Knowing others is intelligence, knowing yourself is wisdom
- Lau Tzu.
कुठे थांबायचं हे ज्याला उमजलं, त्याला आयुष्य समजलं असं म्हणतात. खाण्याच्या बाबतीतही तसंच आहे. मला अनेक जण ‘डाएट’बाबत सल्ले विचारतात. कार्ब्स किती आणि कधी खाऊ, प्रथिनं भरपूर असावीत का, किती वेळा खाऊ, रात्री भात खाल्लेला चालेल का वगैरे. पोळीला कार्ब्स, डाळींना प्रथिनं, भाज्यांना फायबर असं म्हणण्यापेक्षा अन्नाला शेवटचं पूर्णब्रह्म कधी म्हणालो आपण? आपली पचनसंस्था आपल्यासाठी अविरत काम करते, त्यामुळे पोटाला आराम कसा मिळेल, मेटबॉलिजम् कसं सुधारेल, दिवसभर फ्रेश वाटण्यासाठी काय करावं, गॅस- ॲसिडिटी- बद्धकोष्ठता का होते... असे प्रश्न विचारणं योग्य ठरेल.
‘डाएट’ नव्हे; जगण्याची पद्धत...
मूळ ग्रीक शब्द Diaita पासून Diet हा शब्द प्रचलित झाला, त्याचा खरा अर्थ आहे ‘way of life’. म्हणजेच जगण्याची पद्धत. पण आजकाल डाएट म्हणजे काय खायचं, इतकं त्याचं स्वरूप लहान करून ठेवलंय. ‘काय’ बरोबरच ‘कसं’, ‘कुठं’, ‘किती’ हेही प्रश्न तितकेच महत्त्वाचे आहेत. मला अत्यंत भावलेला विचार म्हणजे, ‘प्रसादाला कधीही चांगलं किंवा वाईट असं काहीही म्हणू नये, कारण तो प्रसाद आहे.’ तसंच आपण खातो त्या अन्नाला उपभोगाची वस्तू म्हणून न बघता गरज म्हणून बघा - जगण्याची गरज! पुढच्यावेळी ‘मी खूप फुडी आहे’ असं म्हणाल तेव्हा तुमच्या अस्तित्वाला दुसरीही काही बाजू आहे, याचा विचार करा. मानसिक अशांतता आणि अस्थिरता असताना अन्न खाऊ नये. भावनिक चढ-उतारांचा आपल्या पचनक्रियेवर खूप परिणाम होत असतो.
तन के लिए खाओ!
नात्यश्नतस्तु योगोऽस्ति न चैकान्तमनश्नत:
भगवद्गीतेत श्रीकृष्णाने अतिखाणाऱ्याला किंवा अजिबात न खाणाऱ्याला योग साधणं कठीण, असं म्हटलंय. म्हणूनच ते युक्ताहारविहारस्य.. अशी अट घालतात. अनेक योगग्रंथांतही आहाराबाबतचे विचार वारंवार मांडले आहेत. ‘मिताहार’ हा शब्द आपल्याला काही नवीन नाही, पण माफक म्हणजे काय आणि ते कसं कळणार? योगशास्त्रात पोटाचा ५० टक्के भाग सॉलिड फूड, २५ टक्के लिक्विड आणि २५ टक्के रिक्त असं प्रमाण दिलेलं आहे. सोप्या शब्दांत सांगायचं तर जेवण झाल्यावर आपली नेहमीची सर्व शारीरिक व बौद्धिक कामं जडत्व न वाटता सुरळीत करता येत असतील, तर तो मिताहर. डायटचा दुसरा दुर्लक्षित भाग म्हणजे मल-विसर्जन. आपण जितकं खाण्यावर लक्ष देतो तितकंच पोट साफ होण्यावर दिलं पाहिजे. मी क्लायंट्सला तुमचं पचन कसं आहे, अस विचारते. तेव्हा मला ‘ओके आहे’ असं उत्तर अनेकदा मिळतं. अनेकांना याविषयी बोलायला लाज वाटते, तरीही मी खोदूनखोदून विचारते. अनेक प्रश्नांची उत्तरं आपल्या पचनात आणि झोपण्यात दडलेली असतात. खाण्याबरोबर पचन (डायजेशन), शोषण (ॲब्सॉर्बशन), रक्ताभिसरण (सर्क्युलेशन), ॲसिमिलेशन आणि चयापचय (मेटाबॉलिजम) यांचाही विचार करूया, तर खऱ्या अर्थाने ‘डाएट’चा विचार होईल. पोळीभाजीला बोअरिंग म्हणणाऱ्या जाहिरातींच्या काळात आपली आणि आपण कष्टानं वाढवतो ती पुढील पिढी निरोगी ठेवण्याची पूर्ण जबाबदारी आपलीच आहे. आपल्या शरीरातील प्रत्येक पेशींना काम नीट करू देऊ आणि डाएटबाबतीत आजपासून एक मंत्र लक्षात ठेवू,
‘तन के लिए खाओ, मन के किए नही.’
पुढील विषयासह लवकरच भेटू ..
ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!
Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.