इस्लामपूर (जिल्हा सांगली) : वाळवा तालुक्यातील रेठरे धरण येथील कोरोनाबाधित रुग्णाचा अहवाल पॉझिटिव्ह येताच इस्लामपूर शहरानेदेखील आज तातडीची बैठक घेत कोरोना साखळी ब्रेक करण्याचा उपाय म्हणून आणखी तीन दिवस सलग पूर्णतः लॉकडाऊन पाळण्याचा निर्णय घेतला आहे. बुधवार 15 ते शुक्रवार 17 एप्रिलपर्यंत शहर पूर्ण बंद ठेवण्याचा निर्णय झाला आहे.
मेडिकल आणि वैद्यकीय सेवा वगळता संपूर्ण व्यवहार बंद राहणार आहेत. बॅंकिंगचे व्यवहार देखील बंद ठेवण्यासाठीचे आवाहन पालिका प्रशासनातर्फे करण्यात आले आहे.
नगराध्यक्ष निशिकांत पाटील, मुख्याधिकारी प्रज्ञा पोतदार-पवार यांच्या उपस्थितीत बैठक झाली. मोजकेच नगरसेवक, अधिकारी बैठकीला उपस्थित होते. रविवारी रेठरे धरण येथील एकाला कोरोनाची लागण झाल्याचे स्पष्ट झाले.
ही व्यक्ती मुंबई येथे असताना हा पॉझिटिव्ह अहवाल आला असला तरी ती काही दिवस म्हणजे जवळपास महिनाभर गावाकडेच होती. किडनीच्या आजाराचे उपचार सुरू होते. त्यामुळे काही दिवस त्यांना इस्लामपूर येथील एका खासगी रुग्णालयात उपचार सुरू होते. त्यामुळे दक्षतेचा आणि खबरदारीचा भाग म्हणून इस्लामपूर शहरात आणखी कडक उपाययोजना अमलात आणण्याचा निर्णय इस्लामपूर पालिकेच्या वतीने घेण्यात आला आहे. यासंदर्भात प्रांत, तहसीलदार, पोलीस प्रशासन, तालुका आरोग्य विभाग यांच्याशीही चर्चा करून काही निर्णय घेण्यात आले आहेत.
बैठकीत असे ठरले की, कोरोना साखळी ब्रेक करण्यासाठी सलग तीन दिवस कोणत्याही कारणास्तव लोकांनी बाहेर पडू नये. मंगळवारी आंबेडकर जयंती आहे. प्रत्येकाने ती आपापल्या घरीच साजरी करावी. पुतळा सुशोभित केला जाईल. पालिकेत शासकीय जयंती मोजक्याच लोकांच्या उपस्थितीत होईल. मंगळवारी एका दिवसात आवश्यक तरतुदी करून ठेवाव्यात. प्रत्येक प्रभागात दहा स्वयंसेवक निश्चित केले आहेत.
बाहेरून येणाऱ्या लोकांची नावे या लोकांना तसेच प्रशासनाला काळवायची आहेत, असे सुमारे 400 लोक शहरात आले आहेत. तालुका आरोग्य विभागाला ही यादी दिली जाणार आहे. रेशनिंग वाटपसंदर्भात पुढच्या आठवड्यात प्रभागनिहाय दक्षता समिती केली जाईल. त्यानुसार धान्य वाटप नियोजन होईल. लोकांनी नियमांचे पालन करावे." बैठकीला शिवसेनेचे जिल्हाप्रमुख आनंदराव पवार, राष्ट्रवादीचे नेते आनंदराव मलगुंडे, विकास आघाडीचे वैभव पवार, विक्रम पाटील, कोमल बनसोडे, प्रदीप लोहार, सीमा पवार यांच्यासह अधिकारी प्रमिला माने उपस्थित होते.
राष्ट्रवादीची बैठकीकडे पाठ!
शहर लॉकडाऊन करण्यासाठी आयोजित केलेल्या या तातडीच्या बैठकीला राष्ट्रवादीच्या नगरसेवकांनी पाठ फिरवली. माजी नगराध्यक्ष आनंदराव मलगुंडे वगळता एकही नगरसेवक बैठकीला उपस्थित नव्हता.
सकाळ+ चे सदस्य व्हा
ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!
शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.
Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.