मुरगूड : यमगे (ता. कागल ) येथे मंगळवारी सुरू झालेली गॅस्ट्रोची साथ आज अधिकच तीव्र झाली. आज दिवसभरात रुग्णांची संख्या वाढून 230 वर जाऊन पोचली. आज "सकाळ'मधून वृत्त प्रसिद्ध होताच प्रशासकीय पातळीवर हालचाली गतिमान झाल्या. ज्या धोकादायक व खराब पाण्याच्या टाकीतून पाणीपुरवठा केला जात होता, तो तत्काळ बंद करण्याबरोबर ती टाकी पाडून टाकणे, पाटाने येणारे पाणी बंद करून त्याऐवजी त्या ठिकाणी उद्या सायंकाळपूर्वी पाईपलाईन टाकण्याच्या सूचना जिल्हा परिषदेचे मुख्य कार्यकारी अधिकारी अमन मित्तल यांनी भेटीदरम्यान दिल्या. 24 रुग्णांवर ग्रामीण रुग्णालयात उपचार सुरू आहेत.
वैद्यकीय पथकाकडून तातडीचे उपचार सुरू झाल्याने साथ परिस्थिती नियंत्रणात आली आहे. पहाटे 3 पर्यंत रुग्णांची संख्या 132 होती. ती आज दिवसभरात 230 पेक्षा अधिक झाली. प्राथमिक शाळेच्या इमारतीत सर्व रुग्णांवर उपचार सुरू आहेत. यातील ज्यांना लक्षणे अधिक आहेत, अशा मारुती नारायण एकल (वय 50), अभिजित आनंदा कुंभार (23), रेखा सुभाष पाटील (45), चंद्रकांत श्रीपती लोकरे (34), महादेव उत्तम पाटील (30), प्रशांत राजेंद्र माने (26), मनीषा भिकाजी पाटील (40), आकाश शिवाजी पाटील (34), वैशाली आनंदा राजगिरे (30), माधुरी नितीन कुंभार (22), प्रीती अनिल लोकरे (19), रेखा रमेश पाटील (34), प्राजक्ता विकास पाटील (28), सुनीता ज्ञानदेव पाटील (31), अण्णा पांडुरंग कुंभार (40), सुनीता भैरवनाथ कुंभार (32), अंबूताई पांडुरंग भोळे (32), अश्विनी दीपक सुतार (31), रेश्मा विठ्ठल पाटील (33), सुजाता प्रकाश पाटील (34), मेघा सिद्धू डोणे (26), शुभांगी नामदेव पाटील (28), वैशाली मधुकर एकल (35), सुनीता मोहन पाटील (38) या 24 रुग्णांना पुढील उपचारासाठी मुरगूड ग्रामीण रुग्णालयात हलवून तेथे त्यांच्यावर उपचार सुरू आहेत.
जिल्हा परिषदेचे मुख्य कार्यकारी अधिकारी अमन मित्तल यांनी गावात पाहणी केली तसेच या विभागाला पाणीपुरवठा करण्यासाठी नव्याने गुरुवारी सायंकाळपर्यंत जलवाहिनी टाकण्याच्या सूचना दिल्या. तसेच पाण्याची टाकी पाडून टाकण्याची सूचना केली. दरम्यान, खासदार संजय मंडलिक यांनीही भेट देऊन रुग्णांची चौकशी केली. यावेळी जिल्हा परिषद सदस्य मनोज फराकटे, पंचायत समितीचे सभापती विश्वास कुराडे, माजी उपसभापती विजय भोसले, शामराव पाटील, किरण पाटील, ग्रामसेवक पाटील, शिवाजी पाटील, दिलीप पाटील उपस्थित होते.
चौकट :
मंत्री मुश्रीफ यांच्याकडून गंभीर दखल
ग्रामविकासमंत्री हसन मुश्रीफ दोन दिवसांपासून मुंबईत आहेत. यमगे येथील गॅस्ट्रोच्या साथीची माहिती त्यांना मिळाली. याची गंभीर दखल घेऊन त्यांनी जिल्हा परिषदेचे मुख्य कार्यकारी अधिकारी अमन मित्तल व जिल्हा आरोग्य अधिकारी योगेश साळे यांना तातडीने यमगे गावी पोचण्याच्या व सर्वतोपरी उपाययोजना करण्याच्या सूचना दिल्या.
....
ग्रामपंचायतीवर ठपका
कोल्हापूर : यमगे (ता. कागल) येथे तीव्र अतिसाराची लागण झाली आहे. गावाला पाणीपुरवठा करणाऱ्या टाकीत नियमित टीसीएल टाकणे आवश्यक आहे; मात्र टीसीएल टाकले जात नसल्याचे आढळून आले आहे. मुळात टाकीस शिडीची व्यवस्था नसल्याचे स्पष्ट झाले आहे. गावाला शुद्ध पाणीपुरवठा करण्याची जबाबदारीच मुळी ग्रामपंचायत व ग्रामसेवकांवर आहे. त्यामुळे या सर्वांस ग्रामपंचायत व ग्रामसेवक जबाबदार असल्याचा अहवाल आरोग्य विभागाने दिला आहे.
सकाळ+ चे सदस्य व्हा
ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!
शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.
Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.