ठाणे, ता. १३ (बातमीदार) : मनोरुग्णांचे मनोबल वाढविण्यासोबतच त्यांना वेळेत योग्य उपचार आणि पुनर्वसनाच्या संधी उपलब्ध करून देणे आवश्यक आहे. सरकारकडून यासाठी प्रयत्न सुरू असून सेवाभावी संस्था आणि सामाजिक संघटनांनीही या कार्यात सहभागी व्हावे. सर्वांच्या एकत्रित प्रयत्नांतून मनोरुग्ण उपचारानंतर व्यावसायिक कौशल्याच्या बळावर स्वावलंबी होतील आणि पुन्हा समाजाच्या मुख्य प्रवाहात येऊ शकतील. यासाठी अधिकाधिक सामाजिक संस्थांनी पुढाकार घ्यावा, असे आवाहन सार्वजनिक आरोग्य विभागाचे प्रधान सचिव तथा राज्य मानसिक आरोग्य प्राधिकरणाचे अध्यक्ष डॉ. निपुण विनायक यांनी केले.
ठाणे प्रादेशिक मनोरुग्णालयात औषधोपचारांसोबतच व्यवसायोपचार, जीवनकौशल्य प्रशिक्षण आणि पुनर्वसनावर भर दिला जात आहे. डॉ. विनायक यांनी दिवाळीदरम्यान रुग्णालयाला भेट देऊन स्त्री व पुरुष रुग्णकक्ष, आरोग्य सुविधा, उपचारपद्धती आणि पुनर्वसन प्रक्रियेची पाहणी केली. महिला व्यवसायोपचार विभागातील कौशल्यविकास उपक्रमांचे त्यांनी विशेष कौतुक केले. सामाजिक संस्थांच्या सहकार्याने पुढील महिन्यात रुग्णांसाठी नावीन्यपूर्ण उपक्रम सुरू करण्याचे आवाहन डॉ. विनायक यांनी केले. यासंदर्भात चर्चा करून नियोजन करण्यासाठी पुढील महिन्यात पुन्हा रुग्णालयाला भेट देणार असल्याचे त्यांनी सांगितले. यावेळी वैद्यकीय अधीक्षक डॉ. नेताजी मुळीक यांनी रुग्णालयातील विविध सेवांची माहिती दिली.
या वेळी आरोग्य अभियानाचे आयुक्त डॉ. सुनील भोकरे, उपसचिव राजश्री सारंग, अतिरिक्त संचालक (मानसिक आरोग्य) डॉ. श्रीनिवास कोलोड, राज्य मानसिक आरोग्य प्राधिकरणाच्या सदस्य अनुराधा बिडवे, अकीला महेश्वरी, सरस्वती सुरेश, अगस्तू फाऊंडेशन व बॅनियान संस्थेचे प्रतिनिधी, तसेच डॉ. सुहास माने, डॉ. अमोल भुसारे, डॉ. प्राची चिवटे, यशोदा नाईक आणि रुग्णालयातील अधिकारी व कर्मचारी उपस्थित होते.
रुग्णांशी मनमोकळा संवाद
पाहणीदरम्यान डॉ. विनायक यांनी रुग्णांशी मनमोकळा संवाद साधत त्यांच्या वैयक्तिक व कौटुंबिक परिस्थितीची विचारपूस केली. उपचार, औषधे, आहार आणि सुविधांबाबत माहिती घेतली. रुग्णांनीही मिळणाऱ्या सुविधांबाबत समाधान व्यक्त केले. मनोरंजनगृहात रुग्णांनी मराठी व हिंदीतील जुनी गाणी आणि प्रार्थना सादर करून आपल्यातील कलागुणांची झलक दाखवली.
सकाळ+ चे सदस्य व्हा
ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!
शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.
Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.