vakil
vakil 
पश्चिम महाराष्ट्र

आरोपीने दिली वकीलाच्या खुनाची कबुली

सकाळ वृत्तसेवा

सोलापूर : ऍड. राजेश श्रीमंत कांबळे (वय 45, रा. ब्रह्मचैतन्यनगर, नवीन आरटीओ ऑफिसजवळ, विजयपूर रोड, सोलापूर) यांच्या खून प्रकरणात गुन्हे शाखेच्या पथकाने संशयित संजय ऊर्फ बंटी खरटमल यास गुलबर्गा येथून अटक केली आहे. त्याने ऍड. कांबळे यांचा खून केल्याची कबुली दिली असून खून का केला हे अद्याप स्पष्ट झाले नाही, असे प्रभारी पोलिस आयुक्त बापू बांगर यांनी सांगितले. दरम्यान, ऍड. कांबळे यांच्या मृतदेहाच्या तुकड्यांची विल्हेवाट लावण्यासाठी टेम्पोतून शहराबाहेर नेण्यात येणार होते. ठरल्यावेळी टेम्पो न आल्याने प्लॅन फिसकटल्याची माहिती सूत्रांनी दिली आहे. 

ऍड. कांबळे हे 8 जूनला बेपत्ता झाले. त्याच दिवशी त्यांचा खून झाला. या घटनेत एका वकिलाचा सहभाग असल्याची चर्चा आहे. बंटी वेगवेगळी माहिती सांगून पोलिसांची दिशाभूल करत आहे. 

कुटुंबीयांनी 9 जून रोजी पोलिसात बेपत्ता झाल्याची तक्रार दिली होती. 11 जूनला बार असोसिएशनच्या पदाधिकाऱ्यांनी ऍड. कांबळे यांचा कोणीतरी घातपात केला असण्याची शंका व्यक्त केली. ऍड. कांबळे यांचा मृतदेह सापडल्यानंतर पोलिसांची पथके संशयित आरोपी बंटीच्या शोधासाठी रवाना झाली होती. मोबाईल लोकेशनच्या आधारे पोलिस गुलबर्गा परिसरात पोचले. बंटी गुलबर्गा रेल्वे स्थानक परिसरात गुन्हे शाखेच्या हाती लागला. गुन्हे शाखेचे सहायक पोलिस निरीक्षक अजित कुंभार व त्यांच्या पथकाने बंटी यास अटक केली आहे. 

संशयित आरोपी बंटी खरटमल याने खून का केला हे अद्याप स्पष्ट झाले नाही. या घटनेत आणखी कोणाचा सहभाग आहे का याची चौकशी सुरू आहे. त्याला शुक्रवारी न्यायालयात हजर करून पोलिस कोठडी घेण्यात येईल. या खुनाच्या अनुषंगाने जर कोणाकडे काही माहिती असेल तर गुन्हे शाखेला कळवावी. 
- बापू बांगर, 
प्रभारी पोलिस आयुक्त 

खूनप्रकरणात वकिलाच्या सहभागाची चर्चा 
ऍड. राजेश कांबळे यांच्या खून प्रकरणात एका वकिलाचा सहभाग असल्याची चर्चा आहे. तसेच एका नगरसेवकाचीही पोलिसांकडून चौकशी सुरू असल्याचे समजते. ऍड. कांबळे यांचे दुचाकी अक्कलकोट परिसरात सापडल्याचे सांगण्यात येत आहे. याबाबत पोलिसांकडून अधिकृत दुजोरा मिळाला नाही. 

खुनानंतर गेला सासुरवाडीला.. 
बंटी याने 8 जून रोजी त्याच्या घरात हातोडीने डोक्‍यात मारून ऍड. कांबळे यांचा खून केला. 11 जूनपर्यंत बंटी सोलापुरातच होता. त्यानंतर तो कर्नाटकातील गुलबर्गा परिसरातील नारोना गावात सासुरवाडीला गेला. पत्नी आणि मुलांची भेट घेतली. एक महिन्यापूर्वी घरगुती कारणावरून भांडण झाल्यानंतर त्याची पत्नी माहेरी नारोना येथे गेल्याची माहिती तपासात समोर आली आहे. 

आरोपीचे वकीलपत्र न घेण्याचा ठराव 
ऍड. कांबळे यांच्या खुनाच्या पार्श्‍वभूमीवर सोलापूर बार असोसिएशनच्या सभागृहात गुरुवारी सभा घेण्यात आली. यावेळी ऍड. कांबळे यांच्या खुनाचा तीव्र निषेध करण्यात आला. ऍड. कांबळे यांच्या गुन्ह्यातील कोणाचेही वकीलपत्र स्वीकारू नये असा ठराव यावेळी करण्यात आला, अशी माहिती अध्यक्ष ऍड. संतोष न्हावकर यांनी दिली. 

तपासाकरिता डीएनए टेस्ट 
खुनाच्या तपासाकरिता मृत ऍड. कांबळे यांच्या मांडीचा भाग काढून ठेवला आहे. डीएनए टेस्टसाठी तो वापरण्यात येणार आहे. यासाठी त्यांच्या आई-वडिलांचे रक्तही घेण्यात येणार आहे. अधिकच्या तपासाकरिता हे आवश्‍यक असल्याचे पोलिसांनी सांगितले. 

एक महिन्यापूर्वी सोडले काम 
बंटी हा शहरातील खासगी रुग्णालयात सुरक्षा रक्षक म्हणून कामाला होता. एक महिन्यापूर्वी त्याने हे काम सोडले होते. गुलबर्गा येथील मोठी केस आल्याचे सांगून बंटी याने ऍड. कांबळे यांना घरी बोलाविले होते

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

SRH vs LSG : अभिषेक शर्माचे SRH साठी सर्वात वेगवान अर्धशतक; 10 षटकात लखनौचं आव्हान केलं पार

Mumbai Airport: तब्बल इतक्या वेळ मुंबई विमानतळ रहाणार बंद, जाणून घ्या काय आहे महत्वाचं कारण

Police Bharti 2023 : पोलिस भरतीमध्ये एकापेक्षा जास्त अर्ज केलेल्या उमेदवारांना द्यावं लागणार हमीपत्र; आदेशात नेमकं काय म्हटलंय?

Pune Crime : मतदानानंतर वारजे परिसरात गोळीबार, दोघे अल्पवयीन ताब्यात

Mumbai News: रुग्णवाहिका खरेदी निविदा प्रक्रिया भोवणार,उच्च न्यायालयाने घेतली दखल, भूमिका स्पष्ट करण्याचे दिले निर्देश

SCROLL FOR NEXT