नदीपात्रातील भरावाचा ठपका आयोजकांवर
भरावाचे नगराध्यक्षांकडून समर्थन; पालिकेचा संबंध नसल्याचे मुख्याधिकाऱ्यांचे स्पष्टीकरण
बदलापूर, ता. १५ (बातमीदार) : उल्हास नदीपात्रातील छठपूजेच्या आयोजनावरून सुरू झालेला वाद मातीच्या भरावाच्या आर्थिक आणि प्रशासकीय जबाबदारीवर येऊन ठेपला आहे. नदीपात्रात विनापरवानगी माती टाकल्याप्रकरणी सुमारे तीन लाख रुपयांची रॉयल्टी आणि नियमानुसार दंड आकारला जाण्याची शक्यता आहे, मात्र या भरावाची जबाबदारी आयोजक समितीवर निश्चित होण्याची चिन्हे आहेत. नगराध्यक्ष रुचिता घोरपडे यांनी भराव आयोजकांनी केल्याचे सांगत रॉयल्टी आणि दंडाची जबाबदारीही त्यांचीच असल्याची भूमिका मांडली आहे. दुसरीकडे, मुख्याधिकारी मारुती गायकवाड यांनी नदीपात्रात माती टाकण्यास पालिकेने कोणतीही परवानगी दिली नसल्याचे स्पष्ट केले आहे.
बदलापूर शहरातून वाहणाऱ्या उल्हास नदीपात्रात छठपूजेसाठी मोठ्या प्रमाणात माती टाकून घाट तयार करण्यात आला. या कामासाठी महसूल विभाग अथवा अन्य संबंधित यंत्रणेची अधिकृत परवानगी घेण्यात आली होती का, यावरून वाद निर्माण झाला आहे. नदीपात्रातील भराव आणि त्याच्या संभाव्य पर्यावरणीय परिणामांबाबत पर्यावरणप्रेमी तसेच राजकीय पक्षांनी आक्षेप घेतल्यानंतर महसूल विभागाने या प्रकरणाची दखल घेतली.
तहसीलदार अमित पुरी यांनी याप्रकरणी नगरपालिकेला कारणे दाखवा नोटीस बजावत खुलासा मागवला आहे. दरम्यान, छठपूजेच्या कार्यक्रमासाठी परवानगी देण्यात आली होती; मात्र नदीपात्रात माती टाकण्यास कोणतीही परवानगी देण्यात आली नव्हती, असे मुख्याधिकारी मारुती गायकवाड यांनी स्पष्ट केले.
नगराध्यक्ष रुचिता घोरपडे यांनी मात्र भरावामागील भूमिका स्पष्ट करताना भाविकांच्या सुरक्षिततेचा मुद्दा मांडला. नदीपात्रात असलेले टोकदार दगड आणि काचेच्या तुकड्यांमुळे भाविकांना दुखापत होण्याची शक्यता होती. त्यामुळे सुरक्षिततेच्या दृष्टीने मातीचा भराव करण्यात आल्याचे त्यांनी सांगितले. हा भराव आयोजक समितीने केला असल्याने त्याची जबाबदारीही आयोजकांचीच असेल, असे त्यांनी नमूद केले. महसूल विभागाच्या प्राथमिक अंदाजानुसार या भरावासाठी सुमारे तीन लाख रुपयांची रॉयल्टी आकारली जाऊ शकते. त्यासोबत नियमानुसार दंडही संबंधितांकडून वसूल केला जाऊ शकतो. त्यामुळे या प्रकरणात आयोजकांवर आर्थिक कारवाई होण्याची शक्यता निर्माण झाली आहे.
----------------------------
कारवाईच्या मागणीसाठी रात्रभर ठिय्या
विनापरवानगी मातीचा भराव करणाऱ्यांविरोधात गुन्हे दाखल करावेत, या मागणीसाठी उल्हास नदी बचाव समितीचे पदाधिकारी आणि पर्यावरणप्रेमींनी शनिवारी (ता. १४) रात्री बदलापूर पोलिस ठाण्याबाहेर ठिय्या आंदोलन केले. संबंधित आयोजकांसह जबाबदार व्यक्तींवर कारवाई करण्याची मागणी आंदोलकांनी केली. संगीता चेंदवणकर, राम जगताप, अनिल जोशी, गणेश पिल्लई, युवराज गिध आणि पर्यावरणप्रेमी सिद्धेश मालवणकर यांच्यासह अनेक जण रात्रभर पोलिस ठाण्यात उपस्थित होते, मात्र महसूल विभागाचा अहवाल आणि आदेश प्राप्त झाल्यानंतरच गुन्हा दाखल करण्याबाबत पुढील कार्यवाही करता येईल, असे सहाय्यक पोलिस आयुक्त शैलेश काळे यांनी स्पष्ट केले.
सकाळ+ चे सदस्य व्हा
ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!
शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.
Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.