उल्हासनगर, ता. १५ (वार्ताहर) : उल्हास नदीच्या प्रदूषणाचे कारण देत गणेश विसर्जनाला बंदी घालण्यात आली होती. मग त्याच नदीत छठपूजेला परवानगी कशी दिली जाते, असा सवाल उपस्थित करत मनसेने महापालिका प्रशासनाला धारेवर धरले आहे. अँटेलिया घाटावर छठपूजेच्या तयारीला सुरुवात होताच हा वाद उफाळला असून, मनसेचे जिल्हाध्यक्ष बंडू देशमुख यांनी प्रशासनाच्या दुहेरी भूमिकेवर प्रश्नचिन्ह उपस्थित केले आहे. या मुद्द्यावरून सत्ताधारी शिवसेना शिंदे गटालाही लक्ष्य करण्यात आले आहे.
छठ महापर्वाच्या पार्श्वभूमीवर अँटेलिया घाटावरील तयारीवरून उल्हासनगरात राजकीय वाद निर्माण झाला आहे. देशमुख यांनी महापालिका प्रशासन आणि सत्ताधारी शिवसेना शिंदे गटाच्या महापौर अश्विनी निकम यांच्यावर दुजाभावाचा आरोप केला आहे. याच घाटावर जलप्रदूषणाचे कारण पुढे करत गणेश विसर्जनाला बंदी घातली होती. मात्र, आता त्याच नदीत छठपूजेला परवानगी कशी दिली जाते? छठपूजेमुळे उल्हास नदीचे प्रदूषण होणार नाही का? असा सवाल देशमुख यांनी उपस्थित केला आहे. यापूर्वी छठपूजेनंतर उल्हास नदी बचाव समितीच्या सदस्यांनी नदीपात्रातून मोठ्या प्रमाणात निर्माल्य आणि कचरा बाहेर काढला होता. त्यामुळे पर्यावरणप्रेमींनीही नदीच्या प्रदूषणाबाबत चिंता व्यक्त केली आहे.
महापालिका उपायुक्त स्नेहा करपे यांनी घाट परिसरात अस्वच्छता होऊ नये, यासाठी कठोर निर्देश दिल्याचे सांगितले. महापौर अश्विनी निकम यांच्याशी संपर्क साधण्याचा प्रयत्न केला असता त्यांची प्रतिक्रिया मिळू शकली नाही. त्यामुळे गणेश विसर्जन आणि छठपूजेसाठी वेगवेगळे निकष का, हा प्रश्न ऐरणीवर आला आहे.
सकाळ+ चे सदस्य व्हा
ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!
शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.
Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.