अल्पवयीन वाहनचालक सुसाट
चार महिन्यांत १७६ जणांवर शहर वाहतूक शाखेची कारवाई
गौरव डोंगरे ः सकाळ वृत्तसेवा
कोल्हापूर, ता. २१ ः विनानंबर महागड्या मोटारीने पुण्यात दोघांना उडवले. यात भरधाव वेगातील मोटारीची धडक इतकी जोरदार की जखमींचा जागीच मृत्यू झाला. मोटारचालक अल्पवयीन असल्याचे समोर आल्याने या घटनेबाबत देशभरात संतप्त प्रतिक्रिया उमटत आहेत. अल्पवयीन चालकाच्या धडकेत एखाद्याचा मृत्यू झाल्याचा गुन्हा सिद्ध झाल्यास पालकांना जबाबदार ठरवून १० वर्षांपर्यंतच्या शिक्षेची तरतूद आहे. कोल्हापूर शहर वाहतूक शाखेने मागील चार महिन्यांत १७६ अल्पवयीन चालकांवर कारवाई करत ८ लाखांचा दंड वसूल केला आहे. तर यापैकी १२५ खटले न्यायालयाकडे पाठविले आहेत.
दहावी पास हो, बारावीत चांगले गुण मिळव...मग तुला मोटारसायकल घेऊन देऊ, असे अनेक पालकांकडून त्याच्या पाल्याला आश्वासन दिले जाते; पण आपला मुलगा किंवा मुलगी अल्पवयीन असल्याचे माहीत असूनही आपल्या मुलाच्या हाती वाहन देताना थोडा विचार करणे गरजेचे बनले आहे. अल्पवयीन मुलांकडून अपघाताचे प्रकार अनेकदा घडले आहेत. पोलिस प्रशासनानेही अशी अल्पवयीन मुलांवर कारवाईसाठी पावले उचलली आहेत; परंतु अद्यापही या प्रकारात फारसा फरक पडल्याचे दिसत नाही.
चौकट
स्टंटबाजी बेतेल जीवावर
स्पोर्टस् बाईक भरधाव वेगात चालविण्याचे प्रकार मुलांच्या जीवावर बेतले आहेत. केएसबीपी उद्यान ते कृषी महाविद्यालय, संभाजीनगर रिंग रोड, आर. के. नगर ते शेंडा पार्क, पुईखडी परिसर, धैर्यप्रसाद चौक ते सर्किट हाउस या परिसरात दिवसा, तसेच रात्री उशिरा तरुणांकडून स्टंटचे प्रकार सुरू असतात. शिवाजी विद्यापीठनजीक रस्ता दुभाजकाला धडकून तरुणाला जीव गमवावा लागल्याची घटना काही वर्षांपूर्वी घडली होती. रिल्स बनविण्याच्या प्रयत्नात अल्पवयीन मुलांकडून वाहन अपघातांचे प्रकारही वाढल्याचे दिसून येते.
चौकट
दंडात्मक कारवाई पर्याय नाही
वाहतूक नियमांचे उल्लंघन करणाऱ्यांच्या आर्थिक दंडात दुप्पट वाढ झाली आहे. काही केसेसमध्ये थेट १० हजार रुपये दंड ठोठावण्यात आला आहे. असे नियम तोडणारी मुले अनेकदा उच्चभ्रू असल्याने त्यांच्यावर अशा दंडात्मक कारवाईचा फारसा परिणाम होताना दिसत नाही.
कोट
पालकांनाही ठरवले जाऊ शकते दोषी
पालकांना आपल्या अल्पवयीन मुलाला वाहन चालविण्यास देऊ नये. केवळ दंडात्मक कारवाई असे समजून पालक निर्धास्त होतात; पण अल्पवयीन मुलाकडून अपघातात एखाद्याचा मृत्यू झाल्याचा गुन्हा सिद्ध झाल्यास सदोष मनुष्यवधाच्या गुन्ह्याखाली पालकाला १० वर्षांपर्यंतची शिक्षा होऊ शकते, याचे भान पालकांना राखणे गरजेचे आहे.
- नंदकुमार मोरे, पोलिस निरीक्षक
...................
ग्राफ
अल्पयीन चालकांवर कारवाया
(जानेवारी ते एप्रिल)
एकूण कारवाया ः १७६
न्यायालयात पाठवलेले खटले ः १२५
दंडाची वसुली ः ८,१५०००
सकाळ+ चे सदस्य व्हा
ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!
शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.
Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.