चंदगड : चंदगड-गडहिंग्लज मार्गावरील सातवणे (ता. चंदगड) हे गाव टेकडीवर वसलेले. गावात जायचे म्हटल्यास मोठा चढ आणि निमुळत्या गल्ल्यांमुळे अत्यंत जिकिरीचे. काही गल्लीतून चारचाकी वाहन जातच नव्हते. गतवर्षी मुख्यमंत्री ग्रामसडक योजनेतून रस्ता मंजूर झाला. टेकडी फोडून चढ कमी करण्यात आला. आता डांबरीकरणाचे काम सुरू झाले आहे. अतिक्रमणे काढून गल्लींची रुंदी वाढवल्याने वाहतूक सुरळीत झाली आहे.
सुमारे दीड हजार लोकवस्तीचे हे गाव गणेशोत्सवाच्या सणामुळे प्रसिद्धीस आले. गावात प्रत्येक घरात गणेशचतुर्थीचा सण वेगळ्या उत्साहाने आणि भव्य प्रमाणात साजरा केला जातो. सार्वजनिक मंडळांप्रमाणे मोठी मूर्ती, मंडप, सुशोभीकरण आणि हलते देखावे यामुळे पंचक्रोशीसह आजरा, गडहिंग्लज, बेळगाव परिसरांतून नागरिक खास गाड्या करून गणपती पाहण्यासाठी येतात; परंतु गावाची रचना चढ-उताराची होती.
गावच्या प्रवेशद्वारापासून जसजसे पुढे जाऊ तसतसा मोठा चढ चढावा लागायचा. चालताना दम लागायचा. वाहन हाकणेसुद्धा जिकिरीचे होते. स्थानिक नागरिकांचे नातेवाईक गावच्या प्रवेशद्वारातच पार्किंग करून पुढे जात असत. सरपंच रामभाऊ पारसे यांनी मुख्यमंत्री ग्रामसडक योजनेतून 80 लाख 69 हजार रुपयांचा निधी मंजूर करून घेतला. सध्या कामही प्रगतीपथावर आहे. चढाव फोडून काढण्यात आला असून बाजूच्या घरांना धोका होऊ नये म्हणून गटार आणि सिमेंटची भिंत बांधण्यात येत आहे.
टेकडीवरील एका गल्लीतील वळण आणि निमुळता रस्ता यामुळे वाहतूक करता येत नव्हती. हे अतिक्रमण काढून रस्ता वाहतुकीसाठी सुरळीत करण्यात आला आहे. आता गावातील कोणत्याही गल्लीत सुरक्षितपणे वाहन नेता येईल, असे रुंदीकरण करण्यात आले आहे. रस्त्यामुळे गावचे रूपडे पालटले आहे.
वचन पूर्णत्वाला नेता आले
टेकडीमुळे बाहेरून येणारे लोक गावाला नावे ठेवत असत. सरपंच पदाची निवडणूक लढवताना ग्रामस्थांना या रस्त्याचे वचन दिले होते. ते पूर्णत्वाला नेता आले याचे समाधान आहे.
- रामभाऊ पारसे, सरपंच, सातवणे
सकाळ+ चे सदस्य व्हा
ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!
शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.
Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.