वन्यप्राण्यांच्या उपद्रवावर तोडगा निघणार का?
चंदगड तहसीलमध्ये आज निर्णायक बैठक ः ठोस निर्णयांची अपेक्षा; नुकसानभरपाई व संरक्षण उपायांवर चर्चा
सुनील कोंडुसकर : सकाळ वृत्तसेवा
चंदगड, ता. २१ : तालुक्याच्या पश्चिम भागातील शेतकऱ्यांना वन्यप्राण्यांचा वाढता त्रास लक्षात घेता उद्या (ता. २२) येथील तहसील कार्यालयात वनविभागाचे वरिष्ठ अधिकारी व शेतकरी यांच्यात महत्त्वपूर्ण बैठक होणार आहे. या बैठकीकडे त्रस्त शेतकऱ्यांसह सर्वसामान्य नागरिकांचे लक्ष लागले असून, ठोस निर्णयांची अपेक्षा व्यक्त होत आहे.
गेल्या दीड दशकापासून वन्यप्राण्यांच्या उपद्रवामुळे शेतीचे मोठ्या प्रमाणात नुकसान होत आहे. यामुळे शेतकऱ्यांचे आर्थिक गणित कोलमडले असून, या प्रश्नावर अनेक वेळा निवेदने, मोर्चे आणि रास्ता रोको आंदोलने केली आहेत. मात्र, प्रत्येक वेळी आश्वासनांपलीकडे ठोस कार्यवाही झालेली दिसून येत नाही, अशी शेतकऱ्यांची तक्रार आहे.
गेल्या आठवड्यात ॲड. संतोष मळवीकर, नितीन पाटील, प्रा. सुनील शिंत्रे, शंकर मनवाडकर आदींच्या नेतृत्वाखाली तहसील कार्यालयावर मोर्चा काढण्यात आला. त्यावेळी वरिष्ठ अधिकाऱ्यांनी बैठक घेऊन तोडगा काढण्याचे ठरविले होते. त्यानुसार ही बैठक आयोजित केली आहे.
दरम्यान, वन विभागाचे अधिकारी शासनाच्या नियमांनुसार कार्य करीत असले तरी शेतकऱ्यांच्या समस्या प्रभावीपणे शासनापर्यंत पोहोचविल्या जातात का, हा प्रश्न उपस्थित केला जात आहे. त्यामुळे उद्याच्या बैठकीत केवळ चर्चा न होता प्रत्यक्षात अमलात आणता येतील असे ठोस निर्णय घेतले जातील का, याकडे सर्वांचे लक्ष आहे.
वन्य प्राण्यांपासून शेतीचे संरक्षण, नुकसानभरपाई प्रक्रिया सुलभ करणे तसेच प्रतिबंधात्मक उपाययोजना याबाबत ठोस धोरण जाहीर होणे आवश्यक असल्याची मागणी शेतकरी वर्गातून होत आहे. अन्यथा ही बैठकही मागील बैठकींसारखी केवळ औपचारिक ठरू नये, अशी अपेक्षा व्यक्त केली जात आहे.
............
प्रतिक्रिया....
वन विभागाकडून वन्यजीव कायद्यांची अंमलबजावणी केली जात आहे. मात्र, त्यांच्या अन्नपाण्याची व्यवस्था शेतकरी करत आहेत. शासन याकडे गांभीर्याने पाहणार का, हा खरा प्रश्न आहे. वन्यप्राणी मालकी हद्दीत येऊन पिकांवर ताव मारत असतील, तर त्याची नुकसानभरपाई शेतकऱ्यांना योग्य दराने देणे ही शासनाची जबाबदारी आहे.
- रमेश चौगुले, शेतकरी, भोगोली
सकाळ+ चे सदस्य व्हा
ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!
शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.
Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.