उल्हासनगर, ता. १३ : अनेक वर्षांपासून उल्हासनगरातील सुभाष टेकडी परिसरात पिण्याच्या पाण्याचा प्रश्न कायम आहे. या भागात प्रामुख्याने रात्रीच्या वेळी पाणी सोडले जात असल्याने नागरिकांना पाण्यासाठी जागरण करावे लागत आहे. त्यामुळे हा परिसर पाण्याच्या समस्येसाठी ओळखला जाऊ लागला आहे. ‘पाणीवाले बाबा’ म्हणून परिचित असलेले सामाजिक कार्यकर्ते संजय वाघमारे हे पाणीपुरवठा विभागाच्या अधिकाऱ्यांशी समन्वय साधून पाणी सोडण्याची वेळ समाजमाध्यमांवरून नागरिकांना कळवतात. त्यामुळे नागरिकांना पाणी भरणे शक्य होत असले, तरी पाणीपुरवठ्याची एक निश्चित वेळ ठरवावी, अशी मागणी जोर धरू लागली आहे.
दहाचाळ, भीमशक्ती, डिफेन्स, अशोक वन, बुद्ध कॉलनी, महात्मा फुले कॉलनी, सर्टिफाय स्कूल, सुभाष टेकडी, साईबाबा, आम्रपाली, पंचशील, सिद्धार्थ हाउसिंग सोसायटी, गुरुद्वारा आदी परिसरांत सायंकाळी सहा वाजल्यापासून पाण्याची प्रतीक्षा सुरू होते. मात्र, प्रत्यक्षात कधी रात्री नऊ, कधी अकरा, तर कधी त्याहून उशिरा पाणी सोडले जाते. त्यामुळे नागरिकांचे दैनंदिन वेळापत्रक विस्कळित होत आहे. पाणी येण्याची वेळ आधीच कळल्यास नागरिकांना आवश्यक तेवढा पाणीसाठा करता येतो. मात्र, वेळ निश्चित नसल्याने त्यांना झोपमोड करून पाण्याची प्रतीक्षा करावी लागते. त्यामुळे महापालिकेच्या पाणीपुरवठा विभागाने या समस्येकडे लक्ष देऊन नियमित वेळापत्रक निश्चित करावे, अशी मागणी संजय वाघमारे यांनी केली आहे.
कमी दाबामुळे वेळेत बदल
पाणीपुरवठा विभागाचे कार्यकारी अभियंता अशोक घुले आणि उपअभियंता दीपक ढोले यांच्याशी यासंदर्भात संपर्क साधला असता, कमी दाबाने पाणीपुरवठा झाल्यास पाणी भरण्यास अडचणी येतात. त्यामुळे पाणी सोडण्याच्या वेळेत बदल होत असल्याचे त्यांनी सांगितले.
सकाळ+ चे सदस्य व्हा
ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!
शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.
Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.