सकाळ वृत्तसेवा
ठाणे, ता. १५ : पंतप्रधान नरेंद्र मोदी यांचा महत्त्वाकांक्षी प्रकल्प असलेल्या मुंबई-अहमदाबाद बुलेट ट्रेनच्या ठाणे स्थानक परिसराचा विकास आराखडा तयार करण्याचे काम रखडले आहे. या परिसरात बुलेट ट्रेनबरोबरच वर्तुळाकार मेट्रो, मेट्रो मार्गिका क्रमांक १४ आणि जलमार्गाची जोडणी करण्याचे नियोजन आहे. मात्र, या जोडण्यांचे नियोजन अद्याप पूर्ण झालेले नाही. त्यामुळे सहा महिन्यांच्या मुदतीत स्थानिक क्षेत्र विकास आराखड्याचा (लोकल एरिया प्लॅन) मसुदा प्रसिद्ध करणे ठाणे महापालिकेला शक्य झाले नाही. त्यामुळे आता या आराखड्याचा इरादा पुन्हा जाहीर करण्याची वेळ महापालिकेवर आली आहे.
मुंबई-अहमदाबाद हायस्पीड रेल्वे कॉरिडॉरअंतर्गत ठाणे येथे बुलेट ट्रेनचे स्थानक उभारण्यात येणार आहे. या स्थानकाच्या सभोवतालच्या परिसराचा नियोजनबद्ध विकास करण्यासाठी स्थानिक क्षेत्र विकास आराखडा तयार करण्याचे प्रस्तावित आहे. त्यासाठी ४७८ हेक्टर क्षेत्र निश्चित करण्यात आले असून, त्यातील २१८ हेक्टर ठाणे महापालिका, तर २६० हेक्टर क्षेत्र कल्याण-डोंबिवली महापालिका हद्दीत येते. दोन्ही महापालिकांच्या क्षेत्राचे एकत्रित नियोजन करणे आवश्यक आहे.
महाराष्ट्र प्रादेशिक नियोजन व नगररचना अधिनियमात २९ ऑगस्ट २०२५ रोजी सुधारणा करून स्थानिक क्षेत्र विकास आराखड्याबाबत तरतुदी करण्यात आल्या. त्यानुसार ठाणे पालिकेने २८ ऑक्टोबर २०२५ रोजी बुलेट ट्रेन स्थानक परिसरासाठी आराखडा तयार करण्याचा इरादा जाहीर केला होता. मात्र, कायद्यातील तरतुदीनुसार सहा महिन्यांच्या कालावधीत आराखड्याचा मसुदा प्रसिद्ध करणे आवश्यक असताना ते शक्य झाले नाही.
विलंबाची कारणे
या परिसरातील विविध वाहतूक प्रकल्पांच्या जोडणीचे नियोजन अपूर्ण आहे, हे प्रमुख कारण आहे. ठाणे स्थानक परिसरात वर्तुळाकार मेट्रोची जोडणी करण्याचे नियोजन महामेट्रोकडून सुरू आहे, तर एमएमआरडीएमार्फत मेट्रो मार्गिका क्रमांक १४ ची जोडणी करण्याचे नियोजन सुरू आहे. याशिवाय स्थानकाच्या उत्तरेला उल्हास नदीवर जलमार्गासाठी जेट्टी प्रस्तावित आहे. या जेट्टीचे नियोजन महाराष्ट्र सागरी महामंडळामार्फत केले जात आहे. या तिन्ही जोडण्यांबाबत संबंधित यंत्रणांची नियोजन प्रक्रिया अद्याप पूर्ण झाली नसल्याने ठाणे महापालिकेला स्थानिक क्षेत्र विकास आराखड्याचा मसुदा तयार करून प्रसिद्ध करता आलेला नाही.
महासभेच्या पटलावर प्रस्ताव
आराखडा तयार करण्याचा इरादा नव्याने जाहीर करणे आवश्यक असल्याचे महापालिकेच्या प्रस्तावात नमूद केले आहे. त्यासाठी आयुक्तांची प्रशासकीय मंजुरी मिळाली आहे. आता हा प्रस्ताव महासभेच्या मान्यतेसाठी सादर करण्यात येणार आहे.
- ४७८ हेक्टरमध्ये नियोजन
ठाणे महापालिका हद्द : २१८ हेक्टर
या गावांच्या काही भागांचा समावेश
दातिवली, म्हातार्डी, बेटवडे आणि आगासन
कल्याण-डोंबिवली पालिका हद्द : २६० हेक्टर
या गावांच्या काही भागांचा समावेश
आयरे, कोपर, भोपर, नांदिवली, पाचपाखाडी, काटई आणि उसरघर
सकाळ+ चे सदस्य व्हा
ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!
शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.
Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.