सांगली : ‘कृष्णा नदीत सांगली बंधारा ते डिग्रज बंधारा या दरम्यान आंतरराष्ट्रीय निकषांनुसार ‘रोईंग ट्रॅक’ (होड्यांच्या स्पर्धेसाठी मार्ग) बनवण्यासाठी सर्वेक्षण करावे,’ असे आदेश आयुक्त सत्यम गांधी यांनी दिले आहेत. ‘सांगली पर्यटनाच्या नकाशावर आणण्यासाठी आणि पर्यटकांना सांगलीकडे आकर्षित करण्यासाठीच्या विविध उपाययोजनांचा एक भाग म्हणून याकडे पाहिले पाहिजे,’ असे मत त्यांनी व्यक्त केले आहे.
याबाबत भाजपचे नेते पृथ्वीराज पवार यांनी त्यांच्याकडे प्रस्ताव सादर केला. त्याला सकारात्मक प्रतिसाद देत श्री. गांधी यांनी तातडीने कार्यवाही करावी, असे आदेश दिले आहेत. श्रावण महिन्यात दर रविवारी येथे होड्यांच्या शर्यती होतात. सांगली आणि कोल्हापूर जिल्ह्यांतील अनेक संघ त्यात सहभागी होतात. या स्पर्धांना व्यापक स्वरूप देण्याचा प्रयत्न या माध्यमातून केला जाणार आहे.
अपवाद वगळता कृष्णा नदीत बारमाही पाणी असते. पाणी पातळी चांगली असते. त्यामुळे या ठिकाणी बाराही महिने होड्याच्या शर्यती घेणे शक्य आहे. सद्यःस्थितीत छोट्या स्वरुपात आणि स्थानिक पातळीवर त्या घेतल्या जातात. त्यांना अधिक व्यापक स्वरूप देण्यासाठी कृष्णा नदीत आंतरराष्ट्रीय निकषांप्रमाणे रोईंग ट्रॅक बनवावा, अशी आग्रही मागणी पृथ्वीराज पवार यांनी केली. ही कल्पना आयुक्त सत्यम गांधी यांना आवडली. सांगलीला एवढा संपन्न ‘कृष्णा’काठ आहे. त्याचा पर्यटनासाठी, वॉटर स्पोर्टस् सुरू करून पर्यटकांना आकर्षित करण्यासाठी उपयोग केला पाहिजे, असे मत त्यांनी मांडले.
खेळाडू : रोईंग ट्रॅक खेळाडूंना त्यांची कौशल्ये आणि क्षमता दाखवण्यासाठी एक योग्य आणि सुरक्षित जागा उपलब्ध करून देतो.
प्रेक्षक : रोईंग ट्रॅकवर प्रेक्षकांना स्पर्धा पाहण्यासाठी चांगली जागा उपलब्ध करून दिली जाते.
पृथ्वीराज पवार म्हणाले, ‘‘कृष्णा नदीत वॉटर स्पोर्टस् वर्षभर सुरू राहिले पाहिजेत. त्यातून खेळाडूंना संधी मिळेलच, शिवाय येथे येणाऱ्या पर्यटकांची संख्या वाढेल. सांगलीच्या अर्थकारणाला गती देण्यासाठी हालचाली आवश्यक आहेत. त्यात ही संधी साधावी. त्यातून ‘कृष्णा’काठ अधिक समृद्ध होईल.’’
लांबी ः आंतरराष्ट्रीय रोईंग ट्रॅकची प्रमाणित लांबी २ हजार मीटर असते.
रुंदी : स्पर्धांसाठी ट्रॅकची रुंदी पुरेशी असते, जेणेकरून एकाचवेळी अनेक होड्या आरामात आणि सुरक्षित जाऊ शकतील.
लेन : ट्रॅक साधारणपणे ६ ते ८ लेनमध्ये विभागलेला असतो. प्रत्येक लेनमध्ये एक बोट असते.
सुविधा, सुरक्षितता
रोईंग ट्रॅकवर सुरक्षिततेची पूर्ण व्यवस्था केलेली असते. जसे की, पाण्याच्या प्रवाहाला नियंत्रित करणे, पाण्याची खोली योग्य असणे आदी.
रोईंग ट्रॅकच्या आजूबाजूला खेळाडू आणि अधिकाऱ्यांसाठी आवश्यक सुविधा उपलब्ध असतात. बोटींसाठी डॉक, खेळाडूंची विश्रांतीची जागा, प्रेक्षकांसाठी जागा आदी.
सकाळ+ चे सदस्य व्हा
ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!
शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.
Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.