interview vasant keshav bhosale
interview vasant keshav bhosale 
पश्चिम महाराष्ट्र

‘भाषा शिक्षक आयात करावे लागतील’

जयसिंग कुंभार

सांगली -  ज्येष्ठ साहित्यिक प्रा. वसंत केशव पाटील यांना आज (ता.२० मार्च)  पंचाहत्तर वर्षे पूर्ण होत आहेत. हरीवंशराय बच्चन यांच्या ‘दशद्‌वार से  सोपान तक’ या आत्मचरित्राच्या प्रा. पाटील यांनी केलेल्या अनुवादाला साहित्य अकादमीने गौरविले आहे. ललित लेखक, कथाकार, कवी, गझलकार आणि आजघडीचा राष्ट्रीय स्तरावरील भाषांतरकार साहित्यक अशी ओळख असलेल्या प्रा. पाटील यांचे मराठी साहित्यविश्‍वातील योगदान मोठे आहे. पंचाहत्तरीनिमित्त मराठी भाषा, साहित्य व्यवहाराचे वर्तमान, भविष्य, भाषांतरित साहित्य या विषयांवर त्यांच्याशी झालेला संवाद.
 
प्रश्‍न ः वर्तमान मराठी साहित्य व्यवहाराचा विस्तार आता सर्वव्यापी झाला आहे असं म्हणता येईल का?

प्रा. पाटील ः हो नक्की. गावापर्यंत साहित्य संमेलन होतायेत. चर्चा होते; मात्र हा विस्तार म्हणजे त्यात खोली आली असे नव्हे. याला सर्वस्वी मराठी प्राध्यापक, साहित्यिकांमधील सुखवस्तूपणा कारणीभूत आहे. 
साहित्यिकांमधील कंपू-गटबाजीमुळे मराठी साहित्यविश्‍व बरबटून गेलेय. आपले प्राध्यापक पेट्रोलच्या दरवाढीवर जेवढी चिंता करतात तेवढीही ते साहित्य-पुस्तक व्यवहाराबद्दल बोलत नाहीत. त्यामुळे विस्तार म्हणजे खोली नव्हे हे  पक्के भान ठेवून आपण बोललं पाहिजे.


प्रश्‍न ः भाषा समृद्धीसाठीच्या कामाची दिशा कोणती हवी?


प्रा. पाटील ः आपल्या साहित्य व्यवहारात सुखवस्तूपणा आलाय. तो मानसिक आणि भौतिक अशा दोन्ही पातळींवरचा आहे. भौतिक असला तर वाईट वाटायचं काम नाही; मात्र मानसिक पातळीवरील सुखवस्तूपणा निर्मितीक्षमताच संपवतो. ते आता झालंय.

हा साहित्यव्यवहार अधिक अर्थपूर्ण होण्यासाठी विविध घटकांसाठी मराठी भाषाविषयक कार्यशाळा, समीक्षाविषयक चर्चा, शाळा-महाविद्यालयीन स्तरावर निरंतर भाषाविषयक उपक्रम अशा पातळ्यावर काम करावे लागेल. आज गुगलच्या जाळ्यात अडकलेल्या पिढीला मराठीची नव्याने ओळख करून द्यायला हवी. ही परिस्थिती अशीच राहिली तर येत्या काळात आपल्याला मराठीचे शिक्षक आयात करावे लागतील. संस्कृत, प्राकृत, पाली या भाषांच्या अध्यापनाची स्थिती आपण पाहतोच आहोत. हा धोका फार दूर नाही.

 प्रश्‍न ः भाषांतरित साहित्याचा स्वतंत्र प्रवाह झाला आहे, त्याबद्दल आपले मत सांगा?

