23745
स्वातंत्र्य टिकविण्याची जबाबदारी तरूणांवर
माधवराव माने; ‘अभिवादन स्वातंत्र्यसैनिकांना’ ध्वनीमालिकेचा समारोप
सकाळ वृत्तसेवा
कोल्हापूर, ता. १८ ः स्वातंत्र्य मिळविण्यासाठी कित्येक स्वातंत्र्यसैनिकांनी बलिदान दिले. ते स्वातंत्र्य टिकविण्याची जबाबदारी तरुण, भावी पिढ्यांच्या खांद्यावर आहे, असे प्रतिपादन ज्येष्ठ स्वातंत्र्यसैनिक माधवराव भुजंगराव माने यांनी येथे केले.
शिवाजी विद्यापीठाचा इतिहास अधिविभाग आणि जनसंपर्क कक्षातर्फे आयोजित ‘आजादी का अमृतमहोत्सव’ उपक्रमांतर्गत ‘शिव-वाणी’ यु-ट्यूब ध्वनीवाहिनीवरून १५ ऑगस्ट २०२२ पासून रोज सकाळी ९ वाजता वर्षभर ‘अभिवादन स्वातंत्र्यसैनिकांना’ ध्वनीमालिका प्रसारित केली. या मालिकेचा समारोप मंगळवारी येळावी (ता. तासगाव, जि. सांगली) येथील ज्येष्ठ स्वातंत्र्यसैनिक माने यांच्या उपस्थितीत झाला. राजर्षी शाहू सभागृहात झालेल्या समारंभाच्या अध्यक्षस्थानी कुलगुरू डॉ. दिगंबर शिर्के, तर प्र-कुलगुरू डॉ. प्रमोद पाटील प्रमुख उपस्थित होते.
माने म्हणाले, ‘महात्मा गांधी, पंडित जवाहरलाल नेहरू यांच्या मार्गदर्शनाखाली १९४२च्या आंदोलनात सहभागी झालो. क्रांतीसिंह नाना पाटील यांच्या नेतृत्वाखालील प्रतिसरकारही यशस्वी करून दाखविले.’ कुलगुरू डॉ. शिर्के म्हणाले, ‘स्वातंत्र्यसैनिकांच्या स्मृतींना उजाळा देण्याचा उपक्रम वर्षभर चालवून जणू रोज अमृतमहोत्सव केला.’
ज्येष्ठ इतिहास अभ्यासक डॉ. अरुण भोसले, प्र-कुलगुरू डॉ. प्रमोद पाटील यांनी मनोगत व्यक्त केले. स्वातंत्र्यसैनिक माने यांनाच समर्पित ‘अभिवादन स्वातंत्र्यसैनिकांना’ मालिकेतील अखेरच्या ३६६व्या भागाचे त्यांच्याच उपस्थितीत प्रसारण झाले. मालिकेच्या यशस्वितेत योगदान देणारे डॉ. अरुण भोसले, डॉ. अवनीश पाटील, डॉ. दत्तात्रय मचाले, जनसंपर्क अधिकारी डॉ. आलोक जत्राटकर, डॉ. भारतभूषण माळी, अजितकुमार जाधव, धीरज शिंदे, सुरेश शिखरे, सुस्मिता खुटाळे, मल्हार जोशी, विनायक ठोंबरे यांचा कुलगुरू डॉ. शिर्के यांच्याहस्ते प्रशस्तीपत्र, ग्रंथभेट देऊन गौरव झाला. डॉ. प्रकाश गायकवाड, तानाजी चौगुले, शरद बनसोडे उपस्थित होते. डॉ. अवनीश पाटील यांनी स्वागत, सुस्मिता खुटाळे यांनी सूत्रसंचालन तर कुलसचिव डॉ. विलास शिंदे यांनी आभार मानले.
प्रश्नमंजूषेमधील विजेते
ध्वनीमालिकेवर आधारित जिल्हास्तरीय प्रश्नमंजूषा स्पर्धा झाली. विजेत्यांमध्ये वैष्णवी जाधव, धनश्री पाटोळे, कल्याणी जाधव, संजीवनी खिलारी, स्वप्नाली पवार, धैर्यशील जाधव, विश्वास घोडे, तुकाराम पाटील, किरण मुसळे यांचा समावेश आहे.
........................
चौकट
आठवणींनी रोमांचित
स्वातंत्र्यसैनिक माने यांनी तल्लख स्मरणशक्तीच्या जोरावर वयाच्या ९९व्या वर्षीही स्वातंत्र्यलढा व प्रतिसरकार आंदोलनाच्या आठवणी सांगून तरुणांना रोमांचित करून सोडले.
सकाळ+ चे सदस्य व्हा
ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!
शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.
Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.