03124, 03125, 03126, 03128
तलवार हल्लाप्रकरणी चौघांना अटक
हुपरी, ता.३: खुन्नस देत असल्याच्या कारणातून नवनाथ बाळासाहेब चोरमुले (वय २४ रा.तळंदगे) या तरुणावर
तलवारीने हल्ला केल्याच्या घटनेचा छडा स्थानीक गुन्हे अन्वेषण शाखेच्या पथकाने लावला. याप्रकरणी चौघा जणांना अटक केली. पप्पू उर्फ आशितोष आप्पासो जाधव(वय २३ रा.पट्टणकोडोली) या मुख्य संशयित आरोपीसह प्रथमेश उर्फ चिक्या बाजीराव दाईंगडे (वय २२ रा.तळंदगे), समर्थ विजय पाटील (वय १९ रा.नवीन घरकुल वसाहत कागल) व अभिषेक उर्फ नमक संजय मलके (वय १९ रा.कोरवी गल्ली कागल) अशी संशयितांची नावे आहेत.
दरम्यान जखमी नवनाथ चोरमुले याची प्रकृती आज तिसऱ्या दिवशीही गंभीर असून, त्याच्यावर कोल्हापुरातील खासगी रुग्णालयात उपचार सुरू आहेत. संशयितांकडून गुन्ह्यात वापरलेली तलवार व मोपेड वाहन पोलिसांनी जप्त केली.
दुचाकीवरून तळंदगे येथे घरी चाललेल्या नवनाथ चोरमुले याच्यावर दुचाकीवरून पाठलाग करत चौघांनी धारधार शस्त्राने हल्ला केला होता. त्यात नवनाथ गंभीर जखमी झाला होता. मात्र, नवनाथ मृत झाल्याचे समजून हल्लेखोरांनी पळ काढला होता. पंचतारांकित औद्योगिक वसाहतीमधील एका कंपनीच्या गेटसमोर मंगळवारी (ता.१) रात्री सव्वा नऊच्या सुमारास ही घटना घडली होती. याप्रकरणाची गांभीर्याने दखल घेत जिल्हा पोलिस अधीक्षक महेंद्र पंडित यांनी कसून चौकशीचे आदेश दिले होते.
त्यानुसार स्थानीक गुन्हे अन्वेषण शाखेचे पोलिस निरीक्षक रवींद्र कळमकर यांनी दोन स्वतंत्र पथकाद्वारे आरोपींचा शोध सुरू ठेवला होता. त्यावेळी संशयीत आरोपी कंदलगाव ते के आय टी कॉलेज मार्गावरील एका हॉटेल परिसरात येणार असल्याची माहिती मिळाली. त्यानुसार पोलिसांनी सापळा रचला असता त्यात संशयीत अलगद अडकले. त्यांच्याकडे चौकशी केली असता संशयितांनी गुन्ह्याची कबुली दिल्याची माहिती पोलिसांनी दिली.
गुन्हे शाखेचे पोलिस निरीक्षक रवींद्र कळमकर, सहायक निरीक्षक चेतन मसूटगे, उपनिरीक्षक जलिंदर जाधव, अंमलदार संतोष बरगे, कॉन्स्टेबल संजय हुबे, गजानन गुरव, वैभव पाटील आदींच्या पथकाने ही कारवाई केली. सर्व संशयिताना गोकुळ शिरगाव पोलिसांच्या ताब्यात दिले असून, पोलिस निरीक्षक दिगंबर गायकवाड तपास करत आहेत.
सकाळ+ चे सदस्य व्हा
ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!
शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.
Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.