पश्चिम महाराष्ट्र

समिती सदस्य निवडीचा घोळ कायम

सकाळवृत्तसेवा

नावे काही ठरेनात ः निवडी बिनविरोध, पण यादी नाही; सदस्यांत नाराजी
कोल्हापूर - जिल्हा परिषदेच्या विषय समितीच्या सदस्य निवडीत कोण कोणत्या समितीत हेच निश्‍चित न झाल्याने या निवडीचा घोळ बिनविरोध निवडी झाल्याचे जाहीर करूनही कायम राहिला. सत्तारूढ गटातच ठराविक समिती जाण्यावरून सदस्यांत असलेल्या नाराजीमुळे निवडी होऊन समितीनिहाय यादी जाहीर न करण्याची नामुष्की सत्ताधाऱ्यांवर आली. 

दरम्यान, दहा समितींतील ८३ जागांसाठी ७३ जणांची बिनविरोध निवड झाली. उर्वरित दहा जागांपैकी ५० टक्के जागांची मागणी काँग्रेस आघाडीने केली. त्याला सत्ताधाऱ्यांनी विरोध केल्याने या दहा नावांचाही गोंधळ मिटला नाही. परिणामी या दहा नावांची घोषणा नेत्यांशी चर्चा करून नंतर जाहीर करण्यात येईल, असे सभेत अध्यक्षा शौमिका महाडिक यांनी जाहीर सांगितले. 

विषय समितीच्या सदस्य निवडीसाठी नवनिर्वाचित सदस्यांची सर्वसाधारण सभा सौ. महाडिक यांच्या अध्यक्षतेखाली आज बोलावली होती. सभेची वेळ दुपारी एकची होती; पण नावांचा घोळ निर्माण झाल्याने सभा दोन वाजता सुरू झाली. त्यात हातकणंगले तालुक्‍यातील एका सदस्याने मी आल्याशिवाय सभा सुरू करायची नाही, असा दम गटनेत्यांना भरला. त्यामुळेही सभेला उशीर झाला. 

तत्पूर्वी समितीनिहाय सदस्यांची नावे निश्‍चित करण्यासाठी सत्तारूढ आघाडीची बैठक अध्यक्षांच्या बंगल्यावर, तर काँग्रेस आघाडीची बैठक शासकीय विश्रामगृहावर झाली. काँग्रेस आघाडीची नावे लगेच निश्‍चित झाली, तशी यादी व उमेदवारी अर्जही त्यांच्याकडून भरले; पण सत्तारूढ आघाडीची नावे निश्‍चित होत नव्हती. ठराविक समितीसाठीच सदस्यांनी आग्रह धरल्याने ही नावे निश्‍चित झाली नाहीत. त्यानंतर अध्यक्षांसह सर्व सदस्य जिल्हा परिषदेत आले. काँग्रेस आघाडीला समितीनिहाय किती जागा द्यायच्या यासाठी दोन्ही आघाड्यांच्या नेत्यांची बैठक अध्यक्षांच्या दालनात झाली. त्यात काँग्रेस आघाडीच्या नेत्यांनी प्रत्येक समितीत पन्नास टक्के वाटा हवा असल्याचा आग्रह धरला. त्याला सत्ताधारी गटातील नेत्यांनी विरोध दर्शवला. काँग्रेसतर्फे उमेश आपटे, युवराज पाटील, जयवंत शिंपी यांनी भाग घेतला. चर्चेनंतर समितीनिहाय कुठे ४५ टक्के, तर कुठे ४८ टक्के जागा देण्यावर तोडगा निघाला. त्यानंतर सर्व पदाधिकारी व गटनेते सभागृहात आले. तोपर्यंत दोन वाजून गेले होते.  

