे धरण परिसरात पाऊस कमी झाल्याने पाण्याचा तुटवडा निर्माण होऊ नये म्हणून प्रत्येक नागरिकाने पाण्याचा अपव्यय टाळावा, असे आवाहन त्यांनी केले.
मार्च २०२६ मध्ये वाशी गाव येथून महापौर सुजाता पाटील यांच्या हस्ते सुरू झालेल्या या सुगंधी अंगण दत्तक योजनेला आतापर्यंत एक लाखाहून अधिक नागरिकांनी स्वयंस्फूर्तीने प्रतिसाद दिला आहे. बैठकीदरम्यान सादर झालेल्या जनजागृतीपर पथनाट्याने उपस्थितांच्या मनाला स्पर्श केला.
सकाळ+ चे सदस्य व्हा
ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!
शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.
Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.