सोलापूर : पुण्यश्लोक अहिल्यादेवी होळकर सोलापूर विद्यापीठाची परीक्षा १ डिसेंबर ते १० फेब्रुवारीला संपली. एकूण ९७ अभ्यासक्रमांपैकी अजूनही जवळपास ५१ अभ्यासक्रमांचे निकाल जाहीर व्हायचे बाकी आहेत. २०२४-२५ या शैक्षणिक वर्षातील अंतिम सत्र परीक्षा एप्रिलच्या दुसऱ्या आठवड्यापासून सुरु करण्याचे विद्यापीठाचे नियोजन आहे. तरीदेखील, अजून मागील सत्राच्याच परीक्षांचे सर्व निकाल जाहीर झालेले नाहीत.
पुण्यश्लोक अहिल्यादेवी होळकर सोलापूर विद्यापीठाशी संलग्नित १०९ महाविद्यालयांमध्ये ज्या अभ्यासक्रमांचे जेवढे विद्यार्थी, त्या संख्येच्या दीडपट उत्तरपत्रिका संबंधित विषयाच्या प्राध्यापकांनी तपासायच्या असा निकष आहे. पण, लॉ, शिक्षणाशास्त्र, फार्मसी, अभियांत्रिकी अशा काही अभ्यासक्रमांसाठी नियमित (परमनंट) प्राध्यापक नसल्याने त्या अभ्यासक्रमांचे निकाल नेहमीच विलंबाने लागतात. त्यातही तासिका तत्त्वावरील प्राध्यापकांवरच उत्तरपत्रिका तपासणीचा भार पहायला मिळतो.
विद्यापीठ अनुदान आयोगाच्या निकषांनुसार (युजीसी) किती वर्षे अध्यापनाचा अनुभव असलेल्या तासिका तत्त्वावरील प्राध्यापक उत्तरपत्रिका तपासू शकतात, याचाही नियम ठरलेला आहे. पण, सध्या निकाल वेळेत जाहीर होण्यासाठी बहुतेक ‘सीएचबी’ प्राध्यापक उत्तरपत्रिका तपासत आहेत. दोन सत्रात ९० दिवसांचे अंतर असावे, असा ‘युजीसी’चा नियम आहे, पण सध्या परीक्षा वेळेत होत नाहीत आणि निकालासही विलंब होतो, त्यामुळे त्या नियमाचे पालन होत नाही, असेही दिसून येते.
आठ ते दहा दिवसांत जाहीर होतील निकाल
आतापर्यंत जवळपास ४० अभ्यासक्रमांचे निकाल जाहीर झाले असून उर्वरित निकाल देखील आठ ते दहा दिवसांत जाहीर होतील. काही अभ्यासक्रमांचे निकाल २० ते २५ दिवसांतही लावले आहेत. नवीन स्वॉप्टवेअरमधून पहिल्यांदाच निकालाची प्रक्रिया अचूक आणि त्रुटींशिवाय पार पडली आहे. त्यासाठी संगणक विभागातील अधिकारी व कर्मचाऱ्यांचे योगदान राहिले आहे.
- डॉ. श्रीकांत अंधारे, परीक्षा नियंत्रक, पुण्यश्लोक अहिल्यादेवी होळकर सोलापूर विद्यापीठ
संपूर्ण निकालासाठी आणखी २० दिवस लागणार
विद्यापीठातील १२ संकुले व संलग्नित १०९ महाविद्यालयांमधील सुमारे ७२ हजार विद्यार्थ्यांनी परीक्षा दिली. सुमारे तीन लाख उत्तरपत्रिकांपैकी अजूनही २५ हजार उत्तरपत्रिकांची तपासणी बाकी आहे. त्या लॉ, फार्मसी, अभियांत्रिकी व बीएड (शिक्षणशास्त्र) अशा अभ्यासक्रमांचा समावेश आहे. सत्र परीक्षांचे संपूर्ण निकाल जाहीर व्हायला आणखी २० दिवस लागणार, अशी सद्य:स्थिती आहे.
सकाळ+ चे सदस्य व्हा
ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!
शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.
Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.