पश्चिम महाराष्ट्र

भारताला बलवान करण्यासाठी बालआरोग्याकडे गांभीर्याने पाहा - पी. चिदंबरम

सकाळवृत्तसेवा

कसबा बावडा - ‘भारताला बलवान बनविण्यासाठी बालआरोग्याकडे गांभीर्याने पाहण्याची आवश्‍यकता आहे’, असे प्रतिपादन माजी गृह व अर्थमंत्री पी. चिदंबरम यांनी येथे केले. 

डॉ. डी. वाय. पाटील विद्यापीठाच्या सहाव्या पदवीदान समारंभात प्रमुख पाहुणे म्हणून ते बोलत होते. कुलपती डॉ. विजय भटकर अध्यक्षस्थानी होते. श्रीमंत शाहू छत्रपती महाराज यांना डी. लिट., तर डॉ. अरुणकुमार आगरवाल यांना डी. एस्सी. पदवी देऊन गौरविण्यात आले. पद्मश्री डॉ. डी. वाय. पाटील, डॉ. संजय पाटील, आमदार सतेज पाटील, कुलगुरू पी. बी. बेहरे, कुलसचिव डॉ. विश्‍वनाथ भोसले, वित्त अधिकारी श्‍याम कोले उपस्थित होते. डॉ. डी. वाय. पाटील हॉस्पिटलच्या प्रांगणात हा सोहळा झाला.

पी. चिदंबरम यांनी आपल्या भाषणात बालआरोग्याविषयी मुद्देसूद विवेचन करताना गरीब नागरिकांना मिळणाऱ्या आरोग्य व उपचारांविषयी काळजी व्यक्त केली. तरुण डॉक्‍टरांनी भावी काळात कशा प्रकारे आचरण ठेवावे, याविषयीही मार्गदर्शन केले.
श्री. चिदंबरम म्हणाले, ‘‘लोकसंख्यावाढ रोखण्यासाठी भारताने केलेल्या प्रयत्नांना यश आले आहे. भारताचा जन्मदर २.२ इतका असून, तो २.१ इतका संपादन करण्यापर्यंत आपण मजल मारली आहे. २०४५ ते २०५० च्या दरम्यान आपली लोकसंख्या स्थिर असेल. त्यानंतर काय असा प्रश्‍न निर्माण होईल; पण ही लोकसंख्या निरोगी असण्यासाठी लहान मुलांच्या आरोग्याकडे 
लक्ष देणे अत्यंत गरजेचे आहे. मुले निरोगी झाली पाहिजेत, ती प्रौढही निरोगीच व्हायला हवीत. त्यांनी शिक्षण घेऊन स्वतःला कौशल्यपूर्ण बनविले पाहिजे. आपण सातत्याने इतरांच्या उपयोगी पडण्यासाठी कार्यरत राहिले पाहिजे. स्वातंत्र्य मिळाल्यापासून भारतीयांच्या सरासरी आयुर्मानात वाढ झाली असून, साक्षरतेचे प्रमाणही १६ वरून ७३ टक्‍क्‍यांवर गेले आहे. अर्भक मृत्युदरातही घट झाली आहे; तो दर ५१ वरून ४१ टक्के असा घसरलेला आहे; पण अपुरे अन्न, हलक्‍या प्रतीचा आहार, अशुद्ध पाणी आणि मलःनिस्सारण सुविधांचा अभाव यांचा मुलांच्या आरोग्यावर वाईट परिणाम होत आहे, याचाही विचार करण्याची गरज आहे.’’ 

श्री. चिदंबरम म्हणाले, ‘‘अन्न सुरक्षा कायदा-२०१३ नुसार प्रतिव्यक्तीस अन्नधान्य पुरविण्याची वचनपूर्ती करण्यात आली आहे; पण या कायद्यानुसार दिलेल्या अभिवचनाची आज पूर्तता होताना दिसत नाही. यात डॉक्‍टरांची भूमिका महत्त्वाची असून, लोकसंख्येच्या मानाने आपल्याकडे अजूनही डॉक्‍टरांची संख्या कमी असून, त्यासाठी प्रयत्न करण्याची आवश्‍यकता आहे. देशाची अर्थव्यवस्था ही सार्वजनिक, सरकारी, खासगी अशी विभागली आहे. सार्वजनिक रुग्णालयांचे जाळे वाढविले पाहिजे व ती आधुनिक केली पाहिजेत. त्यांनी रुग्णांची सेवा ही खासगी सेवांप्रमाणे करावी, त्याचा परिणाम नक्कीच चांगला होईल.’’

