02754
निपाणी ः येथील स्तवनिधीजवळ सापडलेले खंडित शिलालेख.
स्तवनिधीमध्ये आढळला शिलालेख
डॉ. सूरज मडके, डॉ. मनोज पाटील यांनी केले वाचन ः महत्त्वपूर्ण माहिती उघड
प्रविण जाधव सकाळ वृत्तसेवा
गांधीनगर, ता.२६ः श्रीक्षेत्र स्तवनिधी (ता. निपाणी) येथे एका खंडित मूर्तीवरील हळे कन्नड लिपीतील शिलालेखाचे वाचन होऊन महत्त्वपूर्ण माहिती समोर आली आहे. स्तवनिधी येथे मुनि पायसागर महाराजांच्या गुंफेच्या मागील भागात एका झाडाखाली काही खंडित मूर्ती ठेवल्या आहेत. त्यातील एका प्राचीन तीर्थंकर मूर्तीच्या पादपीठावर हा शिलालेख आढळला आहे.
हे शिल्प पूर्णपणे खंडित झाली असून त्यातील तीर्थंकर मूर्ती पादपीठापासून वेगळी झाली आहे. पादपीठाला जोडून कोरीव आणि सुंदर नक्षीकाम केलेली प्रभावळ आहे. प्रभावळीच्या खालच्या भागात पादपीठावर डाव्या बाजूस यक्ष आणि उजव्या बाजूस यक्षिणी कोरले आहेत. डॉ. सूरज मडके आणि डॉ. मनोज पाटील यांना हा मूर्तीसंग्रह पार्श्वनाथ गुरुकुलाचे संचालक महावीर पाटील यांनी दाखविला. त्यात शिल्प आणि त्यावरील कोरीव लेख डॉ. मडके यांना आढळला. त्यांनी त्याचे फोटो आणि ठसे घेऊन कर्नाटकातील दावणगिरी येथील हळे कन्नड भाषेचे अभ्यासक आणि इतिहास संशोधक डॉ. रविकुमार नवलगुंद यांच्याकडून वाचन करून घेतले.
दोन ओळींच्या या शिलालेखात द्रविड संघ आणि सुपार्श्वनाथ तीर्थंकर यांचा उल्लेख आहे. अवघ्या पाच शब्दांच्या या शिलालेखात महत्त्वपूर्ण इतिहास कळतो. दिगंबर जैन परंपरेत अनेक मुनिसंप्रदाय आहेत. त्यांच्या मूलसंघ, काष्ठा संघ, माथुर संघ, द्रविड संघ, यापनिय संघ इत्यादी मुख्य शाखा आणि नंदीगण, सेनगण, सिंहगण, देवगण इत्यादी उपप्रकार आहेत. सदर शिलालेखात द्रविल म्हणजेच द्रविड संघाची ही मूर्ती असल्याचा उल्लेख येतो.
स्तवनिधी क्षेत्राला खूप प्राचीन इतिहास आहे. सध्याच्या ज्ञात इतिहासानुसार मध्ययुगीन बादशाही काळात येथे पायाप्पा आणि जायाप्पा या शेट्टी बंधूंनी येथे सापडलेल्या मूर्तींसाठी मंदिर बांधले आणि क्षेत्राचा विकास केला. द्रविड संघाचा उल्लेख मुख्यतः दक्षिण कर्नाटक आणि त्या आसपासच्या भागात सापडतो. स्तवनिधीत द्रविड संघाची मूर्ती सापडणे विशेष आहे. यावरून या परिसरात देखील द्रविड संघाचे अस्तित्व होते असा अंदाज लावला जाऊ शकतो. ही मूर्ती स्तवनिधी तसेच कोल्हापूर-बेळगाव परिसराच्या सांस्कृतिक इतिहासाच्या अभ्यासासाठी एक महत्त्वाचा धागा ठरू शकते.
या शिलालेखाच्या अभ्यासासाठी स्वस्तिश्री जिनसेन भट्टारक तसेच इतिहास अभ्यासक प्रा. डॉ. गोमटेश्वर पाटील आणि वर्धमान दिगंबरे यांचे मोलाचे सहकार्य लाभले.
-----------------
चौकट -
शिलालेखाच्या ओळी
ओळ क्र. १ श्रीमद द्रविल संघद
ओळ क्र. २ सुपार्श्व देवरू
अर्थ : श्रीमद द्रविड संघाचे सुपार्श्वनाथ देव
------------------
चौकट - पार्श्वनाथ गुरुकुलचे महावीर पाटील यांच्यामुळे हा खंडित शिलालेख पहावयास मिळाला. याचा अभ्यास केल्यानंतर कन्नड भाषेचे अभ्यासक रविकुमाल नवलगुंद यांनी या शिलालेखाचा अर्थ भाषांतरित केला. हा खंडित शिलालेख ऐतिहासिक संशोधनासाठी महत्वाचा ठरु शकतो.
-डॉ. सूरज मडके
सकाळ+ चे सदस्य व्हा
ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!
शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.
Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.