प्रा.पाटील ः अनुवाद ही सोपी प्रक्रिया नाही. त्यासाठी तुमच्या दोन भाषा पक्‍क्‍या हव्यात. शिवाय इंग्रजी आणि तिथली प्रादेशिक भाषाही पक्की हवी. भाषिक समृद्धीवरच अनुवादाचा दर्जा ठरतो. विविध भाषांमधून अक्षर वाङ्‌मय भाषेत येतं तेव्हा ते त्या भाषेची समृद्धी वाढते. 

भाषांतरकाराला भाषेच्या अंतरात उतरता आले पाहिजे. त्याचवेळी त्या भाषेतून होणाऱ्या पुस्तकांचे अनुवादही महत्त्वाचे आहेत. आपले मराठी भाषक आता जगभरात आहेत. त्यांनी मराठीतील पुस्तके त्या- त्या स्थानिक भाषांमध्ये अनुवादित केली पाहिजेत. त्यातून भाषेचा विस्तार होतो, प्रभाव वाढतो. कन्नडला मिळालेल्या आठ ज्ञानपीठ पारितोषिकांमागचं ते गमक आहे. आपल्याला भाषा शत्रुत्व  नव्हे तर भाषा संवाद करायला हवा. त्यासाठी स्वागतशील असायला हवं.

प्रश्‍न ः मराठीला जागतिक महत्त्व कसे प्राप्त होईल? 

प्रा. पाटील ः ही काही जादूची कांडी नाही. तर मराठी समाजाच्या, साहित्याच्या प्रभावातून ते साध्य होईल. मराठीत प्रसिद्ध होणाऱ्या नव्वद टक्के पुस्तकांचं काळाच्या कसोटीवर साहित्यक मूल्य काय याचं आपण कधीतरी आत्मचिंतन केलेच पाहिजे. जे दर्जेदार आहे ते चांगले असतेच; मात्र जे चांगले आहे ते दर्जेदार असेलच असं नाही. भजी-भडंग खाऊन हिंदकेसरी होत नाही. त्यासाठी दूधच द्यायला हवं. मराठीच्या समृद्धीसाठी हे भान हवं. 

प्रश्‍न ः आता पंचाहत्तरीच्या टप्प्यावरील नव्या संकल्पांबद्दल सांगा?

प्रा. पाटील ः माझ्या निवडक ३५ कथांचं पुस्तक येतेय. प्रा. नागनाथ कोतापल्ले त्याचे संपादन करीत आहेत. एक कादंबरी येतेय. तिचा पट पन्नास-साठ वर्षांपूर्वीचा आहे. मंदिराचा जीर्णोद्धार आणि गाव याभोवतीचं ते कथानक आहे. माझं कवितेचं पुस्तक येतेय. याचं शीर्षक सांगायलाच हवं; ‘२१ व्या शतकातल्या ५६ व्या केशवसुतांची कविता’. कवी आणि कविता मध्यवर्ती ठेवून केलेल्या या कविता आहेत. मी आधी कवी आहे याचा मला अभिमान आहे. या कविता सवंगपणावर तिरके, उभे-आडवे चिमटे काढत, फटके मारतात. स्वभावतः मी एकलकोंडा आहे. माझी अस्वस्थता मला  स्वस्थ बसू देत नाही. गर्दीची मला अभिलाषा कधीच नव्हती, नाही. त्यामुळे साहित्यविषयक कामात माझं काम सतत सुरुच राहील.

संपादन - धनाजी सुर्वे 

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

IPL 2024, RCB vs CSK: चेन्नईचा 17 व्या हंगामातील प्रवास थांबला! धोनीचीही कारकिर्द संपली? सामन्यानंतरचा पाहा Video

Loksabha Election 2024 : हुश्श..! प्रचार संपला, राज्यात तोफा शांत, तलवारी म्यान

IPL 2024: RCB चा आनंद गगनात मावेना! प्लेऑफमध्ये पोहचताच केला जोरदार जल्लोष, पाहा Video

‘चार सौ पार’ पासून बहुमताच्या आकड्यापर्यंत

सत्ता ठरवणारा उ त्त र रं ग

SCROLL FOR NEXT