‘‘मी केवळ पैशांसाठी व माझ्या कुटुंबासाठी काम करणार नाही; तर समाजातील सर्व रुग्णांना मदत करेन, या भावनेने सेवा द्या,’’ असे आवाहन विद्यार्थ्यांना करून चिदंबरम म्हणाले, ‘‘आम्ही तुमच्याकडे देशातील लोककल्याणाचे काम सोपवत असून, आपण बालआरोग्याकडे गांभीर्याने लक्ष द्यावे.’’

अध्यक्षीय भाषणात ज्येष्ठ संगणक तज्ज्ञ व कुलपती डॉ. विजय भटकर यांनी देशाच्या आरोग्याच्या प्रगतीच्या मांडणीविषयी पी. चिदंबरम यांच्या भाषणाचा संदर्भ देत डॉक्‍टरांच्या जबाबदारीविषयी मार्गदर्शन केले.

या वेळी कुलगुरू डॉ. पी. बी. बेहरे यांनी विद्यापीठाच्या प्रगतीचा आढावा घेतला. कार्यक्रमास महापौर स्वाती यवलुजे, शांतादेवी पाटील, वैजयंती पाटील, प्रतिमा पाटील, राजश्री काकडे, शाही परिवारातील महाराणी याज्ञसेनी राजे, संयोगिताराजे, मधुरिमाराजे, खासदार संभाजीराजे, मालोजीराजे, ऋतुराज पाटील, पृथ्वीराज पाटील, प्रा. संजय मंडलिक, सहायक धर्मादाय आयुक्त निवेदिता गायकवाड, पी. बी. साबळे, शिवाजी विद्यापीठाचे प्रकुलगुरू डी. टी. शिर्के, कुलसचिव डॉ. विलास नांदिवडेकर, शैक्षणिक सल्लागार डॉ. डी. आर. मोरे, नगरसेवक तसेच शैक्षणिक क्षेत्रातील अनेक व्यक्ती उपस्थित होत्या.

व्हिजन ठेवल्याने प्रगती - डॉ. आगरवाल
डॉ. अरुणकुमार आगरवाल म्हणाले, ‘‘व्हिजन ठेवून काम केल्याने प्रगती होते, हे डॉ. डी. वाय. पाटील शिक्षण संस्थेने दाखवून दिले आहे. मुलींच्या शिक्षणात चांगली प्रगती होत असून, तुमच्या यशाच्या प्रत्येक टप्प्यावर तुमच्यामागे पालकांचा आशीर्वाद असतो, हे नेहमी लक्षात ठेवा. तुम्ही कोठेही असा, पालकांना विसरू नका. रुग्णांबरोबर संवाद साधा. त्यांच्याशी नम्र व सत्याने वागा. त्यांचे आशीर्वाद तुमच्या पाठीशी राहतील.’’

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

IPL 2024 MI vs SRH: सूर्यकुमारचं तडाखेबंद शतक अन् मुंबईचा दणदणीत विजय; वानखेडेवर हैदराबादला दिला पराभवाचा धक्का

MI vs SRH: पहिलाच सामना अन् हेडचा उडवलेला त्रिफळा, पण झाला नो-बॉल; निराश झालेल्या अंशुलला बुमराह-हार्दिकने असा दिला धीर

Mumbai News : मुंबईतील कार्यालयीन वेळेत बदल होणार? रेल्वेच्या आवाहनाला ३३ कंपन्यांचा प्रतिसाद

Abhishek Ghosalkar: घोसाळकर कुटुंबियांना सीसीटीव्ही फुटेज दाखवा; हायकोर्टाचे पोलिसांना निर्देश

Mumbai Riots: मुंबईतील 1992च्या दंगलीतील खटले निकाली काढा; सुप्रीम कोर्टाचे सरकारला निर्देश

SCROLL FOR NEXT