छठपूजेसाठी भाविकांची मांदियाळी
घाटकोपरमध्ये १०० कृत्रिम तलाव; १५ हजारांहून अधिक भाविकांचा सहभाग
घाटकोपर, ता. १५ (बातमीदार) ः रेल्वे स्थानकावर छठपूजेनिमित्त गाणे वाजवण्यात आल्याने मनसे, शिवसेना ठाकरे गटाकडून त्याचा तीव्र निषेध व्यक्त करण्यात आला. या पार्श्वभूमीवर भाजप आणि विविध संस्थांकडून छठपूजेसाठी उभारण्यात आलेल्या कृत्रिम तलावांच्या ठिकाणी पोलिसांचा कडक बंदोबस्तदेखील ठेवण्यात आला होता. घाटकोपर पूर्वेत आचार्य अत्रे मैदानात रविवारी (ता. १५) भाविकांची उत्स्फूर्त गर्दी पाहायला मिळाली.
पंतनगर येथील प्रल्हाद केशव आचार्य अत्रे मैदानात उभारण्यात आलेल्या १०० कृत्रिम पूजा तलावांमध्ये हजारो भाविकांनी सूर्यदेव आणि छठी मातेची भक्तिभावाने आराधना केली. सुमारे १५ हजारांहून अधिक भाविकांच्या सहभागामुळे संपूर्ण परिसरात उत्साह आणि भक्तिमय वातावरण निर्माण झाले होते. भोजपुरी गीते आणि जय छठी मय्याच्या जयघोषाने परिसर दुमदुमला होता. एन विभागाच्या सहकार्यातून आणि नगरसेविका राखी जाधव यांच्या पुढाकाराने या महोत्सवाचे नियोजन करण्यात आले होते.
छठपूजेनिमित्त भाविकांनी पारंपरिक पद्धतीने पूजा साहित्याची मांडणी करून सूर्यदेवाला अर्घ्य अर्पण केले. विशेषतः महिला भाविकांनी छठी मातेची मनोभावे पूजा करून कुटुंबाच्या सुख, समृद्धी आणि आरोग्यासाठी प्रार्थना केली. पारंपरिक वेशभूषा, पूजेचे साहित्य, फळे आणि प्रसादाने मैदान परिसराला धार्मिक उत्सवाचे स्वरूप प्राप्त झाले होते. सायंकाळच्या सूर्यास्तावेळी तसेच दुसऱ्या दिवशी सूर्योदयाच्या वेळी अर्घ्य अर्पण करण्यासाठी भाविकांची मोठी गर्दी झाली होती.
चांदिवलीत ‘जय छठीमैय्या’चा जयघोष
आमदार दिलीप लांडे यांच्या वतीने आयोजित करण्यात आलेल्या चांदिवली विधानसभा क्षेत्रातील भव्य छटपूजेला उत्तर भारतीय नागरिकांचा उत्स्फूर्त प्रतिसाद लाभला. ‘जय छठीमैय्या’च्या जयघोषाने संपूर्ण परिसर दुमदुमून गेला होता. हजारो भाविकांनी भक्तिभावाने या धार्मिक सोहळ्यात सहभाग घेतला. आमदार दिलीप लांडे यांच्या पुढाकाराने कुर्ला आणि चांदिवली परिसरात तीन ठिकाणी भव्य छठपूजेचे आयोजन करण्यात आले होते.
सकाळ+ चे सदस्य व्हा
ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!
शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.
Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.