कागल
नरेंद्र बोते
मुश्रीफांनी मारला विजयाचा षटकार
कागल : संपूर्ण राज्याचे लक्ष लागलेल्या कागल विधानसभा निवडणुकीत अखेर मंत्री हसन मुश्रीफ यांनी विजयाचा षटकार खेचला. त्यांनी डब्बल हॅट् ट्रिक साधत आपण राजकारणातील वस्ताद असल्याचे दाखवून दिले. मुश्रीफ यांना १ लाख ४५ हजार २६९, तर समरजितसिंह घाटगे यांना १ लाख ३३ हजार ६८८ मते मिळाली. गत निवडणुकीपेक्षा या निवडणुकीत मुश्रीफ यांच्यापेक्षा समरजितसिंह यांच्या मतात वाढ झाली.
या निवडणुकीत मुश्रीफ यांनी पाच वर्षांत मतदारसंघात केलेली ७००० कोटी रुपयांची केलेली विकासकामे, आरोग्य योजना, वैयक्तिक लाभाच्या योजना, मुख्यमंत्री लाडकी बहीण योजनेसह माजी खासदार प्रा. संजय मंडलिक, माजी आमदार संजय घाटगे आणि उमेश आपटे यांची चांगली साथ लाभली. दुसऱ्या क्रमांकाची सक्षम कार्यकर्त्यांची फळी, शक्तिपीठ महामार्ग रद्दची अधिसूचना व नियोजनबद्ध प्रचार यंत्रणेसह राजकारणातील प्रदीर्घ अनुभवाची जोड त्यांना विजयी करण्यास कारणीभूत ठरली. बाजार समितीचे माजी सभापती कृष्णात पाटील, पंचायत समितीचे माजी सभापती दत्तोपंत वालावलकर, स्वाती कोरी, डॉ. शहापूरकर यांना सोबत घेऊन मंत्री मुश्रीफ यांना समरजितसिंह यांनी धक्का देण्याचा प्रयत्न केला. तरुणांमध्ये जोश निर्माण करून त्यांनी रंगत आणली. ज्येष्ठ नेते शरद पवार यांच्यासारखे नेतृत्व पाठीशी असूनही दुसऱ्या क्रमांकाच्या सक्षम कार्यकर्त्याची कमतरता व राजकीय डावपेच लढवण्यात समरजितसिंह घाटगे कमी पडल्याचे जाणवते. अखेरच्या दिवसांत उत्तुर परिसरात मते कमी पडतील या विचाराने समरजितसिंह घाटगे यांनी तिकडे जादा लक्ष दिले. त्याच वेळी मंत्री मुश्रीफ यांनी कागल शहरावर लक्ष केंद्रित केले. याचा फायदा होऊन मुश्रीफ यांनी कागल शहरात मतांची आघाडी घेण्यात यश मिळविले.
मंत्री मुश्रीफ यांनी प्रचाराच्या अखेरच्या चार दिवसांत टीका करणे टाळले. त्यांनी जोडण्या लावण्यात वेळ दिला. यातून पवारांच्या तालमीत शिकलेल्या डावांचा वापर करीत त्यांनी घाटगे यांचे आव्हान परतवून लावले.
घडले काय?
१) विकासकामे व शासकीय योजना जनतेपर्यंत पोहोचवण्याचा मुश्रीफांना फायदा
२) माजी खासदार प्रा. संजय मंडलिक, संजय घाटगे व उमेश आपटे यांचे मुश्रीफांना बळ
३) समरजितसिंह घाटगे यांच्याकडे दुसऱ्या फळीतील प्रभावी कार्यकर्त्यांचा अभाव
४) अखेरच्या दिवसात जोडण्या लावण्यात समरजितसिंह यांना अपयश
५) लाडकी बहीण योजनेचा हसन मुश्रीफ यांना फायदा
सकाळ+ चे सदस्य व्हा
ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!
शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.
Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.