वसई-विरारला कोंडीचा विळखा
महामार्गासह अंतर्गत रस्त्यांवर वाहनांच्या रांगा
वसई, ता. १३ (बातमीदार) : वसई-विरार शहरातील वाहतूक व्यवस्थेचा प्रश्न दिवसेंदिवस गंभीर होत असून, महामार्गापासून अंतर्गत रस्त्यांपर्यंत वाहतूक कोंडीचा विळखा घट्ट होत आहे. वाढती लोकसंख्या, वाहनांची संख्या, अनधिकृत पार्किंग आणि रस्त्यांवरील अतिक्रमणांमुळे नागरिकांना दररोज मनस्ताप सहन करावा लागत आहे. विशेषतः कामावर जाणारे चाकरमानी, विद्यार्थी आणि वाहनचालकांचा मौल्यवान वेळ वाहतूक कोंडीत वाया जात आहे.
२५ लाखांहून अधिक लोकसंख्या असलेल्या वसई-विरारमध्ये नागरी व औद्योगिक वसाहतींचा झपाट्याने विस्तार झाला आहे. मुंबई आणि ठाणे परिसरात दररोज ये-जा करणाऱ्या हजारो चाकरमान्यांना सकाळी आणि सायंकाळी कोंडीचा सामना करावा लागतो. नालासोपारा येथील तुळींज रोड, आचोळे मार्ग, एव्हरशाईन सिटी, वसंत नगरी तसेच वसई-विरारमधील उड्डाणपुलांवर वाहनांच्या लांबच लांब रांगा लागत आहेत.
विरारमधील मनवेलपाडा रोड, वसईतील माणिकपूर आणि अंबाडी मार्गावर अनधिकृत रिक्षा पार्किंग व फेरीवाल्यांच्या अतिक्रमणांमुळे वाहतुकीचे तीनतेरा वाजले आहेत. पादचाऱ्यांनाही रस्त्यावरून चालणे कठीण झाले आहे. दुसरीकडे सातिवली, वालीव आणि पेल्हार या औद्योगिक पट्ट्यांत अवजड वाहनांची सतत वर्दळ असल्याने वाहतूक कोंडीत भर पडत आहे. त्याचा परिणाम वसई फाटा आणि मुंबई-अहमदाबाद राष्ट्रीय महामार्गावरील वाहतुकीवरही होत आहे.वाहतूक कोंडीचा फटका केवळ वाहनचालकांनाच नव्हे, तर रुग्णवाहिका आणि शालेय बसनाही बसत आहे. रुग्णांना वेळेत रुग्णालयात पोहोचविणे आणि विद्यार्थ्यांना शाळेत जाणे कठीण होत आहे. वाहनांच्या लांबच लांब रांगा, सतत सुरू असलेली इंजिने आणि इंधनाचा अपव्यय यामुळे प्रदूषणाची समस्याही गंभीर होत आहे.
शहरातील वाहतूक कोंडीची समस्या नित्याची झाली असताना त्यावर कायमस्वरूपी उपाययोजना होत नसल्याची नागरिकांची तक्रार आहे. महापालिका प्रशासन आणि वाहतूक पोलिसांनी समन्वयाने नियोजन करून अनधिकृत पार्किंग व अतिक्रमणे हटवावीत, प्रमुख चौकांमध्ये वाहतूक नियंत्रणाची प्रभावी व्यवस्था करावी आणि अवजड वाहनांच्या वाहतुकीचे नियमन करावे, अशी मागणी होत आहे.
"वसई-विरार शहरातील वाहतूक कोंडीची समस्या नित्याची झाली आहे. प्रशासनाची अनास्था दिसून येत असून, तातडीने अतिक्रमणे हटवून वाहतुकीचे योग्य नियोजन करणे आवश्यक आहे." - पंकज देशमुख, नगरसेवक, महापालिका.
सकाळ+ चे सदस्य व्हा
ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!
शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.
Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.