मराठी चित्रपट परीक्षण - आदि अनंत
आजोबा-नातवाच्या नात्याची भावस्पर्शी कहाणी
आजोबा आणि नातू यांचे नाते हे केवळ रक्ताचे नसते, तर त्या नात्यामध्ये अमाप जिव्हाळा आणि प्रेम असते. त्या नात्यामध्ये माया, विश्वास आणि असंख्य सुंदर आठवणींचा एक बंध गुंफलेला असतो. आजोबा म्हणजे अनुभवाची शिदोरी, प्रेमाचा अथांग सागर आणि संस्कारांचा वटवृक्ष, तर नातू म्हणजे त्यांच्या आयुष्यातील आनंदाचा नवा अंकुर. दोन वेगवेगळ्या पिढ्यांमधील हा संवाद, त्यांच्यातील निरागस मैत्री आणि एकमेकांशी जोडलेली भावनिक नाळ अनेकदा नकळत मनाला स्पर्शून जाते. याच आजोबा आणि नातवाच्या नात्यातील भावविश्व उलगडणारा चित्रपट म्हणजे ‘आदि अनंत’. दिग्दर्शक महेश लिमयेने आजोबा आणि त्यांचा नातू यांची हृदयस्पर्शी आणि हळवी अशी कथा या चित्रपटामध्ये मांडली आहे. ही केवळ आजोबा आणि त्यांचा नातू यांची कहाणी नाही, तर विचार करायला भाग पाडणारी अशी कथा आहे.
ही कथा आहे अनंत भालेराव (अशोक सराफ) आणि आदित्य भालेराव (संकर्षण कऱ्हाडे) या आजोबा आणि नातवाची. आदिला अभिनेता व्हायचे असते आणि त्याचे ते स्वप्न असते. त्यासाठी तो सतत संघर्ष करीत असतो. कित्येक ठिकाणी तो ऑडिशन्स देत असतो; परंतु त्याचे नशीब काही त्याला साथ देत नसते. आपल्या करिअरबरोबरच त्याच्या आयुष्यात आजोबांचे मोठे आणि महत्त्वाचे स्थान असते. त्याच्या स्वतःच्या करिअरसाठी चाललेली धडपड आणि आजोबांची देखभाल एवढेच त्याचे छोटेसे जग. त्या दोघांचेही आयुष्य छान चाललेले असतानाच त्यांच्या जीवनात गायत्री (सखी गोखले) नावाची तरुणी येते. ही गायत्री अनंत यांच्या मित्राची नात असते. गायत्रीचे आजोबा आणि अनंत यांनी एकत्र काम केलेले असते. त्यामुळे गायत्रीचे त्यांच्या घरी येणे-जाणे सुरू होते. या भेटीगाठीतून गायत्री आणि आदि यांच्यामध्ये प्रेमाचा फुलोरा हळुवार फुलत जातो. मग अशी एक अनपेक्षित घटना घडते की त्यामुळे आदित्यचे जीवनच बदलून जाते. मग आजोबांची जबाबदारी आणि स्वतःचे स्वप्न यामध्ये तो अडकतो. त्या वेळी नेमके काय करावे ते त्याला सुचत नाही. त्यानंतर तो काय आणि कसे निर्णय घेतो...त्यांच्या नात्यातील गोडवा कायम राहतो की आणखीन काही होते...यासारख्या प्रश्नांची उत्तरे मिळविण्यासाठी हा चित्रपट पाहावा लागेल.
अभिनयाच्या बाबतीत बोलायचे झाल्यास ज्येष्ठ अभिनेते अशोक सराफ हे एक अष्टपैलू अभिनेते आहेत. विनोदी भूमिकांबरोबरच गंभीर आणि संवेदनशील भूमिका ते तितक्याच तन्मयतेने साकारीत असतात. या भूमिकेतही त्यांनी आपले अष्टपैलुत्व सिद्ध केले आहे. आजोबांच्या मनातील विविध भावभावना आणि वेदना त्यांनी उत्तमरीत्या व्यक्त केल्या आहेत. संकर्षण कऱ्हाडेलाही आदित्यच्या भूमिकेत अभिनयाचे वेगवेगळे पैलू दाखवण्याची संधी मिळाली आहे. तरुण पिढीची स्वप्ने, त्याकरिता करावा लागणारा संघर्ष आणि भावनिक गुंतागुंत असे या भूमिकेचे बेअरिंग त्याने उत्तम प्रकारे पकडले आहे. अभिनेत्री सखी गोखले हिने साकारलेली गायत्रीही लक्षात राहणारी आहे. वैदेही परशुरामी, योगेश शिरसाट आणि कविता मेढेकर या कलाकारांनीही आपापल्या वाट्याला आलेल्या भूमिका उत्तम प्रकारे निभावल्या आहेत.
अभिनेता रितेश विलासराव देशमुख आणि महेश लिमये यांची छोटीशी झलक मनाला सुखावणारी आहे. चित्रपटातील संवाद हलकेफुलके आणि दमदार आहेत. अविनाश-विश्वजित यांनी या कथेला साजेसे संगीत दिले आहे. सिनेमॅटोग्राफर महेश लिमये आणि तन्मय वनमाळी यांनी आपल्या कॅमेऱ्याची जादू दर्शविली आहे. चित्रपटाचा पूर्वार्ध काहीसा संथ असला तरी उत्तरार्धात चांगली पकड घेणारी ही कथा आहे. हा चित्रपट आजोबा आणि नातू यांची हळवी आणि भावनिक कथा सांगणारा असला तरी आजच्या धावपळीच्या जीवनामध्ये नातेसंबंध किती महत्त्वाचे आहेत...नात्यामध्ये ओलावा जपणे किती आवश्यक आहे आणि एकमेकांना वेळ देणे किती महत्त्वाचे आहे, हे सांगणारा आहे.
- साडेतीन स्टार
सकाळ+ चे सदस्य व्हा
ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!
शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.
Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.