मुंबई

दिवाळीनंतरही नवी मुंबईकरांची घुसमट कायम

CD

दिवाळीनंतरही नवी मुंबईकरांची घुसमट कायम
रविवारी सकाळी दाट धुक्याची चादर
सकाळ वृत्तसेवा
नवी मुंबई, ता. १५ : देशात नवी मुंबई पालिकेने स्वच्छतेचा झेंडा फडकावला असला, तरी शहरातील हवेची गुणवत्ता मात्र अद्यापि चिंताजनक पातळीवरच आहे. दिवाळीतील फटाक्यांची आतषबाजी, औद्योगिक वसाहतींमधील रासायनिक उत्सर्जन आणि वाढती थंडी यामुळे दिवाळीनंतरही नवी मुंबईच्या हवेचा गुणवत्ता निर्देशांक सातत्याने खराब ते अस्वास्थ्यकारक श्रेणीत नोंदवला जात आहे. त्यातच रविवारी (ता.१५) सकाळी नवी मुंबईच्या अनेक भागांत दाट धुरक्याची चादर पाहायला मिळाल्याने नागरिकांमधून चिंता व्यक्त होत आहे.
नोव्हेंबर महिन्याच्या सुरुवातीला नवी मुंबईचा सरासरी हवा गुणवत्ता निर्देशांक ७९ ते ९९ दरम्यान समाधानकारक होता, मात्र दिवाळीची आतषबाजी सुरू होताच प्रदूषणाने उच्चांक गाठला. केंद्रीय प्रदूषण नियंत्रण मंडळ आणि विविध हवा गुणवत्ता मापन केंद्रांच्या आकडेवारीनुसार गेल्या आठवडाभरातील स्थिती असमाधानकारक राहिली आहे. ७ नोव्हेंबर रोजी शहराचा निर्देशांक १४१ वर पोहोचला, तर ८ नोव्हेंबरला १५४ आणि लक्ष्मीपूजनाच्या दिवशी ९ नोव्हेंबरला तो थेट १६० च्या पार गेला. १० नोव्हेंबरला पाडव्याच्या दिवशी शहराची सरासरी १३० वर आली असली, तरी औद्योगिक आणि निवासी पट्ट्यांत हवा खराबच होती. त्या दिवशी महापे येथे सर्वाधिक १६६, कोपरीपाडा-वाशी येथे १५८, सानपाडा १३८ आणि नेरूळमध्ये १३७ इतका एक्यूआय नोंदवला गेला. गेल्या वर्षी १३ नोव्हेंबरला सरासरी निर्देशांक ११९ असताना, १४ नोव्हेंबरच्या पहाटे हवेतील प्रदूषणाने पुन्हा उचल खाल्ली आणि कमाल एक्युआय २०४ पर्यंत पोहोचला. आज, रविवारी सकाळी शहराचा निर्देशांक १८० ते २२८ च्या अस्वास्थ्यकारक श्रेणीदरम्यान नोंदवला गेला आहे. हवेतील सूक्ष्म धूलिकण पीएम २.५ चे प्रमाण ९६.९ ते १००, तर पीएम १० चे प्रमाण ११८ इतके धोकादायक पातळीवर पोहोचले आहे.

सकाळी दाट धुक्याची चादर आणि धुरक्याचा धोका
रविवारी सकाळी वाशी, कोपरखैरणे, महापे, घणसोली, नेरूळ आणि बेलापूर परिसरात तसेच ठाणे-बेलापूर मार्गावर दाट धुक्याची चादर पसरली होती. पहाटेच्या सुमारास दृश्यमानता कमी झाल्याने मॉर्निंग वॉकला बाहेर पडलेले नागरिक आणि वाहनचालकांना याचा मोठा अनुभव आला. हवामान तज्ज्ञ आणि पर्यावरणप्रेमींच्या मते, तापमानातील घट होत किमान तापमान २३ अंश सेल्सिअसच्या आसपासच्या आणि वाऱ्याचा मंदावलेला वेग होता. यामुळे जमिनीलगतची आर्द्रता आणि हवेतील प्रदूषक कण एकत्र येऊन धुरके तयार होत आहे. विशेषतः खैरणे आणि महापे एमआयडीसी लगतच्या कोपरी, वाशी आणि घणसोली भागात रात्री उशिरा व पहाटेच्या वेळी उग्र रासायनिक वास आणि धुरके पसरत असल्याच्या तक्रारी नागरिकांनी केल्या आहेत.

प्रदूषण नियंत्रण मंडळाच्या भूमिकेवर प्रश्नचिन्ह
महापे येथे महाराष्ट्र प्रदूषण नियंत्रण मंडळाचे प्रादेशिक कार्यालय असतानाही याच परिसरात सर्वाधिक प्रदूषणाची नोंद होत असल्याबद्दल पर्यावरणप्रेमींनी संताप व्यक्त केला आहे. महापालिकेकडून धूळ नियंत्रणासाठी फॉगर यंत्रणा आणि स्वच्छता मोहीम राबवली जात असल्याचा दावा केला जात असला, तरी औद्योगिक उत्सर्जन आणि बांधकामांमधून उडणाऱ्या धुळीवर ठोस कारवाई होत नसल्याने स्वच्छ शहर अशी ओळख असलेल्या नवी मुंबईकरांना श्वास घेणे कठीण झाले आहे.

नागरिकांसाठी आरोग्याचा इशारा
सध्याच्या धुरकट वातावरणामुळे डोळ्यांची जळजळ, घशात खवखव, कोरडा खोकला आणि श्वसनाचे विकार बळावण्याची शक्यता आरोग्य तज्ज्ञांनी वर्तवली आहे. त्यामुळे लहान मुले, ज्येष्ठ नागरिक आणि दमा किंवा श्वसनविकार असलेल्या रुग्णांनी पहाटेच्या दाट धुक्यात बाहेर पडणे टाळावे आणि घराबाहेर पडताना मास्कचा वापर करावा, असे आवाहन करण्यात आले आहे.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Maharashtra Jail Reform : महिला कैद्यांसाठी ऐतिहासिक निर्णय! आता तुरुंगात नव्हे तर मुलाबाळांसह स्वतंत्र वसाहतीत राहता येणार; 'या' दोन शहरांची निवड!

WPL 2027: ब्रेबॉर्न नाही, आता वानखेडेवर रंगणार फायनलसहित ११ सामने! BCCI चा मोठा निर्णय; पाहा खरं कारण काय?

Latest Marathi News Live Update : मी पुढच्या वेळी राज ठाकरे यांना छठ पूजेचं आमंत्रण देणार - कृपाशंकर सिंह

Indian Ocean Geopolitics: हिंदी महासागराचा प्रवास – शांतिकडून संघर्षाकडे

‘नानांना पाठ दाबण्याचे दोन रुपये द्यायचो’; अशोक सराफांनी सांगितला भन्नाट किस्सा! म्हणाले...'भर कार्यक्रमात नानांनी पाठ दाबली'

SCROLL FOR NEXT