24272
---
बनावट दाखल्यांप्रकरणी
रिक्षा चालकास सक्तमजुरी
कोल्हापूर, ता. १८ः रिक्षाचे परमिट मिळण्यासाठी शाळेचे दोन बनावट दाखले तयार करून त्याचा वापर केल्याबद्दल रिक्षा चालकास पाच वर्षे सक्तमजुरी आणि एकूण दहा हजार रुपयांची दंडाची शिक्षा आज सुनावण्यात आली. कृष्णात महादेव पाटील (वय ५३, रा. कसबा बावडा, कोल्हापूर) असे त्याचे नाव आहे. बनावट दाखल्यांचा वापर प्रादेशिक परिवहन कार्यालयात केल्यामुळे वेगवगेळ्या कलमांखाली त्याला मुख्य न्यायदंडाधिकारी शैलेश बाफना यांनी ही शिक्षा सुनावल्याची माहिती सरकारी वकील श्रीमती आम्रपाली कस्तुरे यांनी दिली.
याबाबत अधिक माहिती अशी, रिक्षाचे परमिट मिळण्यासाठी शाळा सोडल्याचा दाखलाही आवश्यक असतो. पाटील यांनी रिक्षाचे परमिट मिळण्यासाठी मेन राजाराम हायस्कूल आणि ज्युनिअर कॉलेजचे दाखले जोडले होते. प्रादेशिक परिवहन कार्यालयात (आरटीओ) कागदपत्रांची पडताळणी झाली. तेव्हा हे दाखले संबंधित शाळा-कॉलेजमधून दिले नसल्याची माहिती पुढे आली. त्यामुळे प्रादेशिक परिवहन अधिकाऱ्यांनी दिलेल्या आदेशानुसार चौकशी झाली. यामध्ये संबंधित दाखले पाटील यांच्या नावे नसून, ते दुसऱ्याच विद्यार्थ्यांचे असल्याची माहिती मुख्याध्यापकांनी दिल्याचे स्पष्ट झाले. त्यामुळे सहाय्यक मोटर वाहन निरीक्षक प्रशांत शिंदे यांनी याची फिर्याद २०१४ मध्ये शाहूपुरी पोलिस ठाण्यात दिली. त्यानंतर न्यायालयात दोषारोपपत्र दाखल झाले. त्यानुसार दोन्ही बाजूच्या वकिलांची बाजू ऐकून मुख्य न्यायदंडाधिकारी बाफना यांनी पाटील याला दोषी ठरविले. त्याला तोतयागिरी केल्यामुळे पाच वर्षे सक्तमजुरी व पाच हजार रुपये दंड तसेच दंड न भरल्यास तीन महिने साधी कैद, फसवणुकीच्या गुन्ह्यात पाच वर्षे सक्तमजुरी व पाच हजार रुपये दंड तसेच दंड न भरल्यास तीन महिने साधी कैद यासह अन्य कलमांनुसार दोन वर्षे साधी कैद, तसेच एक वर्ष साधी कैद अशीही शिक्षा सुनावण्यात आली आहे. ही सर्व शिक्षा एकत्रित भोगायची असल्याची माहिती ॲड. कस्तुरे यांनी दिली. शाहूपुरी पोलिस ठाण्याचे तत्कालीन उपनिरीक्षक ए. एच. कुलकर्णी यांनी तपास केला. पैरवी अधिकारी एस. एम. कळंत्रे यांनी सरकारी वकिलांना सहकार्य केले.
सकाळ+ चे सदस्य व्हा
ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!
शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.
Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.