मलेरियाचे रुग्ण वाढले
चिकुनगुनियात ८४ टक्क्यांची घट; तपासणी सुविधा अपुऱ्या
सकाळ वृत्तसेवा
मुंबई, ता. १५ : मुंबईत मलेरियाच्या रुग्णसंख्येत यंदा मोठी वाढ झाली असून, दुसरीकडे चिकुनगुनियाच्या रुग्णसंख्येत तब्बल ८४ टक्क्यांची घट नोंदवण्यात आली आहे. मुंबई महापालिकेच्या आरोग्य विभागाकडून माहिती अधिकारांतर्गत मिळालेल्या माहितीनुसार, ऑक्टोबर २०२६ पर्यंत शहरात मलेरियाचे १२ हजार ५७४ रुग्ण आढळले. गेल्या वर्षी, याच कालावधीत ही संख्या आठ हजार ५२१ होती. त्यामुळे वर्षभरात मलेरियाच्या रुग्णांमध्ये चार हजार ५३ ने वाढ झाली असून, ही वाढ सुमारे ४८ टक्के आहे.
दुसरीकडे, चिकुनगुनियाच्या रुग्णसंख्येत मोठी घट झाल्याचे आकडेवारीतून समोर आले आहे. माहिती अधिकार कार्यकर्ते चेतन कोठारी यांना आरोग्य विभागाकडून मिळालेल्या माहितीनुसार, ऑक्टोबर २०२५ पर्यंत मुंबईत चिकुनगुनियाचे ७१० रुग्ण आढळले होते. ऑक्टोबर २०२६ पर्यंत ही संख्या घटून ११३ वर आली. म्हणजेच गेल्यावर्षीच्या तुलनेत ५९७ रुग्णांची घट झाली आहे, मात्र चिकुनगुनियाच्या रुग्णसंख्येतील या घटीमागे आजाराचे प्रत्यक्ष नियंत्रण आहे की अपुऱ्या तपासणी सुविधांमुळे रुग्णांची नोंद कमी होत आहे, असा प्रश्न उपस्थित होत आहे.
आरोग्य विभागाकडून अनेकदा रुग्णसंख्येतील वाढीचे कारण सुधारित तपासणी व्यवस्था असल्याचे सांगितले जाते. त्यामुळे चिकुनगुनियाच्या रुग्णसंख्येतील घट तपासणीच्या उपलब्धतेच्या पार्श्वभूमीवर पडताळणे आवश्यक असल्याचे कोठारी यांनी सांगितले.
‘एलिसा’ सुविधा अपुरी
सांताक्रूझ येथील व्ही. एन. देसाई रुग्णालय, भाभा रुग्णालय आणि राजावाडी रुग्णालयासह उपनगरांतील अनेक रुग्णालयांमध्ये चिकुनगुनियाच्या निदानासाठी आवश्यक असलेली एलिसा तपासणी सुविधा उपलब्ध नसल्याचा दावा त्यांनी केला. काही रुग्णालयांमध्ये जलद तपासणी संचही उपलब्ध नसल्याचे माहिती अधिकारातून समोर आले आहे. त्यामुळे रुग्णसंख्येतील घट म्हणजे आजाराचे नियंत्रण, असा निष्कर्ष काढण्यापूर्वी महापालिकेने तपासणी सुविधांचा आढावा घेण्याची गरज आहे.
सकाळ+ चे सदस्य व्हा
ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!
शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.
Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.