मुंबई

नियोजनबद्ध नवी मुंबईत कलादालनाची प्रतीक्षा कायम

CD

आधुनिक शहराला कलादालनाची प्रतीक्षा
चित्रकार, शिल्पकार, छायाचित्रकारांना मुंबईचा आधार
तुर्भे, ता. १५ (बातमीदार) : आधुनिक आणि नियोजनबद्ध शहर म्हणून देशभरात ओळख निर्माण केलेल्या नवी मुंबईने शिक्षण, उद्योग, क्रीडा, स्वच्छता आणि पायाभूत सुविधांच्या क्षेत्रात उल्लेखनीय प्रगती केली आहे. आंतरराष्ट्रीय विमानतळामुळे शहराच्या विकासाला नवी दिशा मिळत असतानाच सांस्कृतिक क्षेत्रातही विविध उपक्रम राबविले जात आहेत, मात्र शहराच्या सांस्कृतिक वैभवात भर घालणाऱ्या दृश्यकलेसाठी स्वतंत्र आणि सुसज्ज कलादालनाची उणीव अद्याप कायम आहे. त्यामुळे स्थानिक चित्रकार, शिल्पकार, छायाचित्रकार आणि सुलेखनकारांना आपल्या कलाकृतींचे प्रदर्शन भरविण्यासाठी मुंबईचा आधार घ्यावा लागत आहे.

नवी मुंबईत विविध कला प्रकारांत काम करणाऱ्या प्रतिभावान कलाकारांची मोठी संख्या आहे. पद्मश्री पुरस्काराने सन्मानित सुलेखनकार अच्युत पालव यांच्यासारख्या नामवंत कलाकारांमुळे शहराची ओळख राष्ट्रीय स्तरावर पोहोचली आहे. याशिवाय अनेक चित्रकार, शिल्पकार आणि छायाचित्रकार आपल्या कलाकृतींतून शहराच्या सांस्कृतिक विश्वात योगदान देत आहेत, मात्र या कलाकारांना स्वतःची कला नागरिकांपर्यंत पोहोचविण्यासाठी स्थानिक पातळीवर स्वतंत्र व्यासपीठ उपलब्ध नाही.

कलाकृतींचे प्रदर्शन भरविण्यासाठी कलाकारांना मुंबईतील जहांगीर आर्ट गॅलरी किंवा खासगी प्रदर्शनस्थळांचा पर्याय निवडावा लागतो. जहांगीर आर्ट गॅलरीमध्ये प्रदर्शनासाठी अनेक वर्षे प्रतीक्षा करावी लागत असल्याचे कलाकारांचे म्हणणे आहे. त्यात प्रवास, वेळ आणि प्रदर्शनाचा आर्थिक खर्च यांचीही भर पडते. नवी मुंबईतच प्रशस्त आणि आधुनिक सुविधांनी युक्त कलादालन उपलब्ध झाल्यास कलाकारांना मोठा दिलासा मिळू शकतो.

नवी मुंबई महापालिका आणि सिडकोकडून विविध सांस्कृतिक कार्यक्रमांचे आयोजन केले जाते. शहरात सांस्कृतिक सभागृहे असून, आगामी काळात नवीन नाट्यगृहांची उभारणीही प्रस्तावित आहे, मात्र दृश्यकलेसाठी स्वतंत्र कलादालन उभारण्याच्या दृष्टीने ठोस पावले अद्याप पडलेली नाहीत. नाट्यगृहांच्या परिसरात किंवा बहुउद्देशीय सांस्कृतिक केंद्रात स्वतंत्र कलादालन उभारण्याचा पर्याय उपलब्ध आहे.

सिडकोकडून खारघरमध्ये सांस्कृतिक केंद्र उभारण्याच्या हालचाली सुरू असताना नवी मुंबईतही अशा बहुउद्देशीय केंद्राची गरज व्यक्त होत आहे. या केंद्रात चित्रप्रदर्शने, शिल्पप्रदर्शने, सुलेखन आणि छायाचित्र प्रदर्शनांसह कला कार्यशाळा व विद्यार्थ्यांसाठी विविध उपक्रम राबविता येऊ शकतात. विविध राज्यांतील नागरिकांना आपल्या कला आणि संस्कृतीचे दर्शन घडविण्यासाठीही हे केंद्र उपयुक्त ठरू शकते.

कोट
शहराच्या सांस्कृतिक विकासाबाबत महापालिका सकारात्मक आहे. सर्व समाजघटकांसाठी विविध धोरणे आखली जात आहेत. नवी मुंबई सांस्कृतिकदृष्ट्याही संपन्न व्हावी, यासाठी प्रयत्नशील असून, आगामी काळात शहरात आर्ट गॅलरी उभारण्यासाठी धोरण आखले जाईल.

- सागर नाईक, सभागृह नेते

नवी मुंबई स्वच्छतेत देशात प्रथम आली आहे. आता शहर सांस्कृतिकदृष्ट्याही सक्षम होण्याची गरज आहे. शहरातील नाट्यगृहांमध्ये कलादालन उभारण्याचा विचार करता येईल. स्वतंत्र कलादालनामुळे नामवंत कलाकार नवी मुंबईत येतील आणि स्थानिक नागरिकांनाही त्यांच्या कलाकृती पाहण्याची संधी मिळेल. बहुउद्देशीय सांस्कृतिक केंद्रात कलादालनाचा समावेश केल्यास विविध राज्यांतील नागरिकांनाही आपली कला सादर करण्यासाठी व्यासपीठ मिळेल.
- अच्युत पालव, पद्मश्री सुलेखनकार

चौकट

सांस्कृतिक पर्यटनालाही मिळेल चालना
रस्ते, पूल आणि इमारतींच्या विकासासोबत शहराच्या सांस्कृतिक ओळखीचा विस्तार होणेही महत्त्वाचे आहे. आंतरराष्ट्रीय विमानतळामुळे देश-विदेशातील पर्यटकांचे लक्ष नवी मुंबईकडे वेधले जात असताना सांस्कृतिक पर्यटनालाही चालना देण्याची संधी आहे. त्यासाठी स्वतंत्र कलादालन महत्त्वाची भूमिका बजावू शकते. महापालिका कलादालन उभारण्याचे धोरण आखणार असल्याचे सांगत असली, तरी त्याची प्रत्यक्ष अंमलबजावणी कधी होणार आणि स्थानिक कलाकारांना हक्काचे व्यासपीठ कधी मिळणार, याकडे कलाविश्वाचे लक्ष लागले आहे.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

रुपाली चाकणकरांनी दिला कायदेशीर कारवाईचा इशारा; दिपाली सय्यद म्हणाल्या, 'हे किती हास्यास्पद!'

उद्यापासून ६ राशींचं नशीब चमकणार! आयुष्यात येणार आनंदाचे दिवस, धनलाभाचेही संकेत

Latest Marathi News Live Update : धुळ्यात क्रांतीसूर्य भगवान बिरसा मुंडा यांच्या १५१ व्या जयंतीनिमित्त 'जनजातीय गौरव दिन' उत्साहात संपन्न

ENG vs AUS, 2nd ODI: इंग्लंडचा पलटवार! गस ऍटकिन्सनच्या माऱ्यासमोर ऑस्ट्रेलियाचा डाव कोलमडला, तब्बल १३५ धावांनी पराभव

WPL 2027: ब्रेबॉर्न नाही, आता वानखेडेवर रंगणार फायनलसहित ११ सामने! BCCI चा मोठा निर्णय; पाहा खरं कारण काय?

SCROLL FOR NEXT