सकाळ वृत्तसेवा
ठाणे, ता.१३ : थकीत सोनेतारण कर्ज सोडवून तेच सोने दुसऱ्या बँकेत तारण ठेवून अधिक कर्ज मिळवून देण्याच्या व्यवसायात २० टक्के परतावा देण्याचे प्रलोभन दाखवून एका फायनान्स कंपनीच्या व्यवस्थापकाची २१ लाख ९३ हजार ५२३ रुपयांची फसवणूक झाल्याचा प्रकार समोर आला आहे. याप्रकरणी चंद्रबली यादव, जितेंद्र प्रजापती आणि बिजेश गिरी या तिघांविरोधात कासारवडवली पोलिस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे.
राजेशकुमार यादव हे पुण्यातील एका फायनान्स कंपनीत फायनान्स हेड म्हणून कार्यरत आहेत. मार्च २०२४ मध्ये नोकरीच्या शोधात असताना त्यांची ओळख असलेल्या चंद्रबली यादव याने यश्वी फायनान्स हब या संस्थेमार्फत सोनेतारण कर्जाचे व्यवहार केले जात असल्याचे सांगितले. या व्यवसायात गुंतवणूक केल्यास २० टक्के परतावा मिळेल, असे प्रलोभन दाखवले. विश्वास संपादन करण्यासाठी सुरुवातीला कमिशनची रक्कमही परत करण्यात आली. त्यानंतर यादव यांनी टप्प्याटप्प्याने एकूण ४६ लाख ३० हजार २३ रुपये तिघांच्या बँक खात्यांवर वर्ग केले. त्यापैकी २४ लाख ३६ हजार ५०० रुपये परत करण्यात आले. मात्र, उर्वरित २१ लाख ९३ हजार ५२३ रुपये देण्यास टाळाटाळ करण्यात आली. अखेर यादव यांनी न्यायालयात तक्रार दाखल केल्यानंतर कासारवडवली पोलिसांकडेही धाव घेतली. पुढील तपास पोलिसांमार्फत सुरू आहे.