चारकोपमध्ये साकारला पद्मदुर्गाचा हुबेहूब देखावा
ओम साई दर्शन संस्थेचा उपक्रम; किल्ल्याची प्रतिकृती पाहण्यासाठी बच्चेकंपनीसह इतिहासप्रेमींची गर्दी
कांदिवली, ता. १५ (बातमीदार) : छत्रपती शिवाजी महाराजांच्या स्वराज्याच्या इतिहासाची आणि दुर्गस्थापत्याची ओळख नव्या पिढीला व्हावी, या उद्देशाने चारकोप येथील ओम साई दर्शन संस्थेने यंदा रायगड जिल्ह्यातील मुरूडजवळ अरबी समुद्रात असलेल्या ऐतिहासिक पद्मदुर्ग किल्ल्याची प्रतिकृती साकारली आहे. संस्थेच्या आवारात १० फूट लांब आणि सात फूट रुंद जागेत उभारलेला हा किल्ला पाहण्यासाठी बच्चेकंपनी, पालक आणि गडकोटप्रेमींची गर्दी होत आहे.
ओम साई दर्शन संस्थेने २०१६ मध्ये मल्हारगडाची प्रतिकृती साकारून गडकोट स्पर्धेत सहभाग घेतला होता. त्या वेळी संस्थेला द्वितीय पारितोषिक मिळाले होते. त्यानंतर संस्थेतील महिला, मुले आणि ज्येष्ठांनी दरवर्षी ऐतिहासिक किल्ल्यांच्या प्रतिकृती साकारण्याचा संकल्प केला. यंदा पद्मदुर्गाची प्रतिकृती साकारण्यासाठी संस्थेतील सदस्यांनी सलग १५ दिवस दररोज सायंकाळी दोन तास मेहनत घेतली.
किल्ला साकारण्यापूर्वी प्रत्यक्ष त्या ठिकाणी जाऊन पाहणी केली जाते. स्वतःच्या हाताने किल्ल्याची प्रतिकृती उभारण्यात वेगळाच आनंद आणि समाधान मिळते. या उपक्रमामुळे सांघिक काम आणि परस्पर सहकार्याची भावना वाढीस लागते, असे प्रणीता प्रशांत पलांडे यांनी सांगितले. किल्ले हे आपल्या गौरवशाली इतिहासाचे, स्थापत्यकलेचे आणि पराक्रमाचे जिवंत साक्षीदार आहेत. ते केवळ दगड-विटांचे बांधकाम नसून आपल्या संस्कृतीचा आणि स्वराज्याच्या लढ्याचा अनमोल ठेवा आहेत, अशी भावना संस्थेतील गडकोटप्रेमी संदीप जोशी यांनी व्यक्त केली.
सकाळ+ चे सदस्य व्हा
ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!
शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.
Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.