जेवणाच्या बिलावरून गोवंडीत दोन गटांत तुफान राडा
नऊ आरोपींविरोधात गुन्हे दाखल; सात जण पोलिसांच्या ताब्यात
घाटकोपर, ता. १३ (बातमीदार) ः हॉटेलमधील जेवणाचे बिल भरण्यावरून झालेल्या वादाचे पर्यवसान दोन गटांतील हिंसक हाणामारीत झाल्याची घटना गोवंडी परिसरात घडली. या वादातून एका गटाने वाहनांची तोडफोड केली, तर दुसऱ्या गटातील तरुणाला काठीला बांधून बेदम मारहाण करण्यात आली.
या घटनेचा व्हिडिओ सोशल मीडियावर व्हायरल झाल्याने परिसरात खळबळ उडाली. याप्रकरणी गोवंडी पोलिसांनी नऊ आरोपींविरोधात गुन्हे दाखल केले असून, त्यापैकी सात जणांना ताब्यात घेतले आहे. उर्वरित आरोपींचा शोध सुरू असल्याची माहिती पूर्व प्रादेशिक विभागाचे परिमंडळ एकचे पोलिस उपायुक्त समीर शेख यांनी दिली. ११ नोव्हेंबरला दुपारी एक ते दोनच्या सुमारास गोवंडी पोलिस ठाण्याच्या हद्दीतील स्टार चायनीज हॉटेलमध्ये जेवणाचे पैसे न भरल्याच्या कारणावरून अशोकनगर आणि आनंदनगर परिसरातील तरुणांमध्ये वाद झाला होता. या किरकोळ वादाचा राग मनात धरून दोन्ही गटांतील तरुण पुन्हा आमनेसामने आले. त्यातून १२ नोव्हेंबरच्या पहाटे चार ते पाचच्या सुमारास गोवंडी परिसरात दोन स्वतंत्र घटना घडल्या.
या वेळी एका गटातील तरुणांनी दुसऱ्या गटातील एका तरुणाला काठीला बांधून बेदम मारहाण केली. तर दुसऱ्या गटाने वाहनांची तोडफोड करून ती पळवून नेण्याचा प्रयत्न केल्याचे समोर आले. जेवणाच्या बिलावरून सुरू झालेल्या वादाने गंभीर स्वरूप धारण केल्याने परिसरात तणावाचे वातावरण निर्माण झाले. याप्रकरणी पोलिसांनी शुक्रवारी (ता. १३) दोन्ही घटनांबाबत स्वतंत्र गुन्हे दाखल करून नऊ जणांविरोधात कारवाई सुरू केली आहे. त्यापैकी सात आरोपींना ताब्यात घेण्यात आले.
सकाळ+ चे सदस्य व्हा
ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!
शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.
Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.