‘नवोदय’ चाचणीच्या गुणांबाबत गोपनीयता का?
पालकांची विचारणा; शिष्यवृत्ती, स्पर्धा परीक्षांप्रमाणे निकाल जाहीर व्हावा
संतोष मिठारी, सकाळ वृत्तसेवा
कोल्हापूर, ता. २५ ः हुशार, गुणवंत शालेय विद्यार्थ्यांना अधिक चांगल्या पद्धतीने आधुनिक, दर्जेदार शिक्षण घेता यावे, या मुख्य उद्देशाने केंद्र सरकारने जवाहर नवोदय विद्यालयांची देशभरात सुरूवात केली आहे. या विद्यालयांतील इयत्ता सहावी, नववी आणि अकरावीतील प्रवेशासाठी दरवर्षी निवड चाचणी परीक्षा घेतली जाते. या चाचणीनंतर केवळ निवड झालेल्या विद्यार्थ्यांच्या नावांची यादी जाहीर केली जाते. त्यात चाचणी परीक्षा देणाऱ्या विद्यार्थ्यांना त्यांना मिळालेले गुण समजत नाहीत. या गुणांबाबत गोपनीयता राखण्याचे कारण काय?, अशी विचारणा पालकांतून होत आहे. शिष्यवृत्ती आणि इतर स्पर्धा परीक्षांप्रमाणे या निवड चाचणीचा देखील निकाल जाहीर करण्याची मागणी त्यांनी केली आहे.
या विद्यालयांतील प्रवेशासाठी दरवर्षी केंद्रीय माध्यमिक शिक्षण मंडळातर्फे निवड चाचणी घेतली जाते. त्यासाठी बौद्धिक क्षमता, अंकगणित, भाषा चाचणीबाबतचे ८० प्रश्न विचारले जातात. त्यांचे स्वरूप बहुपर्यायी असते. या प्रश्नांसाठी एकूण १०० गुण असतात. चाचणी झाल्यानंतर प्रवेशासाठी निवड झालेल्या विद्यार्थ्यांच्या नावांची यादी जाहीर होते. देशभरातील हजारो विद्यार्थी दरवर्षी परीक्षा देतात. या परीक्षेसाठी मोठी स्पर्धा असते. त्याची तयारी मुले अडीच ते तीन वर्षांपासून करतात. त्यामुळे परीक्षा देणाऱ्या प्रत्येक विद्यार्थ्याला त्याला मिळालेल्या गुणांची माहिती होणे आवश्यक आहे. कोणत्या घटकात विद्यार्थी कमी पडला हे समजल्यास त्यांची तयारी करून घेणे अधिक सोयीस्कर ठरते. त्यामुळे या परीक्षेतील गुण समजावेत. गुणांची पडताळणी करून घेण्याची सुविधा देखील उपलब्ध करून द्यावी, अशी मागणी पालकांनी केली आहे.
........
कोट
‘या निवड चाचणीतील परीक्षार्थी विद्यार्थ्याला किती गुण मिळाले आणि निवड यादीत निवडलेल्या विद्यार्थ्यांना किती गुण मिळाले याची कुणालाच माहिती दिली जात नाही. वास्तविक एमपीएससी, यूपीएससी, जेईई, नीट यासारख्या राष्ट्रीयस्तरावरच्या सर्वोच्च परीक्षांचा देखील निकाल जाहीर केला जातो. मग, नवोदय विद्यालय प्रवेश परीक्षेबाबतच इतकी गोपनीयता का?
ःः- देवदत्त कुंभार, शिक्षक (कोरोची, ता. हातकणंगले)
.....
२ लाख ६० हजार विद्यार्थ्यांतून
२७०० जणांची निवड
यावर्षी इयत्ता सहावीच्या प्रवेशासाठी निवड चाचणी परीक्षा २९ एप्रिल रोजी झाली. महाराष्ट्रातील एकूण २ लाख ६० हजार १८० विद्यार्थ्यांनी परीक्षा दिली. त्यातून ३४ जिल्ह्यांतील विद्यालयांसाठी सुमारे २७०० जणांची प्रवेशासाठी निवड झाली आहे. त्यावरून या नवोदय विद्यालयातील प्रवेशासाठी किती स्पर्धा तीव्र असते हे लक्षात येते.
.......
कोट
‘नवोदय विद्यालय समितीच्या नियम आणि निर्देशानुसार दरवर्षी प्रवेशासाठी चाचणी परीक्षा घेतली जाते. ‘सीबीएसई’कडून निवड यादी जाहीर केली जाते.
-डी. रवि दामोदर, प्राचार्य, नवोदय विद्यालय, कागल
सकाळ+ चे सदस्य व्हा
ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!
शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.
Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.