काळभैरवनाथ जोगेश्वरी महाराजांचा आज पालखी उत्सव
पोलादपूर (बातमीदार) ः पोलादपूरचे ग्रामदैवत जागृत देवस्थान श्री देव काळभैरवनाथ जोगेश्वरी महाराजांचा होलिकोत्सवानिमित्त विविध कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले असून गुरुवारी सायंकाळी पाच वाजता वाजतगाजत पालखी सहाणेवर येणार आहे. बुधवारी (ता. १९) पहाटेपर्यंत पालखी सहाणेवर विराजमान राहील, त्यानंतर शहरातून मिरवणूक काढून उत्सवाची सांगता होणार आहे.
श्रीदेव काळभैरवनाथ पालखीचे गुरुवारी सहाणेवर आगमन झाल्यावर रात्री साडेबारा वाजता होळी लावण्यात येईल. शुक्रवारी सकाळी धूलिवंदन, रात्री आठ वाजता जाखमातानगर यांचे भजन तर रात्री दहा वाजता भैरवनाथ सहाण येथे आनंदनगर मित्र मंडळ आयोजित काठी नाचवण्याच्या स्पर्धा घेण्यात येणार आहेत. याशिवाय भजन, क्रिकेट स्पर्धा, सत्यनारायणाच्या महापूजेचे आयोजन करण्यात आले आहे.
............
मासेमारी नौका सजल्या
रेवदंडा (बातमीदार) : होळी उत्सवाची धूम गावागावात दिसत आहे. काही गावात ग्रामदैवतांच्या पालख्या असल्याने चाकरमान्यांची उत्सुकता शिगेला पोहोचली आहे. कार्यालयांना सलग तीन दिवस सुट्टी आल्याने पर्यटकही मोठ्या संख्येने दाखल होत आहेत. बाजारपेठेत विविध प्रकारचे रंग विक्रीला आले आहेत. मच्छीमारांनी नौका सजवून किनारी आणल्या आहेत.
.......................
वारली चित्रांनी नटली तासगाव आदिवासीवाडी
माणगाव (बातमीदार) ः तासगाव आदिवासीवाडीत होळी सणाच्या पार्श्वभूमीवर पारंपरिक वारली चित्रकलेचा एक प्रेरणादायी उपक्रम राबवण्यात आला असून त्यामुळे गावाचा चेहरामोहराच बदलला आहे. गावातील समाजमंदिर आणि ११ घरांच्या भिंतींवर वारली चित्रकला साकारण्यात आल्याने ग्रामस्थांमध्ये आनंदाचे वातावरण आहे.
पोस्को महाराष्ट्र स्टीलने सामाजिक उत्तरदायित्व उपक्रमांतर्गत गावाचा कायापालट केला असून वनौषधीचे महत्त्व विशद करीत परिजातक, वेखंड, अश्वगंधा, तुळस, गवती चहा, कोरफड आदी रोपे ग्रामस्थांना भेट दिली. वारली कला ही आदिवासी संस्कृतीच्या समृद्ध वारशाचे प्रतीक असल्याने तिच्या जतनासाठी हा उपक्रम राबवल्याचे कंपनीच्या अधिकाऱ्यांकडून सांगण्यात आले. सोमवारी (ता. १०) उपक्रमाच्या उद्घाटनप्रसंगी आदिवासी नृत्य सादर करण्यात आले.
-------------------
सकाळ+ चे सदस्य व्हा
ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!
शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.
Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.