कोल्हापूर - बदलत्या काळाचा वेध घेत भविष्यवेधी डिजिटल क्रांतीवर स्वार होताना तळागाळातील सामान्य माणसांच्या न्याय्य हक्कांसाठीही तेवढ्याच खमकेपणाने लेखणी परजणाऱ्या ‘सकाळ’चा ३९ वा वर्धापन दिन येत्या गुरुवारी (ता. १) दिमाखात साजरा होणार आहे. ‘सकाळ’चा सोहळा म्हणजे तमाम कोल्हापूरवासीयांचा सोहळा. प्रसिद्ध संरक्षण विश्लेषक नितीन गोखले यंदाच्या सोहळ्याचे प्रमुख पाहुणे आहेत. ‘बालाकोट हल्ल्यानंतर भारतासमोरील सुरक्षिततेची आव्हाने’ या विषयावर ते संवाद साधतील. संगीतसूर्य केशवराव भोसले नाट्यगृहात सायंकाळी साडेपाच वाजता मुख्य सोहळ्याला प्रारंभ होईल.
गेली ३९ वर्षे ‘सकाळ’ने वर्धापन दिनाचे आगळेपण जपले आहे. वर्धापन दिनानिमित्तच्या व्याख्यानांतून विविध विषयांवर मंथन घडवताना आजवर अनेक नामवंत वक्त्यांची प्रभावळ या सोहळ्याला लाभली. यंदा तीच परंपरा नितीन गोखले पुढे नेणार आहेत. दक्षिण आशियातील प्रसिद्ध राजनैतिक व संरक्षण विश्लेषक म्हणून त्यांची ओळख असून सैन्यदल, युद्धांचा इतिहास अशा विषयावर त्यांनी विपुल लेखन केले आहे. या विषयावरील त्यांची पुस्तकेही प्रसिद्ध असून १९८३ मध्ये त्यांनी पत्रकारितेला प्रारंभ केला. गेली साडेतीन दशकं ते मुद्रित, वेब प्लॅटफॉर्मसह ब्रॉडकास्टच्या माध्यमातून सक्रिय आहेत. भारताच्या उत्तर-पूर्व भागामध्ये त्यांनी २३ वर्षे काम केले असून संघर्ष व्यवस्थापन म्हणजेच ‘कॉन्फ्लिक्ट मॅनेजमेंट’ या विषयाचा त्यांचा गाढा अभ्यास आहे. १९९९ चे कारगिल युद्ध, २००६ आणि २००७ च्या श्रीलंकेतील युद्धावेळचे त्यांचे ग्राउंड रिपोर्ट गाजले. ते एशिया पॅसिफिक सेंटर फॉर सिक्युरिटी स्टडीज्चे माजी विद्यार्थी असून भारतीय सैन्यदल महाविद्यालय, आयबी इंटेलिजन्स कॉलेजमध्येही ते मार्गदर्शन करतात. त्यांची वेबपोर्टल संरक्षण क्षेत्रातील माहितीसाठी प्रसिद्ध आहेत.
दरम्यान, वर्धापन दिनानिमित्त ‘वर्ल्ड वाईड वेबची तीस वर्षे’ या विषयावरील विशेषांकही प्रसिद्ध होणार आहे. विविध क्षेत्रांतील उल्लेखनीय काम केलेल्या पाच कर्तृत्ववंतांचा गौरवही मुख्य सोहळ्यात होणार आहे.
सकाळ+ चे सदस्य व्हा
ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!
शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.
Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.