कल्याण, ता. १५ (वार्ताहर) : कल्याण-डोंबिवली महापालिकेच्या शाळांमधील ३० विद्यार्थ्यांना भारताच्या अंतराळ संशोधनाची माहिती प्रत्यक्ष जाणून घेण्याची संधी मिळणार आहे. मुख्यमंत्री विद्यार्थी विज्ञान वारी योजनेअंतर्गत हे विद्यार्थी बंगळुरू येथील भारतीय अंतराळ संशोधन संस्था (इस्रो) येथे भेट देणार आहेत.
महापालिकेच्या शाळांमध्ये आयोजित विज्ञान प्रदर्शनात उत्कृष्ट कामगिरी करणाऱ्या विद्यार्थ्यांची या दौऱ्यासाठी निवड करण्यात आली आहे. विद्यार्थ्यांना विज्ञानाची पुस्तकी माहिती मिळण्याबरोबरच प्रत्यक्ष संशोधन कसे केले जाते, याची ओळख व्हावी, हा या उपक्रमाचा उद्देश आहे. या भेटीदरम्यान विद्यार्थ्यांना इस्रोच्या विविध विभागांची माहिती मिळणार आहे. तसेच उपग्रह कसे तयार केले जातात, रॉकेटचे प्रक्षेपण कसे होते, अंतराळ मोहिमा कशा राबवल्या जातात आणि त्यासाठी कोणत्या तंत्रज्ञानाचा वापर केला जातो, हे त्यांना समजून घेता येणार आहे. याशिवाय इस्रोमधील शास्त्रज्ञांशी थेट संवाद साधण्याची संधीही विद्यार्थ्यांना मिळणार आहे.
भारताच्या चांद्रयान आणि मंगळयान यांसारख्या महत्त्वाच्या अंतराळ मोहिमांची माहितीही विद्यार्थ्यांना मिळणार आहे. या मोहिमांसाठी शास्त्रज्ञांनी केलेले संशोधन आणि घेतलेली मेहनत समजून घेता येणार आहे. महापालिका शाळांमधील विद्यार्थ्यांनाही योग्य संधी आणि मार्गदर्शन मिळाल्यास ते भविष्यात शास्त्रज्ञ, अभियंते आणि अंतराळ संशोधक होऊ शकतात. या दौऱ्यामुळे विद्यार्थ्यांमध्ये विज्ञानाची आवड निर्माण होण्यास आणि त्यांचा आत्मविश्वास वाढण्यास मदत होणार आहे. या दौऱ्यात विद्यार्थ्यांसोबत शिक्षक आणि महापालिकेच्या शिक्षण विभागातील अधिकारीही सहभागी होणार आहेत. दौऱ्याचे नियोजन आणि आवश्यक व्यवस्था महापालिकेच्या शिक्षण विभागामार्फत करण्यात येत आहे.
सकाळ+ चे सदस्य व्हा
ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!
शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.
Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.