85079
कळंबा रिंगरोडला डांबराची प्रतीक्षा
रस्त्याची चाळण; तीन वर्षातच उखडला
कळंबा, ता. २१ ः कोल्हापूर-गारगोटी व कोल्हापूर-राधानगरी या दोन राज्य महामार्गांना जोडणाऱ्या कळंबा रिंगरोडवर मोठमोठे खड्डे पडले असून रस्त्याची चाळण झाली आहे. त्यामुळे वाहतुकीला अडथळा निर्माण झाला आहे. अवजड व प्रवासी वाहन ओव्हरटेक करताना अपघाताचे प्रसंग घडत आहेत.
दरम्यान संबंधित ठेकेदाराने निकृष्ट दर्जाचे साहित्य वापरल्यामुळे तीन वर्षातच रस्ता उखडून निघाला असून रस्त्याची दुरवस्था झाली आहे. रिंग रोडवर ५० हून अधिक अपघातांच्या घटना घडल्या असून त्यामध्ये दोघांचा मृत्यू झाला आहे. चाळीसहून अधिक जण गंभीर जखमी झाले आहेत. वाहनाचे प्रचंड नुकसान झाले आहे. त्यामुळे रस्ता वाहतुकीला मृत्यूचा सापळा बनला आहे. १०८ कोटींच्या नगरोत्थान योजनेतून कोल्हापूर शहरासह उपनगरातील मुख्य रस्त्यांची बांधणी केली आहे. त्यामध्ये कळंबा रिंग रोडचा प्रामुख्याने समावेश आहे. प्रशासनाच्या दुर्लक्षामुळे संबंधित ठेकेदाराने रिंगरोड बांधताना लाल मातीच्या मुरमाचा वापर केला आहे. खडीचे प्रमाण जास्त व डांबर कमी वापरल्यामुळे पहिल्या पावसातच रस्ता वाहून गेला. महाराष्ट्रासह परराज्यातील अवजड मालवाहू ट्रक, कंटेनर, प्रवासी वाहनांच्या सततच्यावाहतुकीमुळे रस्ता उखडून जागोजागी एक ते दोन फूट खोलीचे खड्डे पडले आहेत. अनेक ठिकाणी रस्ता खचला असून सांडपाणी व पावसाचे पाणी साचून तळ्याचे स्वरूप येत आहे. त्यामुळे वाहनचालकाला खड्डे चुकवताना कसरत करावी लागत आहे. रस्त्याला जोडून दोनशेहून अधिक कॉलनी व नगरे आहेत. अनेक शाळा, कॉलेज, मंगल कार्यालय, पेट्रोल पंप व उद्योग रिंग रोडच्या दोन्ही बाजूला येत आहेत. दरम्यान रिंगरोड दोन राज्यमार्गासह कोल्हापूरला जोडणारा महत्त्वाचा दुवा आहे. त्यामुळे शंभर कोटींतून शहरातील अनेक रस्त्यांची बांधणी होत आहे. त्या पार्श्वभूमीवर कळंबा रिंगरोडचीही नव्याने बांधणी करावी, अशी मागणी होत आहे.
चौकट.
श्वसनाच्या आजारांचा उद्भव
कळंबा रिंगरोड अनेक ठिकाणी उखडला असून खडी सर्वत्र पसरलेली आहे. रस्त्यावरून वाहनांची वर्दळ मोठी असल्यामुळे धुळीचे प्रमाण मोठे आहे. त्यामुळे नागरिकांना श्वसनाचे अनेक आजार उद्धभवत आहेत. त्यामुळे रस्त्यावरून जाताना नागरिक तोंड बांधून जात असल्याचे दिसत आहे.
कोट.
शंभर कोटींच्या नगरोत्थान योजनेतून शहर, उपनगरातील रस्त्यांची बांधणी होत आहे. अनेक रस्त्यांचे पॅचवर्क केले जात आहे. कळंबा रिंगची दुरुस्तीही होणार आहे. या रस्त्यावरील खड्डे बुजवून पॅचवर्क होणार आहे. याबाबत प्रशासनाशी चर्चा सुरू आहे.
- नेत्रदीप सरनोबत, शहर अभियंता
सकाळ+ चे सदस्य व्हा
ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!
शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.
Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.