कळंबा : साखर कारखान्यांचा गळीत हंगाम सुरू झाल्याने दुष्काळ पट्ट्यातील शेकडो ऊसतोड मजूर कुटुंबीयांबरोबर कळंबा परिसरात दाखल होत आहेत. यात शालेय मुलांचाही समावेश असल्याचे चित्र आहे. शिक्षणाची सुविधा नसल्याने या मजुरांची मुले उसाच्या फडातच शिक्षणाचे धडे गिरवताना दिसत आहेत.
ऊस तोड मजूर पोटाची खळगी भरण्यासाठी दरवर्षी ऑक्टोबर ते मार्चपर्यंत साखर कारखान्यांची वाट धरतात. लातूर, बीड, उस्मानाबाद यासह अनेक ठिकाणाहून शेकडो ऊसतोड मजूर गळीत हंगामाच्या दरम्यान येतात. चार ते सहा महिने ऊस तोडून ते पावसाळ्याच्या तोंडावर गावी परतात. यंदा दसऱ्याचा मुहूर्त साधत अनेक साखर कारखान्यांनी गळीत हंगामाचा प्रारंभ केला आहे. यामुळे कारखान्यावर जाण्यासाठी संसाराचे बिराड बांधून ट्रक ट्रॅक्टरच्या माध्यमातून ऊस तोड मजूर दाखल होत आहेत. अनेक मजूर आपल्या मुलांना सोबत घेऊन येत आहेत. मात्र, कारखान्यांनी साखर शाळा व जिल्हा प्रशासनाने या मुलांच्या शिक्षणासाठी कोणतीही सुविधा केलेली दिसत नसल्यामुळे यामधील अनेक मुले मजुरांबरोबर दिवस उजाडल्यापासून मावळेपर्यंत उसाच्या फडातच शैक्षणिक साहित्य घेऊन अभ्यास करताना दिसत आहेत.
साखर कारखाना प्रशासन व जिल्हा प्रशासन यांनी तात्पुरत्या स्वरूपात या मुलांच्या शिक्षणाची व्यवस्था करावी, अशी मागणी ऊसतोड मजुरांमधून होत आहे. ऊसतोड मजुरांच्या मुलांचे शैक्षणिक नुकसान होऊ नये म्हणून त्यांनी मूळ गावी व इतर नातेवाईकाकडे थांबून शिक्षण घ्यावे. या उद्देशाने समग्र शिक्षा अभियाना अंतर्गत हंगामी वसतिगृहाची योजना सुरू केली आहे. याबाबत स्थानिक प्राथमिक शिक्षण विभागाने स्थलांतरित विद्यार्थ्यांचे सर्वेक्षण करून शिक्षणाधिकाऱ्यांना अहवाल पाठवला आहे. मात्र, अनेक ऊसतोड मजूर मुलांना या वसतिगृहात दाखल करत नाहीत. गळीत हंगामाच्या ठिकाणी त्यांना सोबत घेऊन जातात. त्यामुळे ह्या ऊसतोड मजुरांची मुले शिक्षणापासून वंचित राहत आहेत, असे या ऊसतोड टोळीच्या मुकादमने सांगितले.
"ऊसतोड मजुरांच्या मुलांना शिक्षण प्रवाहात आणण्यासाठी प्रयत्न केले जाणार आहेत. त्यात ६ ते १४ वयोगटातील मुलांना शाळेत दाखल करावे; तर ३ ते ६ वयोगटातील मुलांसाठी अंगणवाडी सुरू करावी. तसेच, त्यांना गणवेश, शैक्षणिक साहित्य, पोषण आहार मिळावा, यासाठी शासनाला निवेदन देण्यात येणार आहे."
-अनुराधा भोसले, संस्था अध्यक्षा, अवनी
सकाळ+ चे सदस्य व्हा
ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!
शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.
Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.