जामखेड : ""गाव वाईट नसते. गावातील दोन-चार जण वाईट असतात. अशा लोकांना बळ मिळणार नाही, त्यासाठी आपण दक्ष राहिले पाहिजे. पवार कुटुंबाने हिंमत हरू नये, खचू नये. आम्ही तुमच्या पाठीशी आहोत,'' अशा शब्दांत वंचित बहुजन आघाडीचे प्रमुख ऍड. प्रकाश आंबेडकर यांनी मृत बाळू पवार यांच्या कुटुंबीयांचे सांत्वन केले. खर्डा येथे झालेल्या मारहाणीत बाळू बजरंग पवार यांचा मृत्यू झाला. पवार कुटुंबीयांची आज ऍड. आंबेडकर यांनी भेट घेतली. ऍड. आंबेडकर म्हणाले, ""प्रत्यक्षदर्शीने पाहिले, तेच पोलिसांना व तेच न्यायालयात सांगितले पाहिजे. साक्षीदार आपल्या भूमिकेवर ठाम राहिले पाहिजेत. नाहीतर गावातील अशा लोकांचे बळ वाढते. कुटुंबीयांनी हिंमत हरता कामा नये. आम्ही त्यांच्या पाठीशी आहोत.'' वंचित बहुजन आघाडीचे महाराष्ट्र सचिव प्रा. किसन चव्हाण, बापूसाहेब ओहोळ, विशाल पवार, सागर आहेर, विद्रोही शाहीर शीतल साठे, ऍड. अरुण जाधव आदी उपस्थित होते. मारहाणीत जखमीचा उपचारादरम्यान मृत्यू पैशाच्या वादातून पाच जणांनी केलेल्या मारहाणीत जखमी झालेल्या बाळू बजरंग पवार (वय 40, रा. खर्डा) यांचा उपचारादरम्यान गेल्या बुधवारी रात्री बार्शी (सोलापूर) येथील रुग्णालयात मृत्यू झालेला आहे. खर्डा येथे बाळू पवार यांच्या पार्थिवावर अंत्यसंस्कार करण्यात आले. याबाबत मृत बाळू यांची मावशी वेणूबाई बाजीराव काळे यांनी जामखेड पोलिस ठाण्यात फिर्याद दिलेली आहे. त्यानुसार सुधीर बाळू वाळस्कर, आकाश बाळू वाळस्कर, योगेश बलभीम वाळस्कर, रोहित ऊर्फ बबलू बाळासाहेब गोलेकर व गौतम राहुल तादगे (सर्व रा. खर्डा) यांच्याविरुद्ध खुनाचा गुन्हा दाखल करण्यात आलेला आहे. त्यातील आरोपी आकाश व योगेश वाळस्कर यांना पोलिसांनी ताब्यात घेतलेले असून, अन्य आरोपी पसार आहेत. दिलेल्या फिर्यादीनुसार, उसन्या पैशाच्या वादातून खर्डा येथे मंगळवारी (ता. 29) बाळू पवार यास वरील आरोपींनी बेदम मारहाण केली होती. त्यात बाळू पवार जबर जखमी झाले होते. खर्डा येथे प्राथमिक उपचारानंतर त्यांना बार्शी येथे हलविण्यात आले होते. तेथे उपचारादरम्यान बुधवारी रात्री त्यांचा मृत्यू झाला. उत्तरीय तपासणीसाठी येथील ग्रामीण रुग्णालयात मृतदेह आणण्यात आणला. त्या वेळी तेथे तणावाचे वातावरण होते. अनुचित प्रकार टाळण्यासाठी मोठा पोलिस बंदोबस्त दिला होता. |