नवी मुंबईत नाट्यसंस्कृतीला नवे बळ
नाट्यप्रयोगांना वाढता प्रतिसाद
कोपरखैरणे ता. १४ (बातमीदार) : एकेकाळी केवळ मुंबई आणि ठाण्यापुरती मर्यादित मानली जाणारी मराठी नाट्यसंस्कृती आता नवी मुंबईतही मोठ्या जोमाने रुजत आहे. नाट्यप्रेमींचा वाढता प्रतिसाद आणि प्रयोगांच्या वाढत्या संख्येमुळे शहराचे सांस्कृतिक विश्व झपाट्याने विस्तारत आहे. वाशी येथील विष्णुदास भावे नाट्यगृहात पूर्वी केवळ रविवार किंवा सार्वजनिक सुट्ट्यांच्या दिवशीच नाट्यप्रयोग रंगायचे; मात्र आता आठवड्याच्या इतर दिवशीही प्रयोगांची संख्या लक्षणीयरीत्या वाढली आहे. गंभीर, आशयघन आणि सामाजिक विषयांवरील नाटकांपासून ते निखळ विनोदी व मनोरंजनप्रधान नाटकांपर्यंत सर्वच प्रकारच्या कलाकृतींना नवी मुंबईकर रसिकांची मोठी पसंती मिळत आहे.
वाशी येथील विष्णुदास भावे नाट्यगृहाच्या उत्पन्नातूनही नाट्यसंस्कृती वाढत असल्याचे स्पष्ट होते. २०२३-२४ मध्ये या नाट्यगृहात नाटकांसह विविध प्रकारचे ५४६ प्रयोग झाले. त्यातून सुमारे दीड कोटी रुपयांचे उत्पन्न मिळाले. २०२४-२५ मध्ये प्रयोगांची संख्या वाढून ६०० वर पोहोचली आणि उत्पन्न एक कोटी ६० लाख रुपये झाले, तर २०२५-२६ मध्ये तब्बल ६३२ प्रयोगांचे आयोजन करण्यात आले. या वर्षात नाट्यगृहाला सुमारे दोन कोटी रुपयांचे उत्पन्न प्राप्त झाले. तीन वर्षांतील प्रयोगांची एकूण संख्या १,७७८ इतकी झाली असून, हे ही आकडेवारी नवी मुंबईची नाट्य संस्कृतीला मिळणाऱ्या वाढत्या प्रतिसादाची साक्ष आहे.
नाट्यप्रयोगांची वाढती संख्या लक्षात घेता नाट्यसंस्थांना विशेषतः रविवार आणि सार्वजनिक सुट्ट्यांच्या दिवशी प्रयोगांसाठी नाट्यगृह मिळवताना अडचणींचा सामना करावा लागतो. लोकप्रिय नाटकांचे प्रयोग प्रेक्षकांच्या मागणीनुसार आयोजित करण्यासाठी अधिक सुविधा उपलब्ध असणे आवश्यक आहे. त्यामुळे शहराच्या विविध भागांत नवीन नाट्यगृहे उभारण्याची मागणीदेखील नाट्यसंस्था आणि नाट्यप्रेमींकडून होत आहे.सध्या वाशी आणि ऐरोली येथे नाट्यगृहे असून, वाढती लोकसंख्या आणि सांस्कृतिक उपक्रमांची गरज लक्षात घेता शहरात आणखी नवीन नाट्यगृहे उभारण्याची गरज भासू लागली आहे.
नवी मुंबईतील नाट्यसंस्कृतीचा विस्तारासाठी नाट्यगृहांची संख्या वाढवतानाच तिथे कलाकार, नाट्यसंस्थांचे पदाधिकारी, तंत्रज्ञ आणि पडद्यामागील कर्मचाऱ्यांसाठी आवश्यक सुविधा उपलब्ध करून देणेही तितकेच महत्त्वाचे ठरणार आहे. विष्णुदास भावे नाट्यगृहाला मिळणारा वाढता प्रतिसाद पाहता नवी मुंबई आता केवळ निवासी आणि औद्योगिक शहर न राहता सांस्कृतिक उपक्रमांचेही महत्त्वाचे केंद्र म्हणून पुढे येत आहे.
सकाळ+ चे सदस्य व्हा
ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!
शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.
Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.