बांधकाम, अर्थ व शिक्षण समितीत जाण्यासाठी सर्वच पक्षांच्या सदस्यांची मागणी आहे. पण जागा कमी व मागणी करणाऱ्यांची संख्या जास्त अशी स्थिती निर्माण झाली. त्यामुळे सत्तारूढ गटाच्या सदस्यांचे फक्त उमेदवारी अर्ज भरून घेतले व समिती कोणती हे नंतर जाहीर करण्यात येईल, असे सांगण्यात आले. सभेचे कामकाज सुरू झाल्यानंतर सौ. महाडिक यांनी ८३ जागांसाठी ७३ जणांचे अर्ज आल्याचे सांगत या सर्व निवडी बिनविरोध झाल्याचे जाहीर केले. त्यानंतर पक्षप्रतोद विजय भोजे यांनी उर्वरित १० जागांचा निर्णय पालकमंत्री चंद्रकांत पाटील, आमदार हसन मुश्रीफ व सतेज पाटील यांच्याशी चर्चा करून घेण्यात येईल, असे सांगितले. त्याला काँग्रेसचे उमेश आपटे यांनी अनुमोदन दिल्यानंतर सभा संपल्याचे उपमुख्य कार्यकारी अधिकारी चंद्रकांत वाघमारे यांनी जाहीर केले; पण समितीनिहाय सदस्यांची यादीच सायंकाळी उशिरापर्यंत तयार झाली नव्हती. ही नावे निश्‍चितीचा घोळ उशिरापर्यंत अध्यक्षांच्या दालनात सुरू होता. 

इतिहासात पहिल्यांदा नामुष्की
एकहाती जिल्हा परिषदेत सत्ता असली तरी आठ पक्षांचे कडबोळे सांभाळताना सत्ताधाऱ्यांची चांगलीच कसरत झाली. महिन्याभरातच आघाड्यांची नाराजी नको म्हणून भाजप आघाडीचे समितीनिहाय सदस्यच सत्ताधाऱ्यांना जाहीर करता आले नाहीत. जिल्हा परिषदेच्या इतिहासात पहिल्यांदा ही नामुष्की पाहायला मिळाली. 

यादी तयार करण्याचे काम सुरू - सौ. महाडिक
समिती सदस्यांच्या ७३ जागा बिनविरोध झाल्या आहेत. कोण कोणत्या समितीत हे निश्‍चित झाल्यानंतर याद्या प्रसिद्ध केल्या जातील. अतिरिक्त दहा जागांचा निर्णय नेत्यांशी चर्चा करून घेण्यात येणार असल्याचे अध्यक्षा सौ. महाडिक यांनी सभेनंतर पत्रकारांशी बोलताना सांगितले. 

अधिकारी बसले ताटकळत
सभेची वेळ दुपारी एकची होती; पण नावे निश्‍चित होत नसल्याने अध्यक्षांसह पदाधिकाऱ्यांनीही सभागृहाकडे पाठ फिरवली. दुसरीकडे मुख्य कार्यकारी अधिकारी कुणाल खेमणार, चंद्रकांत वाघमारे यांच्यासह काँग्रेस, भाजप आघाडीचे काही सदस्य तासभर सभागृहातच ताटकळत बसले होते. सभेचे कामकाज अवघ्या पंधरा-वीस मिनिटांत संपले; पण हे सर्व जण दोन तास सभागृहातच बसून होते.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Amethi Congress Office: अमेठीत राडा, काँग्रेस कार्यालयाबाहेरील अनेक वाहनांची तोडफोड; भाजपवर आरोप

Poonch Attack 2024: पुंछ हल्ल्यामागे पाकिस्तानची संघटनेचा हात, तीन ते चार दहशतवाद्यांनी...

Daily Rashi Bhavishya : आजचे राशिभविष्य - 06 मे 2024

Women’s T20 World Cup: स्कॉटलँडने रचला इतिहास, वर्ल्ड कपचं पहिल्यांदाच मिळवलं तिकीट; श्रीलंकाही ठरले पात्र

Sharad Pawar : बारामतीकरांना धक्का अशक्य;निवडणुकीची अमेरिकेतही उत्सुकता

SCROLL FOR NEXT